आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 31 July 2020
AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.07.2020 18.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जुलै २०२०
सायंकाळी ६.००
****
§
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम
वर्षांच्या परीक्षा स्थगित करण्याच्या याचिकांवर अंतरिम निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा
नकार
§
अभिनेता सुशांतसिंह राजपूत
मृत्यू प्रकरणी
ईडीकडून काळा पैसा वैध करण्यासंबंधी गुन्हा दाखल
§
औरंगाबाद इथं चार तर उस्मानाबाद इथं आज एका कोविडग्रस्ताचा
मृत्यू
§
औरंगाबाद नजिक शेंद्रा इथल्या तलावात पाच तरुणांना
जलसमाधी
आणि
§ महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजातल्या सकारात्मक बाबी समोर येणं आवश्यक -
अशोक चव्हाण यांचं मत
****
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा स्थगित करण्याच्या
याचिकांवर अंतरिम निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी केंद्रीय
गृह विभागानं आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला
दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम
वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. ही परीक्षा रद्द
करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय हाताळत असल्यामुळे, सप्टेंबरमध्ये नियोजित परीक्षा स्थगित
होतील, या संभ्रमात कोणीही राहू नये, असं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. या
प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १० ऑगस्टला होणार आहे.
*****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय
- ईडीने काळा पैसा वैध करण्यासंबंधी गुन्हा दाखल केला आहे. बिहार पोलिसांनी सुशांतची
मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या प्राथमिक माहिती
अहवाल - एफआयआरची दखल घेत, अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल - इसीआयआर दाखल करण्यात
आला आहे. सुशांतचा मृत्यू आणि त्याच्याशी संबंधित असलेले संशयास्पद आर्थिक व्यवहार
याचा तपास या अंतर्गत केला जाणार आहे. सुशांतच्या उत्पन्नाचा काळा पैसा वैध करण्यासाठी
तसंच बेनामी मालमत्ता उभारण्यासाठी वापर केला जात होता का, याचा शोधही घेतला जाणार
आहे. गेल्या १४ जूनला राहत्या घरी सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
****
औरंगाबाद मध्ये आज चार कोरोना
विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात पैठण इथल्या ९५ वर्षीय महिलेसह, बाजार सावंगी
इथला ७१ वर्षीय, वैजापूर इथला ६७ वर्षीय आणि गेवराई इथल्या ४० वर्षीय पुरुषाचा समावेश
आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता ४७३ झाली आहे. दरम्यान,
आज सकाळी जिल्ह्यात नवे ४८ कोविडबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची
संख्या आता १३ हजार ८९० झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात आज एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू
झाला, तर १७४ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातली
कोविड बाधितांची संख्या आता एक हजार १६३ झाली आहे. त्यापैकी ५१४ रुग्ण
आतापर्यंत कोविड संसर्गातून मुक्त
होऊन घरी परतले
आहेत. तर ६०० रुग्णांवर जिल्ह्यातल्या विविध
रुग्णालयात सध्या
उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत
४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड विषाणू संसर्गाची लक्षणं सौम्य असणाऱ्या
रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:च्या घरी राहून उपचार घेता येणार आहेत. उस्मानाबादचे
पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना संसर्गाचा आढावा
घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्यांची
संख्या वाढवण्यात येणार असून, त्यासाठी दहा हजार रॅपिड अँटिजेन किट्स उद्यापर्यंत जिल्ह्यात
येतील, अशी माहिती त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील
कोविड चाचणी प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचंही गडाख यांनी
सांगीतलं.
****
औरंगाबादचे खासदार सय्यद
इम्तियाज जलील यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बालरोग विभागाला
६० लाख रुपये किंमतीचे पाच व्हेंटिलेटर दिले आहेत. घाटीत लहान मुलांचे आतापर्यंत फक्त
तीनच व्हेंटिलेटर होते. त्यामुळे अनेक अत्यवस्थ बालकांना उपचार सुरु होण्यास विलंब
झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याअनुषंगानं जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेसाठी स्थानिक
विकास निधीतून एक कोटी रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली होती. त्यानिधीतून हे व्हेंटीलेटर
देण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद
नजिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीतल्या नाथनगर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा
आज बुडून मृत्यू झाला. समीर शेख, शेख अब्बार, अतिक युसुफ शेख, ताकेब युसुफ शेख, साहेल
युसुफ शेख अशी मृतांची नावे आहेत. पाचही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असल्याची
माहिती महापालिकेच्या अग्निशमक विभागानं दिली आहे.
****
महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजातल्या सकारात्मक बाबी समारे
येणं आवश्यक आहे, असं मत
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. ते आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. कर्नाटक
आणि मध्यप्रदेशात ज्याप्रमाणे सत्ताबदल झाला, तसा प्रकार महाराष्ट्रात शक्य नसल्याचं
चव्हाण यांनी सांगितलं. राज्य सरकार म्हणून महाविकास आघाडीतले तीनही पक्ष व्यवस्थित
काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांनी टीका करतानाच, राज्याच्या महत्त्वाच्या
प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये, असं चव्हाण यांनी नमूद केलं.
****
देशातले पाच टक्के लोक हे
कोरोना विषाणू संसर्गाच्या गंभीर स्थितीत आहेत. त्यामुळे इतर जनतेला वेठीस धरणे अयोग्य
असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शासनाच्या अहवाला नुसार ८० टक्के लोकांमध्ये कोविड
प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. उर्वरित २० टक्क्यांपैकी १५ टक्के लोकांना लक्षणे
दिसू शकतात, तर पाच टक्के लोक हे गंभीर स्थितीत आहेत. त्यांच्यावर शासनानं लक्ष केंद्रीत
करावं असं ते यावेळी म्हणाले. टाळेबंदी अमान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य
हे त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेलं असून अण्णाभाऊंनी ग्रामसंस्कृती सोबतच
गावकुसाबाहेरच्या भटक्या, वंचित लोकाचं कष्टमय जगणं पहिल्यांदाच साहित्यात आणल्याचं
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉक्टर विजय चोरमारे यांनी म्हटलं आहे. अण्णाभाऊ साठे
यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे आज ऑनलाईन व्याख्यान घेण्यात
आलं, डॉ संजय शिंदे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. केंद्राचे संचालक डॉ. डी एम
नेटके आणि डॉ कैलास अंभुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
****
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार
समिती जाधववाडी आणि उप बाजारपेठ करमाड इथल्या विविध विकासकामांचं आणि जाधववाडी इथं
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण केंद्रीय अन्न नागरी पुरवठा
आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज झालं. छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण करतांना, महापुरुषांचे पुतळे हे सर्वांना
प्रेरणा देण्याचं कार्य करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली इथं रेल्वे विभागाच्या
मोकळ्या जागेत केंद्र सरकारच्या अन्नपुरवठा विभागाकडून ५० लाख मेट्रीक टन क्षमतेच्या
गोदाम बांधण्याला अन्न महामंडऴाची मान्यता मिळाली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी आज
हिंगोली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान
यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत मागणी केली होती. याबाबत गेल्या १८ जूनला
संबंधित विभागांसोबत बैठक झाली होती. या गोदामाचा हिंगोलीसह नांदेड, वाशिम, परभणी आणि
यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगीतलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या
मानवत तालुक्यातील ताड बोरगाव जवळ दोन मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात एकजण जागीच
ठार तर एकजण जखमी झाला आहे. जखमीला परभणी इथं जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात
आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
हिंगोली जिल्ह्यात टाळेबंदीमुळे बंद असलेल्या सर्व आस्थापना, प्रतिबंधित उद्योग या सर्वांना
एक ऑगस्टपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अटी तसंच
नियमांच्या अधीन राहून कामकाज सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यातील
क्रीडा मैदाने,
क्रीडा संकुले तसंच सार्वजनिक
खुले मैदाने वैयक्तिक व्यायामाकरिता चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा
नजरबंदीचा काळ तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला जम्मू काश्मीर
राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून
मुफ्ती यांच्यासह किमान शंभराहून अधिक नेत्यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात
आलं होतं.
//***********//
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविड बाधितांची संख्या १६ लाखांवर पोहोचली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात
देशभरात तब्बल ५५ हजार ७८ नवे रुग्णं आढऴले आहेत. ही आता पर्यतची सर्वाधिक वाढ
आहे. त्यामुळे आता देशातली कोविड बाधितांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७० झाली आहे.
यापैकी १० लाख ५७ हजार रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून, सध्या देशात ५
लाख ४५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ६४ पूर्णांक ५४
शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ३५ हजार ७४७ रुग्णांचा या संसर्गाने
मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक १८ शतांश टक्के झाल्याचं आरोग्य
मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान,
देशात एक हजार ३३१ प्रयोगशाळांच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी ८८ लाख
नमुन्यांची कोविड संसर्ग चाचणी करण्यात आली आहे.
