Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज दिल्लीतील सदैव अटल इथं अटलजींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती, विद्यार्थ्यांनी भजनं सादर करुन अटलजींना श्रद्धांजली अर्पण
केली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, किरेन रिजिजू, गजेंद्र सिंह शेखावत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीच्या
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी उपस्थित होते.
****
मुंबईतील विक्रोळी इथं आज पहाटे झालेल्या
भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. पहाटे दोन वाजेच्या
सुमारास डोंगरावरून माती आणि दगड घसरून झोपडीवर पडल्याने ही दुर्घटना घडली.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटीच्या
पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी किश्तवाडला
पोहोचले आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत जवळपास ६० जणांचा मृत्यू
झाला असून शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांशी संवाद
साधत या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधत केंद्राकडून
सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परवा किश्तवाड जिल्ह्यातील चिशोती इथं ढगफुटीमुळं
मोठं नुकसान झालं. सद्या या परिसरात बचाव आणि मदत कार्य सुरु आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना
श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमीचा
सण लोकांच्या जीवनात नवीन उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येईल अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या
समाजिक माध्यमावरील संदेशात व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या प्रगतीचे उंच थर
रचून संस्कृती, परंपरेचा अभिमान बाळगूया
आणि गोपाळकाल्याचा सण उत्साहात साजरा करू असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी देशवासियांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
****
राज्यात आज गोपाळकाला दहीहंडीचा उत्साह
आहे, मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी दहिहंडीचे आयोजन
करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही गजानन महाराज मंदिर परिसरासह इतरत्र दहीहंडी
उत्सवासाठी तयारी सुरु आहे. शहर आणि जिल्ह्यातल्या शाळामध्येही श्रीकृष्ण अन् राधेच्या
वेशात बाळगोपाळांनी दहीहंडी फोडली. अहिल्यानगरच्या शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिरात
काल श्री गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात
रात्री हरी भक्त परायण स्मिता आजेगावकर यांच्या श्रीकृष्णजन्म कीर्तनानंतर श्रीकृष्ण
जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
****
मराठा आरक्षणासाठी मुंबईत २९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. बैठकीदरम्यान काही वेळ त्यांना
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांनी पुन्हा बैठका घेतल्या.
जिल्हाभरातून आलेल्या मराठा पदाधिकाऱ्यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चात
मोठ्या सहभागी होण्याचं आशवासन यावेळी दिला.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठाच्या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचे केंद्र म्हणून पालघरच्या सोनोपंत
दांडेकर महाविद्यालयाचा विशेष सन्मान करण्यात आला. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात केंद्रामध्ये
३ हजार ५७६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, ही राज्यातील सर्वाधिक संख्या आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पहाटे तीन वाजल्यापासून
जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाचे पाच वक्र दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून
८ हजार ३१३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावरील
गावांना पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
ऑनलाईन घरपोच सेवा मिळवून देण्यासाठी
हिंगोली जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या 'सेवादूत हिंगोली' प्रणालीचं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते काल स्वातंत्र्य
दिनी उद्घघाटन करण्यात आलं. 'हिंगोली सेवादूत' प्रणाली द्वारे शासन आपल्या दारी
हा उपक्रम अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढाकार घेतला.
व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
****
हवामान - हवामान विभागाने मुंबईत
आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज सकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सततच्या पावसामुळं
अनेक भागात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई पोलिसांनी प्रवासाबाबत
मार्गदर्शक सुचना जारी केल्या असून अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाची
शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच रायगडसाठी ऑरेंज आणि पालघर तसंच ठाण्यासाठी
यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
भारताच्या अंकिता ध्यानीने इस्रायलमधील
ग्रँड स्लॅम जेरुसलेम अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तिनं महिलांच्या दोन
हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला. २३ वर्षीय अंकितानं पारुल चौधरीचा
६ मिनिटे १४.३८ सेकंदांचा मागील विक्रम ६ मिनिटे १३.९२ सेकंदांसह मोडला.
****
No comments:
Post a Comment