Monday, 11 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      हर घर तिरंगा अभियानात अमृत सरोवरांच्या काठावर तिरंगा उत्सव साजरा केला जाणार

·      शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल व्हॅन परवाने वाटपाचा राज्य परिवहन विभागाचा निर्णय

·      राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ

·      इंडिया आघाडीचा दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा;तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यभर आंदोलन

·      लातूर इथं दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

आणि

·      पुणे जिल्ह्यात जीप दरीत कोसळून आठ महिलांचा मृत्यू तर २९ जखमी

****

हर घर तिरंगा अभियान विकसित भारताचा संकल्प अधिक सुदृढ करेल, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला आहे. ते आज दिल्लीत या संदर्भातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा देशभरातल्या एक हजार अमृत सरोवरांच्या काठावरही तिरंगा उत्सव साजरा केला जाणार असल्याचं, शेखावत यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री

 

१४ ऑगस्ट रोजी, विभाजन विभिषिका दिनी, मूक मोर्चा, चित्रप्रदर्शन तसंच पथनाट्य आणि चर्चासत्रं आयोजित केली जाणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं.

****

हर घर तिरंगा अभियान सर्वत्र सुरू आहे, या अंतर्गत हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं आज तिरंगा फेरी काढण्यात आली. उपमुख्य अधिकारी श्याम माळवटकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. वाशीम इथं भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या पालावर तिरंगा फडकवला. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं स्वातंत्र्य वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज आढावा घेतला. या समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पापळकर यांनी दिले.

****

राज्य परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्कूल व्हॅनचे परवाने वाटप करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. यामुळे सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं सरनाईक म्हणाले. या वाहनांमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा, दप्तरे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा, अग्निशमन अलार्म यंत्रणा, जीपीएस प्रणाली अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे, यामुळे अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त शालेय विद्यार्थी वाहतुक सेवा राबवणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे.

****

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ केली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतन धारकांना आता ५३ ऐवजी ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. १ जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला.

****

लोकसभेनं नवीन प्राप्तिकर विधेयक आज आवाजी मतदानानं संमत केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. याआधीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं.

****

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचा आरोप करत, इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला. बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दानवे यांनी या आंदोलनामागची भूमिका या शब्दांत मांडली

बाईट - अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते, विधान परिषद

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक इथं पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जालना शहरातील महात्मा गांधी चमन इथं, तर सोलापूर तसंच धुळे इथं पक्षाच्या वतीनं मोर्चा काढत जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं.

****

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल्या मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचे तसंच या कुत्र्यांना आश्रयस्थळांमध्ये हलवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींच्या हरकती स्वीकारण्यास नकार देत, सदर कार्यवाहीत अडथळा आणणारे व्यक्ती वा संस्थांवर कारवाईचा इशारा न्यायालयाने दिला आहे. लहान बालकांवर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांसंदर्भात न्यायालयाने हे निर्देश दिले. भूतदयेसोबतच जनसुरक्षा ही सर्वोपरि असल्याचं, न्यायालयाने म्हटलं आहे.

****

नागपूरचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज लंडन इथं जाऊन ताब्यात घेतली. सोमवारी १८ ऑगस्टला ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकदमीमध्ये आणण्यात येणार आहे.

****

प्रत्येक समाजातल्या वंचितांच्या विकासाची गोपीनाथ मुंडे यांनी रुजवलेली भावना आजच्या राजकीय नेत्यांनी जोपासण्याची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते आज लातूर इथं दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केल्यावर बोलत होते. सत्तेशी तडजोड नव्हे तर सत्तेशी संघर्ष करण्याची शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला दिली, आपण आजही त्या शिकवणीवर वाटचाल करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य तसंच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुंबईतल्या गुंडगिरीचा बिमोड, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, सामाजिक समरसता, विधानसभेतील कामकाज, आदी मुद्द्यांच्या संदर्भाने गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वांनी उजाळा दिला.

लातूर इथल्या रेलवे कोच फॅक्टरीत पुढच्या वर्षी दहा हजार उमेदवारांना रोजगार मिळेल, स्थानिकांनाच ही संधी मिळावी, असे स्पष्ट निर्देश दिल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या कारखान्याला आवश्यक असं मनुष्यबळ तयार करण्याची सूचना संबंधितांना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लातूरच्या पाणी पुरवठा योजना तसंच सामान्य रुग्णालयाला मंजुरी देत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पुणे जिल्ह्यात खेड इथं दरीत जीप कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर २९ जण जखमी झाले आहेत. या सर्व महिला श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रूपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

****

ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांना मुक्त सृजन संस्थेचा सुक्त सृजन जीवन गौरव पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या कार्यक्रमात नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन रसाळ यांना गौरवण्यात आलं.

****

No comments: