Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
गेल्या
११ वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहा पटीने तर निर्यातीत आठ पटीने वाढ
·
राज्य
पोलीस दलातील शिपायांची १५ हजार पदं भरण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
·
स्वातंत्र्यदिनाच्या
पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन
आणि
·
कुस्तीगीर
खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभाला उद्यापासून मुंबईत प्रारंभ
****
देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात
गेल्या ११ वर्षांत सहा पट वाढ झाली असून, इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत आठ पट वाढ झाली आहे. केंद्रीय माहिती
आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. देशांतर्गत मोबाईल उत्पादनातही सुमारे दीडशे पट वाढ झाल्याची
माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले –
बाईट - अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
देशाची जीवाश्म इंधन क्षमता ५० टक्क्यांहून
अधिक झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. येत्या दोन सप्टेंबरपासून दिल्लीत सेमीकॉन
इंडिया २०२५चं आयोजन करण्यात आलं असून, यामध्ये सिंगापूर, मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांचा सहभाग असेल,
असंही वैष्णव यांनी सांगितलं.
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने चार
नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी दिली आहे. सुमारे चार हजार ५९४ कोटी रुपयांचे हे
प्रकल्प ओडिशा, पंजाब
आणि आंध्रप्रदेशात उभारले जाणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. अरुणाचल प्रदेशातला
टॅटो टू जलविद्युत प्रकल्प तसंच लखनऊ मेट्रोच्या पुढच्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने
आजच्या बैठकीत मंजुरी दिली.
****
राज्य मंत्रिमंडळाचीही आज बैठक झाली,
या बैठकीत पोलीस दलातील शिपायांची १५
हजार पदं भरण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या भरतीमध्ये २०२२ आणि २०२३ मध्ये संबंधित
पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार
आहे.
रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ
करण्याचा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचं वितरण
करायलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे २० रूपये
अधिक नफा मिळणार आहे. यासाठी दरवर्षी ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली
जाणार आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत,
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,
संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार
विकास महामंडळ, तसंच
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळांतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध
कर्ज योजनेतल्या जामीनदारीच्या अटी शिथिल करणं आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदतवाढ
देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ -एसटीला
रक्षाबंधन तसंच सलगच्या सुट्टयांमुळे झालेल्या प्रवासी वाहतुकी मधून १३७ कोटी रुपये
उत्पन्न झालं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ११ ऑगस्ट या
एकाच दिवशी तब्बल ३९ कोटी रुपये उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळालं,
चालू आर्थिक वर्षात हे सर्वाधिक उत्पन्न
असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत
निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. प्रभाग पद्धतीऐवजी
एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवावी,
मतदान प्रक्रीयेत व्हीव्हीपॅट मशीनचा
वापर करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर
यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
****
राज्य सरकारचं जनसुरक्षा विधेयक तसंच
त्रिभाषा सूत्राला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध दर्शवला आहे. पक्ष कार्यकारिणीच्या
मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत पक्षाचं धोरण निश्चित करण्यात आलं. भाकपचे राज्य सचिव
सुभाष लांडे तसंच राज्य सचिव मंडळ सदस्य नामदेव चव्हाण यांनी आज छत्रपती संभाजीनगर
इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परवा १४ ऑगस्ट रोजी जन सुरक्षा विधेयक विरोधी
कृती समितीची राज्यव्यापी परिषद मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये होणार आहे. त्रिभाषा
सूत्रास विरोध करण्यासाठी राज्यभर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. खासदार
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने थेट उत्तर द्यायला
हवं, असं
मतही या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आलं.
****
हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत
आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी
होण्याचं, आणि
येत्या स्वातंत्र्यदिनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन महापालिकेचे
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे –
बाईट - जी श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त
तथा प्रशासक
नांदेड जिल्ह्यात या अभियानांतर्गत
ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
यांच्या उपस्थितीत शहरातल्या महात्मा गांधी पुतळ्यापासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात
आला. जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भोकर, किनवट, हिमायतनगर या तालुका बसस्थानकांवरही स्वच्छता मोहीम राबवण्यात
आली.
हर घर तिरंगा या अभियानात सर्वांनी
उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी महानगपालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ. प्रभाकर
काळदाते यांनी केलं आहे. याअंतर्गत परभणी महामनगरपालिकेतर्फे आज हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत
तिरंगा सायकल फेरी काढण्यात आली. राजगोपालाचारी उद्यानात असलेल्या स्मृती स्तंभाला
अभिवादन करुन या सहा किलोमीटर अंतराच्या फेरीचा समारोप झाला. क्रीडा प्रेमी,
सायकलिस्ट,
विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने
यात सहभागी झाले होते. या फेरीत सहभागी झालेले सायकलपटू कल्याण देशमुख यांनी या फेरीबाबत
माहिती दिली –
बाईट - कल्याण देशमुख, सायकलपटू
लातूर शहरातही महानगरपालिकेतर्फे मोटार
सायकल फेरी काढण्यात आली. नागरिकांना महानगरपालिकेतर्फे तिरंगा ध्वज मोफत दिला जाणार
असून, प्रत्येकाने
आपल्या घरावर तिरंगा लावण्याचं आवाहन प्रशासनातर्फे या फेरीतून करण्यात आलं.
धाराशिव इथं हर घर तिरंगा अभियानाच्या
आयोजनाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी माहिती दिली –
बाईट - मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
३००व्या पुण्यतिथीनिमित्त कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने
“कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा
महाकुंभ २०२५” चे आयोजन करण्यात आलं आहे. उद्या मुंबईतल्या कुर्ला
क्रीडा संकुल इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महाकुंभचे उद्घाटन
होणार आहे. या महाकुंभात मल्लखांब, कबड्डी, खो-खो, भालाफेक, विटी-दांडू, कुस्ती, लगोरी यासारख्या सोळा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या
स्पर्धा होणार आहे.
****
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी
स्थानिक वस्तुंची खरेदी करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या व्यापारी संघटनांनी
केलं आहे. याबाबत व्यापारी वर्गाकडून शहरासह जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबवली जात
आहे.
****
बीड जिल्हा कारागृहात असलेला सतीश भोसले
उर्फ खोक्याला छत्रपती संभाजीनगर इथल्या हर्सुल कारागृहात हलवण्याचा निर्णय प्रशासनाने
घेतला आहे. कारागृहात बेकायदेशीररित्या गांजा आणणं तसंच गांजा वाटपावरून इतर कैद्यांसोबत
वाद घातल्या प्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक
विरेंद्र मिश्र यांनी आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तसंच धाराशिव या चार जिल्ह्यातल्या विविध कारवायांचा आढावा
घेतला. या चारही जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक या बैठकीला उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment