आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 31 December 2020
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** नव वर्षाचं स्वागत शांततेनं,
साधेपणानं करा- गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन
** परवा- शनिवारपासून कोरोना
विषाणू संसर्गावर लसीकरण सुरू होणार
** कोरोना विषाणू संसर्गाचे
जालन्यामध्ये २१ तर औरंगाबादमध्ये आठ नवे रुग्ण
आणि
** `फास्टॅग`
लावण्यासाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
****
कोरोना विषाणू संसर्गाचं
संकट संपलेलं नसून, राज्यातल्या जनतेनं नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं
आवाहन, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट,
पब, बार रात्री ११ पर्यंतच खुले राहणार असून, त्यानंतर सर्व आस्थापना बंद होतील असं
ते म्हणाले. जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर जावून औषधं आणणं, जेवण आणणं, यावर बंधन
नसून, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर मात्र बंधन असल्याचं,
देशमुख यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आज ३१ डिसेंबर आणि उद्या
एक जानेवारी असे दोन दिवस, रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. नवीन वर्षाचं
स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गर्दी होऊन, संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ
शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. औरंगाबादचे
पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास
सांगितलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या
नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं इतर आजारांच्या रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावं असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आरोग्य विभागातील पदभरतीला गती मिळावी
यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी
ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातली पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत
पूर्ण करावी, फिरतं शस्त्रक्रीया केंद्र सुरू करावं, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी
संगणक प्रणाली तयार करावी, असे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गवरचं लसीकरण परवा- शनिवारपासून सुरू
करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज सांगितलं. ते एका
उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाची पुरेशी
तयारी करण्याचं सांगितलं आहे. सर्व राज्यांत काही प्रमुख शहरांमध्ये या लसीकरणाचा अभ्यास
केला जाणार आहे. लसीकरणाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवणं आणि सहभागी लोकांना प्रशिक्षण
देणं हा या अभ्यासाचा उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव भुषण यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात तीन कोरोना विषाणू
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर २१ नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या
आता १३ हजार १६७ झाली असून जिल्ह्यात या संसर्गानं आतापर्यत ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला.
आज ४१ रुग्णांना या आजारानं बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. तर सध्या २८१ रुग्णांवर
रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या दोन कोविड बाधितांचा आज उपचारांदरम्यान
मृत्यू झाला.तर आठ नवे कोविड बाधित रुग्ण शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाले. जिल्ह्यात
आतापर्यंत एक हजार २०२ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत
४३ हजार ८७५ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून ४७३ रुग्णांवर सध्या उपचार
सुरू आहेत.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना
कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. त्यांना गेल्या तीन चार दिवसांपासून ताप आणि
सर्दीचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली असता हे स्पष्ट झालं.
अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीच्या निमित्तानं खडसे सध्या मुंबईत आहेत. डॉक्टरांनी
त्यांना १४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांनंतर ते या चौकशीला सामोरं
जाणार असल्याचं त्यांच्या कार्यालयानं कळवलं आहे.
****
केंद्रीय
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना `फास्टॅग` लावण्यासाठी येत्या १५
फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी एक
जानेवारीपासून `फास्टॅग` बंधनकारक असेल अशी घोषणा करण्यात आली होती. देशातल्या टोल
नाक्यांवर एक जानेवारीपासून रोख व्यवहार होणार नाहीत, फक्त `फास्टॅग` ग्राह्य धरले
जाईल असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जाहीर केलं होत. पण, आता `फास्टॅग`साठी
मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांचं नियोजन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या
अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या समितीनं याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळासोबत चर्चा करून या प्रस्तावांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
****
राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक चांगला पर्याय म्हणून
इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे असं मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं
आहे. इस्लामपूर इथल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या
उद्घाटनाच्यावेळी ते बोलत होते. साखर निर्मिती केल्यास माल गोदामात पडून राहतो आणि
त्यासाठी पोत्याला २५० ते ३०० रुपये व्याज भरावं लागतं, साखर तयार करण्यापेक्षा इथेनॉल
तयार करणं हे फायद्याचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक ऊस गळीत हंगामात
१०३ दिवस हा इथेनॉल प्रकल्प चालवून दररोज एक हजार टन ऊसाचं गाळप करून ७८ हजार लिटर
इथेनॉल तयार केलं जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरात चायनीज नायलॉन मांजा विक्रीस बंदी
घालण्यात आली आहे. औरंगाबाद आयुक्तालयाच्या हद्दीत चायनीज नायलॉन मांजा विकता येणार
नाही. पतंग विक्रेता हा मांजा विक्री करताना आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे
आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिले आहेत. चायनीज नायलॉन मांज्यामुळे
होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
मुंबई-गोवा
महामार्गावर रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात कशेडी घाटात आज पहाटे खासगी आरामबस
दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत.
आज पहाटे चार वाजता भोगाव इथं हा अपघात झाला. बस दरीत ५० फूट कोसळल्यानं झालेल्या या
अपघातातल्या जखमींना पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचा
गाडीवरील ताबा सुटल्यानं बस दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी
दिली आहे. मुंबईत शीव इथून काल रात्री ही बस कणकवलीकडे जाण्यासाठी निघाली होती. बहुतेक
प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरचे आहेत.
****
यंदाचं
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत व्हावं, यासाठी पुण्यातल्या सरहद संस्थेनं
पुढाकार घेत, तसं निमंत्रण साहित्य महामंडळाला दिलं असताना हे संमेलन नाशिक इथं व्हावं,
यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची लस येण्याच्या पार्श्वभूमीवर
३१ मार्चपूर्वी हे संमेलन आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
****////****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
आयुष्मान भारत
योजनेमुळे गरीब लोकांना चांगल्या उपचाराच्या संघर्षातून मुक्त केलं असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
गुजरातच्या राजकोट इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सची पायाभरणी केली, त्यानंतर
ते बोलत होते. देशात वैद्यकीय शिक्षण सुधारण्यासाठी सरकार मिशन मोड वर काम करत असून,
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणात सुधारणा होईल, आणि संस्थांची
संख्या वाढेल, असं पंतप्रधान म्हणाले. अंदाजे एक हजार १९५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात
येणारं हे रुग्णालय, २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. अत्याधुनिक ७५०
खाटांच्या रुग्णालयात ३० खाटांचा आयुष विभाग असेल, त्यात १२५ एमबीबीएस जागा आणि नर्सिंगसाठी
६० जागा असतील.
****
देशात कोविड
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९६ पूर्णांक शून्य चार शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.
काल २६ हजार १३९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ६० हजार २८० रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले आहेत. काल नव्या २१ हजार ८२१ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण
रुग्णसंख्या, एक कोटी दोन लाख ६६ हजार ६७४ इतकी झाली आहे. देशात कोरोनावर उपचार घेत
असलेल्यांची संख्या सातत्यानं घटत असून, सध्या सुमारे दोन लाख ५७ हजार ६५६ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. काल २९९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, आतापर्यंत या आजारानं
देशात एक लाख ४८ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातला कोविड मृत्यू दर एक पूर्णांक
४५ शतांश टक्क्यांवर स्थिर असून, हा जगातला सर्वांत कमी मृत्यूदर आहे.
****
देशात सर्वदूर
वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री
आर के सिंग यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या
१८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना करत असतानाही, देशात सुमारे
दोन कोटी ८० लाख नवीन ग्राहकांपर्यंत वीज पोहोचली, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक
घरात २४ तास वीज वितरित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही
त्यांनी दिली. गेल्या सहा-साडे सहा वर्षांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या
कार्यकाळात भारतानं अतिरिक्त वीज निर्मिती करणारं राष्ट्र असा दर्जा प्राप्त केला आहे,
भारत आता देशांतर्गत मागणी समवेत बांगलादेशसह इतर शेजारी राष्ट्रांनाही वीज पुरवण्यात
सक्षम झाल्याचं ऊर्जामंत्र्यांनी नमूद केलं.
****
देशात उद्यापासून
सर्व वाहनांवर फास्टटॅग लावणं बंधनकार असणार आहे. यामुळे प्रवाशांना पथकर नाक्यावर
थांबावं लागणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं गेल्या महिन्यात अधिसूचना जारी करुन,
एक डिसेंबर २०१७ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना देखिल फास्टटॅग अनिवार्य असल्याचं
सांगितलं होतं. आतापर्यंत दोन कोटी २० लाखहून अधिक फास्टटॅग जारी केले असल्याचं मंत्रालयानं
सांगितलं. देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सगळ्या पथकर नाक्यावर, तसंच तीन
हजारांहून अधिक अन्य ठिकाणी फास्टटॅग विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट
आणि स्नॅपडीलच्या माध्यमातूनही फास्टटॅग खरेदी करता येतील.
****
प्राप्तिकर
विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. लेखा परीक्षण
आवश्यक असलेले करदाते आणि कंपन्यांना येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत कर विवरणपत्र भरता
येणार आहे. विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे. वस्तू आणि
सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात
आली आहे. आता या व्यावसायिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करण्यात येईल.
****
राज्यात इथून
पुढे शहरांसाठी तयार करण्यात येणारे विकास आराखडे जीआयएस प्रणालीवर आधारित केले जाणार
आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातल्या प्रथम अशा या प्रस्तावाला मंजुरी
दिली असून, नगरविकास विभागानं यासाठी तज्ज्ञ पात्र संस्थांची निवड सूची काल प्रकाशित
केली. राज्याचं झपाट्यानं नागरीकरण आणि त्याचा रेटा वाढत असताना शहरांचा नियोजनबद्ध
विकास हे मोठं आव्हान होऊन बसलं आहे. यासाठी जीआयएस म्हणजेच भौगोलिक माहिती यंत्रणेवर
आधारित विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जानेवारी २०१९ मध्येच घेतला
होता.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण
भागातही आज ३१ डिसेंबर आणि उद्या एक जानेवारी असे दोन दिवस, रात्री ११ ते सकाळी सहा
वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं
परिपत्रक जारी केलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात
गर्दी होऊन, कोविडचा प्रादूर्भाव होऊ शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं
या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त
निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास सांगितलं
आहे.
//*************//
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ३१ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून गुजरातच्या राजकोट येथे अखिल भारतीय
आयुर्विज्ञान संस्था - एम्सची पायाभरणी करणार आहेत. या वेळी गुजरातचे राज्यपाल, गुजरातचे
मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्री देखील उपस्थित राहणार
आहेत. या प्रकल्पासाठी २०१ एकर जागा देण्यात आली आहे. अंदाजे एक हजार १९५ कोटी रुपये
खर्चून ते बांधण्यात येईल आणि २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. अत्याधुनिक
७५० खाटांच्या रुग्णालयात ३० बेडचा आयुष विभाग असेल. त्यात १२५ एमबीबीएस जागा आणि नर्सिंगसाठी
६० जागा असतील.
****
अन्नधान्यापासून
इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी एका नव्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल
मंजूरी दिली आहे. धान, गहू, मका, ऊस यापासून उच्च दर्जाच्या इथेनॉलची निर्मिती केली
जाईल, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. या साठी चार हजार
५७३ कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. भारताला २०३० पर्यंत एक हजार कोटी लिटर इथेनॉलची
गरज भासणार आहे. सध्या देशात ६८४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली जात असून, भविष्यकाळात
इथेनॉलची आयात पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील. यासाठी दिल्या
जाणाऱ्या कर्जाच्या व्याजावर एक वर्षासाठी माफी मिळणार असून याचा खर्च सरकार उचलणार
आहे.
****
आकाश या देशी
बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रीमंडळानं परवानगी दिली आहे.
आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन
आणि विकास संस्थेनं केली आहे. आकाश ची मारक क्षमता २५ किलोमीटर इतकी आहे. या माध्यमातून
मित्र देशांशी सामरिक संबंध सुधारण्याचेही केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.
****
नांदेड विभागानं दक्षिण मध्य
रेल्वे क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बदल या वर्षी तीन पुरस्कार मिळवले
आहेत. दरम्यान, नांदेड
दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात काल रेल्वे सप्ताह निमित्त झालेल्या
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आले.
****
हिंगोली शहरात
रिसालाबाजार भागात दगड लागण्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी होऊन दगडफेक झाल्याची
घटना काल रात्री घडली. या दगडफेकीत पाच ते सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
//*********//
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
**
कृषी कायद्यासंदर्भात आंदोलन करणारे शेतकरी
आणि सरकारमध्ये ५० टक्के मागण्यांवर सहमती
**
राज्यात कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत जारी मार्गदर्शक सूचना ३१ जानेवारीपर्यंत कायम
**
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही आज आणि उद्या रात्रीची संचारबंदी लागू
**
प्राप्तिकर तसंच जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र
दाखल करण्यास मुदतवाढ
**
प्राचीन मंदिरं, लेण्या आणि शिल्पांच्या जतन संवर्धनाची जबबादारी
राज्य रस्ते विकास महामंडळाकडे
**
राज्यात तीन हजार ५३७ नवीन कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या
२६८ रुग्णांची नोंद
आणि
** ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कालपर्यंत दाखल अर्जांची आज छाननी
****
कृषी कायद्यासंदर्भात आंदोलन करणाऱ्या
शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेत ५० टक्के मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती, केंद्रीय कृषी
मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. ते काल या चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर पत्रकारांशी
बोलत होते. वीज वापरावर शेतकऱ्यांना राज्य सरकारांकडून मिळणारं अनुदान पूर्वीप्रमाणे
कायम ठेवावं, तसंच पिकांचे खुंट जाळल्यास शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असलेल्या
प्रदूषण नियंत्रण अध्यादेशातही दुरुस्ती करावी, या दोन मागण्या मान्य केल्या असून,
किमान हमी भाव तसंच तीन कृषी कायद्यांवर, येत्या चार तारखेला होणाऱ्या पुढच्या बैठकीत
चर्चा होईल, अशी माहिती तोमर यांनी दिली. किमान हमी भाव कायम राहणार असल्याचं लेखी
आश्वासन देण्यास केंद्र सरकार तयार असून, शेतकरी मात्र या आश्वासनाला कायद्याच्या चौकटीत
बसवण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं, तोमर यांनी सांगितलं.
****
देशात
पंजाब आणि हरयाणा सोडता कुठेही शेतकऱ्यांचा उद्रेक दिसत नाही, त्यामुळे शेतकरी आंदोलनाला
देशातल्या कोणत्या राज्यात, कितपत जनसमर्थन आहे, असा सवाल कृषी मूल्य आयोगाचे माजी
अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला आहे. ते काल अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. खासदार
शरद पवार यांचा कायद्याला विरोध नसून, विधेयक मांडण्याच्या पद्धतीला विरोध असल्याकडे
त्यांनी लक्ष वेधलं. पवार कृषी मंत्री असताना त्यांनी या विधेयकासाठी समिती तयार केली
होती, या कायद्याचा मसूदाही तयार झाला होता. मात्र ते राज्यसभेचे सदस्य असूनही या विधेयकावर
चर्चा होत असताना गैरहजर का राहिले याचं उत्तर शोधावं, असंही पटेल म्हणाले.
****
दिल्लीतल्या शेतकरी
आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातले शेतकरी येत्या तीन जानेवारीला
दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या
तुकड्या दोन जानेवारीला नाशिक इथं एकत्र जमून नागपूरमार्गे
दिल्लीला रवाना होतील, असं त्यांनी सांगितलं.
****
ब्रिटनसोबतच्या
विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये
कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी ही विमानसेवा आजपर्यंत स्थगित करण्यात आली होती, ही स्थगिती आता आणखी आठवडाभर
वाढवण्यात आली आहे. दरम्यान, देशात २० रुग्णांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं
आढळलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम
हाती घेतली आहे. वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी या मोहिमेत
सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं
आहे.
****
पोलिसांसाठी
सेवेच्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची
गरज असून, त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या
बैठकीत बोलत होते. पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थानं उपलब्ध करून देण्याची
आवश्यकता असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधाबाबतचे नियम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य
सरकारनं घेतलं आहे. यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केली. दरम्यान,
कोरोना विषाणूचं संकट संपलेलं नसून, राज्यातल्या जनतेनं नववर्षाचं स्वागत शांततेनं
आणि साधेपणानं करण्याचं आवाहन, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. नववर्षाच्या
स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार रात्री ११ पर्यंतच खुले राहणार असून, त्यानंतर
सर्व आस्थापना बंद होतील असं ते म्हणाले. जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर जावून
औषधं आणणं, जेवण आणणं, यावर बंधन नसून, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र
येण्यावर मात्र बंधन असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी
करण्याचे आदेश राज्यभरातल्या सर्व पोलिस आयुक्त आणि अधिक्षकांना दिल्याचंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही आज ३१ डिसेंबर आणि उद्या एक जानेवारी असे दोन दिवस,
रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या
ग्रामीण भागात गर्दी होऊन, कोविडचा प्रादूर्भाव होऊ शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला
असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
औरंगाबादचे
पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास
सांगितलं आहे. ते म्हणाले...
यावर्षी
नविन वर्षाच्या आगमनावर प्रत्येक वर्षाप्रमाणे आनंद आपण साजरा करणार आहोत.मात्र, कोरोनाच्या
प्रार्दुभावाने राज्य शासनाने नियमावली तयार केलेली आहे. आपण जास्त प्रमाणात लोकांनी
गोळा होवून या प्रकाराचा आनंद साजरा करु नये.साध्या पद्धतीने आपल्या कुटुंबासोबत घरातच
राहून आपल्याला आनंद साजरा करायचा आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर नूतन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने घरी राहूनच करावं, असं आवाहन
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे. नागरिकांनी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही मुगळीकर
यांनी केलं आहे.
****
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १० जानेवारी
२०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. लेखा परीक्षण आवश्यक असलेले करदाते आणि कंपन्यांना
येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत कर विवरणपत्र भरता येणार आहे. विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ
देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र
दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात आली आहे. आता या व्यावसायिकांना २८
फेब्रुवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल. ‘विवाद से विश्वास तक’ योजनेनुसार नागरिकांनी
स्वत:हून संपत्तीचा खुलासा करण्याची मुदतही ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
राज्यातले प्राचीन मंदिरं तसंच लेण्या आणि शिल्पांचं जतन संवर्धन करण्याची जबबादारी
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय
काल जारी करण्यात आला. या वास्तुंना आंतरराष्ट्रीत दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी महत्त्वकांक्षी
योजना सरकारनं आखली असून, त्यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती.
****
राज्यात काल तीन हजार ५३७ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्णसंख्या १९ लाख २८ हजार ६०३ झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ४६३ झाली
असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका कायम आहे. काल चार हजार ९१३ रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख २४ हजार ९३४ रुग्ण,
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ६२ शतांश टक्के इतका
झाला आहे. सध्या राज्यात ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २६८ रुग्णांची
नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात दोन, तर जालना, लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी
एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ६८ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ६५, जालना आणि बीड
जिल्ह्यात प्रत्येकी ३५, लातूर २६, उस्मानाबाद २२, परभणी नऊ तर हिंगोली जिल्ह्यात काल
कोविड संसर्ग झालेले आठ नवीन रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद शहरातील २९ वर्षीय तरुणीला नोकरीचं अमिष दाखवून
अत्याचार करणं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
महेबूब शेख याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीनं करण्यात
आली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांना या मागणीचं निवेदन परिषदेच्या वतीनं सादर करण्यात
आलं. या घटनेच्या निषेधार्थ
काल भाजपच्या वतीनं पक्षाचे नेते चंद्रशेखर बानवकुळे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद इथं
क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली.
दरम्यान,
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश
तपासे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपनं राजकीय फायद्यासाठी
रचलेलं हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी
केला. स्वतः महेबूब शेख यांनी नार्को चाचणी करण्याची मागणी पोलिसांकडे केली असल्याचं तपासे यांनी सांगितलं. महेबूब
शेख यांनीही यावेळी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली.
****
परभणी जिल्ह्यातला पोलिस कर्मचारी विनायक भोपळे याला जिल्हा
पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी काल
निलंबित केलं. भूखंड घेऊन देण्यासाठी धनादेशाद्वारे ९० हजार
रुपये घेऊन फसवणूक करणाच्या, तसंच चार
महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड यांनी केलं आहे.
****
ग्रामपंचायत
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी
अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.
औरंगाबाद
जिल्ह्यात ६११ ग्रामपंचायतींसाठी एकूण १७ हजार ४२६ अर्ज, उस्मानाबाद
जिल्ह्यात ४२८ ग्रामपंचायतींसाठी नऊ हजार ८२५ अर्ज, तर बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतीसाठी
३ हजार ६६० अर्ज दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी महसूल मंडळ
निहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तहसील कार्यालयामध्ये केली होती. नांदेड तसंच परभणी
जिल्ह्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं
आहे. कालपर्यंत दाखल अर्जांची आज छाननी होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केलेल्या गावांच्या
यादीत नजरचुकीने शिरुर नगरपंचायतीचं नाव दर्शवण्यात आलं होतं. त्यात बदल करुन या हद्दीतली आचार संहिता रद्द करण्यात
आली आहे. जिल्ह्यात उर्वरित १२९ ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता आदेश कायम आहे.
****
राज्यातल्या
सर्व जात पडताळणी समित्यांनी आज आणि उद्या ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय आणि
विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने
तसंच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानं हा निर्णय घेतल्याचं मुंडे
यांनी सांगितलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या गंगाखेड नगर पालिकेचा कार्यालयीन अधीक्षक सुरेश सत्यनारायण मणियार याला
नगर पालिका कार्यालयात दीड हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहात पकडण्यात आलं. प्लॉटची
नोंद नगर पालिकेच्या मालमत्ता पुस्तिकेत करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
सशस्त्रसेना
ध्वजनिधीसाठी नांदेड जिल्ह्यातून १ कोटीपेक्षा अधिक देणगी जमा करण्याचा निर्धार करण्यात
आला असून देणगीदारांना सशस्त्र सेना ध्वजनिधीस सुलभ पद्धतीनं देणगी देता यावी यासाठी
क्युआर कोडची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने अशा प्रकारे
हा कोड तयार केला आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसर आणि सुधाकरनगर इथं वीजचोरी करणाऱ्या ५ ग्राहकांवर महावितरणने
कारवाई केली आहे. या ग्राहकांनी ४ हजार ९८५ युनिटची वीजचोरी करून महावितरणचं ७० हजार
रुपयांचं नुकसान केल्याचं उघडकीस आलं आहे.
****
नांदेड
वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक विरेंद्रसिंग
बलवंतसिंग गाडीवाले यांची काल बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी गाडीवाले यांचा एकमेव
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे
****
२०२०-२१ च्या
हंगामामधील तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने सहा हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चित
केला असून या
खरेदीसाठी नाफेड तर्फे उस्मानाबाद
जिल्हयात तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातही गेवराई इथल्या खरेदी विक्री संघाच्या
वतीनं शासकीय हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी उमापूर तसचं राक्षसभुवन इथल्या उपबाजारपेठेत
ऑनलाईन नोंदणी केंद्र सुरु करण्यात आलं आहे.
//************//
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...