आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
कर्णधार अजिंक्य
रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मेलबर्न इथं झालेल्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.
भारताची पहिल्या डावातली १३१ धावांची आघाडी भरुन काढण्यासाठी फंलदाजीस उतरलेला ऑस्ट्रेलियाचा
संघ, ७० धावांची आघाडी घेऊन, २०० धावात तंबूत परतला. मोहम्मद सिराजनं तीन, जसप्रित
बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन, तर उमेश यादवनं एक गडी
बाद केला. भारतानं दुसऱ्या डावात दोन गडी गमावत विजयाचं लक्ष्य साध्य केलं. शुभमन गिल
३५, तर अजिंक्य रहाणे २७ धावांवर नाबाद राहीले. पहिल्या डावात शतकी खेळी खेळणारा रहाणे
सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत
एक - एक अशी बरोबरी साधली आहे.
****
ब्रिटनहून भारतात
आलेल्या सहा जणांना कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. यातले तीन प्रवासी
बंगळूरु इथले, दोन हैदराबाद आणि एक पुणे इथला आहे. या प्रवाशांसह त्यांच्या संपर्कात
आलेल्या व्यक्तींना विलगीरकणात ठेवण्यात आलं आहे. या प्रवाशांच्या सहप्रवाशांचाही शोध
सुरु असल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोविड लसीकरणाच्या
बनावट अभियानाबाबत सावध राहण्याचं आवाहन औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयानं केलं आहे.
सामाजिक संपर्क माध्यमावरून लसीकरणाची खोटी माहिती देऊन, आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता
आहे. नागरिकांनी अशा बनावट अभियानापासून सावध राहून, कोणालाही आपले आधारकार्ड, डेबिट
अथवा क्रेडीट कार्ड, बँक खाते अथवा अन्य माहिती देऊ नये, असं आवाहन पोलिस विभागानं
केलं आहे.
****
राज्य पाठ्यपुस्तक
आणि अभ्यासक्रम निर्मिती मंडळ - बालभारतीनं अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या, विषय
समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. २०१४ मध्ये तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद
तावडे यांनी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना केली होती.
****
ओखा-रामेश्वरम-ओखा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस या गाडीला दिनांक १ जानेवारी ते
२ फेब्रुवारी, २०२१ दरम्यान मुदत वाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती
देण्यात आली.
****
नाशिक शहरातल्या द्वारका चौफुलीवर दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेची पतंगाच्या मांजाने
मान कापली गेल्यानं मृत्यू झाला. ४६ वर्षीय ही महिला काल संध्याकाळी काम संपवून घरी
जात असताना ही दुर्घटना घडली.
**//**
No comments:
Post a Comment