Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 16 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची पंतप्रधानांची
घोषणा; एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा
·
जीएसटीमधल्या १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा काढून टाकण्याचा
अर्थमंत्रालयाचा प्रस्ताव
·
श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी; आज दहीहंडीचा
थरार
·
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम
अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती
आणि
·
मराठवाड्यात सर्वत्र पाऊस सुरु; लातूर जिल्ह्यात
मांजरा, निम्न तेरणा आणि तावरजा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ
****
प्रधानमंत्री
विकसित भारत रोजगार योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
काल ७९ व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर ते बोलत होते. सुमारे एक लाख
कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल. याअंतर्गत खाजगी क्षेत्रात
पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५ हजार रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं.
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या
दिवाळीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणाही
पंतप्रधानांनी यावेळी केली. आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरसह विविध मुद्यांचा त्यांनी
उल्लेख केला. देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी मिशन सुदर्शनचक्र ही प्रणाली
विकसित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
मुंबईत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या
भाषणात मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या मंत्राकडे लक्ष वेधलं. विकसित
भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्र समर्थपणे आपलं योगदान देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठवाड्यात
सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
बीड इथं
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नवा विकसित
बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बाईट- उपमुख्यमंत्री
अजित पवार
जालना इथं
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या
हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा
पार पडला.
छत्रपती
संभाजीनगर इथं पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले,
बाईट- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
सर्व जिल्हा
मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यानंतर सेवा पदकं तसंच राष्ट्रपती
पदकं प्रदान करण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
मुंबर्इ
उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या हस्ते
ध्वजारोहण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय
फुलारी यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर
चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू
डॉ इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
वस्तू आणि
सेवा करांतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूंवर पाच टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरात दर निश्चित
करावेत, असा प्रस्ताव अर्थमंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर परिषदेला पाठवला
आहे. या नव्या प्रणालीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, आरोग्याशी संबंधित वस्तू, हस्तकलेच्या वस्तू आणि विमा
यांच्यावर पाच टक्के जीएसटी लागेल, तर इतर वस्तू १८ टक्के जीएसटीच्या
स्तरात येतील. मात्र, सिगरेट, तंबाखू,
साखरयुक्त पेयं आणि पानमसाला अशा आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या वस्तूंवर
आत्ताप्रमाणेच जास्त जीएसटी द्यावा लागेल.
****
श्रीकृष्ण
जन्माष्टमी काल सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदीरांमध्ये
तसंच घरोघरी देखील मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला. आज सर्वत्र दहीहंडीचा
थरार पाहायला मिळणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर शहरात दहीहंडी निमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. शहरात
गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदीरासमोर दहीहंडी
आयोजित करण्यात आली असून, या मार्गावरचे रस्ते दुपारनंतर बंद
राहणार आहेत.
****
श्री क्षेत्र
तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल आढावा बैठक घेतली. या आराखड्यातून कोणावरही अन्याय
होऊ देणार नाही, असं आश्वासन देत, यामुळे रोजगार निर्मिती,
पर्यटन वाढ, व्यापार वृद्धी आणि सोयी-सुविधांचा
दर्जा उंचावेल, असं सरनाईक यांनी नमूद केलं.
****
शालेय शिक्षणात
नवनवीन उपक्रमांचा समावेश करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना
देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा
भुसे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात भुसे यांनी काल अचानक
भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘दशसूत्री’ या उपक्रमाची माहिती
जाणून घेतली. शाळा अद्यावतीकरणाची ही एक लोकचळवळ होईल, त्यातून
शाळांचे चित्र बदलेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
****
१०० दिवसात
कार्यालयीन सुधारणा मोहीम जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये उत्तम पद्धतीने राबवल्याबद्दल
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला काल द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गटविकास
अधिकारी मीना रावताळे, गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांना मुख्यमंत्र्यांचं स्वाक्षरी
असलेलं प्रशस्तीपत्र पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.
****
मराठवाड्यात
अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल जोरदार
पाऊस झाला. पळशी, आडगाव, अंजन रोड, लिंधारी
या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं
आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत
आहे. जिल्ह्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ८९ टक्क्यांच्या वर गेला
आहे.
जालना शहरासह
जिल्ह्यात पाऊस सुरु असून, नदी-नाल्यांना पूर आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर जिल्ह्यात
सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. मांजरा धरणाचा पाणीसाठा
७९ टक्के, निम्न तेरणा ८८ टक्के, तर औसा तालुक्यातल्या
तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्के झाला आहे. या धरणांमधून पाणी सोडलं जाण्याची
शक्यता असून, मांजरा, तेरणा आणि तावरजा
नदीकाठच्या गावांतल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कालच्या पावसाने
अनेक शेतातही पाणी घुसलं असून, आमदार अमित देशमुख यांनी काल
बाधित क्षेत्राची पाहणी करुन, प्रशासनाने याबाबत तातडीच्या उपाययोजना
करण्याची मागणी केली.
नांदेड
जिल्ह्यात २७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रातही
पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
****
हवामान
हा संपूर्ण
आठवडा कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल,
किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त
केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही
अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment