Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
****
वेगानं होणाऱ्या
शहरीकरणाच्या माध्यमातून सरकार आव्हानांचं संधीत रुपांतर करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइन इथून दूरदृश्य
संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या पहिल्या चालकविरहित मेट्रो रेल्वेची सुरुवात
केली, त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर त्यांनी विमानतळ एक्सप्रेस मार्गावरील पूर्णपणे
कार्यरत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचंही उद्घाटन केलं. यामुळे देशातल्या कोणत्याही
भागातून जारी केलेलं रुपे-डेबिट कार्ड असलेल्या क्यक्तिला ते कार्ड वापरुन विमानतळ
एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येईल. ही सुविधा २०२२ पर्यंत संपूर्ण दिल्ली मेट्रो
नेटवर्कवर उपलब्ध होईल. भविष्यातल्या गरजा पाहता शहरांचा पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न
होत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
जागतिक कोविड
संकटाविरुद्धच्या या लढाईत भारतानं अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यांत
कोविड १९ च्या नवीन बाधितांच्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट होऊन, ही संख्या १९ हजारांपेक्षा
कमी झाली आहे. त्याबरोबरच उपचाराखालील रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली
आहे. देशात एकूण कोरोना बाधितांच्या तुलनेत, उपचार घेणाऱ्या रुग्णांचं प्रमाण दोन पूर्णांक
७४ दशांश टक्क्यांवर आलं असून, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता लक्षणीयरित्या वाढताना
दिसत आहे.
देशात कोविड
19 चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ते ९५ पूर्णांक ८२ शतांश टक्के झालं आहे. काल
२१ हजार १३१ रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत ९७ लाख ८२ हजार ६६९ रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या २० हजार २१ रुग्णांची नोंद झाली, तर २७९ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या एक कोटी
दोन लाख सात हजार ८७१ झाली असून, मृत्यूंची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ९०१ झाली आहे.
देशात सध्या दोन लाख ७७ हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सात लाख १५ हजार ३९७
कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ८८ लाख १८ हजार ५४ चाचण्या
करण्यात आल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
ब्रिटन, युरोप
आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्यात आलं
असून, त्यांची कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचं
मुंबई पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या
दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात
सुमारे १० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणार असून याची प्रात्यक्षिकं दोन जिल्ह्यांमध्ये
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
****
मुंबई-अहमदाबाद
बुलेट ट्रेनला महाराष्ट्रात जागा मिळण्यास विलंब झाल्यास, फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन
चालवली जाईल, असे संकेत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिले आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही
योजना तयार करत आहोत. परंतु त्यासाठी जर जागा उपलब्ध करून देण्यास उशीर झाला, तर पहिल्या
टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचीही तयारी आम्ही करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रीय हायस्पीड
रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया
गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी
भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेनं
मागील आठवड्यात माघारी पाठवला, त्यामुळे या प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
गेल्या चार दिवसांपासून कमी झालेली थंडी पुन्हा वाढली आहे. आज दहा पूर्णांक चार अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
पतंजली योग समितीच्या
जालना इथल्या ३१ दिवसीय मोफत योग प्रशिक्षणाचा काल रक्तदान शिबीरानं समारोप झाला. कोविड
पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या रक्ततुटवड्यामुळे शासनानं केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला
प्रतिसाद देत, या शिबिरात १०० जणांनी रक्तदान केलं.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या
पाथर्डी तालुक्यात देवराईजवळ खासगी बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच
मृत्यू झाला. काल मध्यरात्री हा अपघात झाला. खासगी बस पुण्याहून नांदेडकडे जात होती.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजचा तिसऱ्या दिवसाचा खेळ
थांबला असून, ऑस्ट्रेलियाकडे दोन धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियानं दिवसअखेर दुसऱ्या
डावात सहा बाद १३३ धावा केल्या. रविंद्र जडेजानं दोन, तर जसप्रित बुमराह, उमेश यादव,
मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी आजच्या
दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला.
**//**
No comments:
Post a Comment