Monday, 11 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ ऑगस्ट २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ निवासस्थानांचं उद्घाटन झालं. बाबा खरक सिंह मार्गावरच्या या संकुलात पंतप्रधानांच्या हस्ते शेंदूर वृक्षाचं रोपही लावण्यात आलं. लोकप्रतिनिधी म्हणून असणारी जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने सांभाळता यावी, या दृष्टीनं या संकुलात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज राजस्थानातल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्यांचं वाटप करणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर प्रथमच एका कार्यक्रमातून नुकसानभरपाईचं वाटप होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना खरिपातल्या नुकसानभरपाईपोटी ८०९ कोटी तर रब्बीसाठी ११२ कोटी असे एकंदर ९२१ कोटी रुपये मिळणार आहेत.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या वार्ताहर परिषदेत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीच्या हवाल्याने केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं, अशी नोटिस कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या सादरीकरणात दाखवलेली कागदपत्रं मतदान अधिकाऱ्यांनी जारी केलेली नसल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

****

पर्यावरणीय बाबींसंदर्भात भारत जागतिक स्तरावर नेतृत्वाची भूमिका बजावत असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ते गुजरातमध्ये देवभूमी द्वारका इथं जागतिक सिंह दिनानिमित्त राज्यस्तरावरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वाघांच्या सात प्रजातींपैकी पाच भारतात आढळतात असं नमूद करुन, विविध प्रकल्पांच्या माध्यमातून भारताचे पर्यावरणकेंद्री संवर्धन मॉडेल आकाराला येत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राला सर्वोत्तम प्रतिभावंत मिळवून देण्यात भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही नारायणन् यांनी म्हटलं आहे. ते काल तिरुअनंतपुरम मधल्या वलियमला इथं या संस्थेच्या १३ व्या दिक्षांत सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून भारताच्या या यशात इस्रोचा मोठा वाटा आहे, असंही ते म्हणाले.

****

लातूर शहरात उभारण्यात आलेल्या लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. लातूर जिल्हा विकास कामासंदर्भात ते एक बैठकही घेणार आहेत.

****

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आज राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. नाशिकसह विविध स्थानकातून २७० जादा एसटी बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनं भाविकांसाठी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसंच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लंपी या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. देऊळगाव, मलकापुर, सिंदखेड राजा, खामगाव, चिखली या तालुक्यातली गावं नियंत्रित क्षेत्रं म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या भागात गुरांचे बाजार, जत्रा, वाहतूक यांच्यावर निर्बध घालण्यात आले असून स्वच्छता, फवारणी, लस देण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहेत.

****

जळगाव इथं रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन काल पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं. रानभाज्या निसर्गाची देण असून त्यावर रासायनिक फवारणी नसल्यानं त्या सेंद्रिय, सुरक्षित आणि पोषक असतात. नव्या पिढीला यांची ओळख करून देणारा हा रानभाजी महोत्सव महत्त्वपूर्ण असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. या महोत्सवात जिल्हाभरातून आलेल्या शेतकरी गट आणि महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीनं पिकवलेल्या रानभाज्यांचे आणि प्रक्रिया उद्योगाचे ८० स्टॉल्स होते.

****

१९ वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निशा हिनं ५४ किलो वजनी गटात आणि मुस्कानने ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, तर इतर पाच जणांनी रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताने १४ सुवर्ण पदकांची कमाई केली.

****

भारतीय खुल्या जागतिक ॲथलेटिक्स ब्रॉन्झ लेवल कॉन्टिनेन्टल टूर स्पर्धेत भारताच्या अनू राणीने भालाफेकमध्ये विजेतेपद पटकावलं. ओडिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत अनूने ६२ पूर्णांक एक शतांश मीटरवर भाला फेकून ही कामगिरी केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत शिवम लोहकरने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या लांब उडी मध्ये मुरली श्रीशंकरने सुवर्ण पदक पटकावलं.

****

No comments: