Thursday, 24 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७५ शतांश टक्के

** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे सात नवे रुग्ण

** सक्त वसुली संचालनालयाकडून गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड कंपनीची २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक  

आणि

** औरंगाबाद विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची केंद्रीय पाहणी पथक प्रमुखांची ग्वाही

****

देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून, ते ९७ पूर्णांक ७५ शतांश टक्के झालं आहे. काल ३० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९६ लाख ९३ हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. काल नव्या २४ हजार ७१२ रुग्णांची नोंद झाली, तर ३१२ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी ९९ हजार ५६० इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४६ हजार ७५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका आहे. देशात सध्या दोन लाख ८३ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या संसर्ग तपासणीसाठी काल सुमारे १० लाख ३९ हजार चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ५३ लाख चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.  

****

औरंगाबाद शहरातल्या सिडको एन ५ इथल्या एका ५५ वर्षीय कोविड बाधित महिलेचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५ हजार १४१ झाली असून १ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज आठ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं सुटी देण्यात आली.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी केलं आहे. 

****

शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळे इथली सुमारे २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागानं आज या प्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये परभणीच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ६ बँकाकडून सुमारे ३२८ कोटींचे कर्ज घेतलं होतं. गुट्टे यांनी शेतकऱ्याच्या नावे उचलेल्या कर्जाची रक्कम गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातून त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये लावली होती, ज्यांच्यावर आता सक्त वसुली संचालनालयानं कारवाई केली आहे. सक्त वसुली संचालनालयानं काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची २४७ कोटी रुपये किंमतीची यंत्रं त्याचप्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे  इथल्या बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकीचे समभाग आदी मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना केंद्र सरकारनं पुन्हा एकदा चर्चेसाठी पत्र पाठवून आमंत्रित केलं असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी दिली आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पत्र लिहून सरकार मोकळ्या मनानं शेतकऱ्यांसोबत चर्चेला आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरं द्यायला तयार असल्याचं या पत्रात नमुद करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

नवीन कृषी कायद्यामुळं शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार असून हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत असं भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. मराठा समाजातल्या तरुणांना आर्थिक दुर्बल घटकांसाठीची सवलत देणं हे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असून उशिरा घेतलेल्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांचं एक वर्षांचं शैक्षणिक नुकसान झालं असल्याचं शेलार म्हणाले.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि संपन्नता घेवून येवो, अशी प्रार्थना राज्यपालांनी आपल्या संदेशाद्वारे केली आहे. यंदाचा नाताळ आपण सर्वांनी उत्साहात, आनंदात साजरा करत असताना राज्य शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करुन साजरा करावा, असं नमुद करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

औरंगाबाद आणि पुणे विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख रमेशकुमार यांनी दिली आहे. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा या पथकानं प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. या विभागात सोयाबिन, उडीद, तूर, कापूस, बाजरी या पिकांचं तसंच पालेभाज्या आणि फळांचं मोठं नुकसान झालं आहे. याचबरोबर रस्ते, वीज, घरे यासारख्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला असल्याचं दिसून आलं असल्याचं पथकातल्या सदस्यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसंच धार्मिक स्थळावर गर्दी करु नये, असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं आहे. कोरोना विषाणू संदर्भातल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या घटली असली तरी या आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव थांबला नसल्याचं सांगून नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहनही दिवेगावकर यांनी केलं आहे.

****

परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून आज पहाटे ८ पुर्णांक २ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ७४ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही माहीती दिली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये ३२ हजार २३८ गुन्हे नोंदविण्यात आले असून १९ हजार ४६२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय २ हजार ६६३ वाहनं जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिली.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीष महाजन यांनी आज राळेगणसिद्धी इथं अण्णांची भेट घेतली. हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता. यापूर्वीही पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागं घेण्याची विनंती केली होती.

****

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करुन चोरलेली १५ लाख रुपये किंमतीची वाहनं जप्त केली आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले तीन आणि आखाडा बाळापूर इथला एक अश्या या चार दुचाकी चोरांनी २३ दुचाकी चोरल्या आहेत.

****

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध तसंच सफाई कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले आहेत.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...