****
पुणे
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ३ हजार ६५८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे
पुणे जिल्ह्यात या रुग्णांची संख्या ८१ हजार ७७१ झाली आहे. यापैकी २ हजार ४०२
रुग्ण महापालिका क्षेत्रातले आहेत. या आजारानं काल जिल्ह्यात ६४ रुग्णांचा मृत्यू
झाला, त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्यांची संख्या १ हजार ९२२ झाली आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात काल दिवसभरात ८९३ नवे कोविड बाधित आढळले, त्यामुळे पिंपरी
चिंचवड इथली रुग्णसंख्या २० हजार ६८६ वर पोहोचली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी ४८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका
हद्दीतल्या ३२ आणि ग्रामीण भागातल्या १६ रूग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात
तीन हजार ४६० रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची एकूण संख्या तेरा हजार ८९० झाली
आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित ४११ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३६० रुग्ण कोरोना
विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
परभणी
शहरात दर्गा रोड परिसरातल्या ६० वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा आज
उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील
सेवानिवृत्त कर्मचारी असणाऱ्या या व्यक्तीला १७ जुलैला उपचारांसाठी दाखल केलं
होतं.
****
अमरावती
जिल्ह्यात आज कोविड-19 चे नवे १३ रुग्ण आढळले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून
ही माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण कोविड बाधितांची संख्या आता २ हजार ७८ झाली
आहे.
****
महाविकास
आघाडीत मतभेद असले तरी तिघांत चांगला समन्वय असून, चांगलं काम व्हावं हीच आमची
भावना आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाऴासाहेब थोरात यांनी
म्हटलं आहे. ते आज एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. समान
किमान कार्यक्रमावर आमचा भर असून कोणताही निर्णय आम्ही एकमतानं घेतो, असं ही थोरात
म्हणाले. टाळेबंदीमुळे महसूल कमी झाला असून वस्तू आणि सेवा कराच्या कमतरतेमुळे
अर्थ खात्याला अडचणी असल्याचंही थोरात यांनी सांगितलं.
****
कोरोना
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीच्या काळात अनेक उद्योग,
व्यवसाय ठप्प झाले. मात्र मिशन बिगेन अगेन मध्ये अनेक उद्योगधंद्यांना परवानगी
दिल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते आज एका खासगी
वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. महापरवाना योजने अंतर्गत ४८ तासांत
उद्योगांना परवानगी देण्यात येत असल्याचंही उद्योग मंत्र्यांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, असं विधानसभेचे विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या
मुलाखतीत ते बोलत होते. उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री झाले असले तरीही आता बराच
काळ झाला आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या समन्वयातून निर्णयक्षमतेचा वापर व्हायला
हवा, असं मतंही फडणवीस यांनी व्यक्त केलं. तीन चाकांच्या सरकारला अपेक्षित गती
साधता येत नसल्याचं सांगतानाच, मुख्यमंत्री – मंत्री आणि प्रशासन यांच्यात
समन्वयाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
उस्मानाबाद
शहरातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता
जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शहरात उद्या एक ऑगस्टपासून दुचाकी वाहनांना प्रतिबंध
केला आहे. या आदेशानुसार फक्त शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतल्या
व्यक्तींनाच या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
****
जम्मू
काश्मीरमध्ये शहरं, गावं तसंच खेड्यांमध्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीस
सेवा सुविधा पोहोचाव्यात यासाठी अनेक ठोस पावलं उचलली जात आहेत. याच अनुषंगाने
सरकारी कार्यालयातले पाच हजार अधिकारी आणि कर्मचारी गावागावात थेट जनतेशी संपर्क
साधून विकासासंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करत आहेत. या राज्यात राबवला जाणारा
अशाप्रकारचा हा पहिलंच अभियान आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोविडसंदर्भात जनतेच्या मनात असलेली भीती कमी होण्यासाठी
उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
म्हटलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज्यातल्या
महाविकास आघाडी सरकार बद्दल विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी, तीन
वेगवेगळ्या विचारांचं हे सरकार फार काळ टिकेल, असं वाटत नाही, असं मत व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ४८ नव्या कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका हद्दीतल्या ३२ आणि ग्रामीण भागातल्या १६ रूग्णांचा
समावेश आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ४६० रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची एकूण
संख्या तेरा हजार ८९० झाली आहे.
****
अहमदनगर जिल्हा परिषदेतल्या ग्रामपंचायत विभागातील कामकाज
गतिमान करण्यासाठी “आय लव्ह माय जॉब” ही संकल्पना राबवली जात आहे. शासनाच्या विविध
योजनांची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत ग्रामपंचायत विभाग चित्रफितीद्वारे मार्गदर्शन
करीत आहे.
****
उस्मानाबाद शहरातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती
संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शहरात उद्या एक ऑगस्टपासून दुचाकी
वाहनांना प्रतिबंध केला आहे. या आदेशानुसार फक्त शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि अत्यावश्यक
सेवेतल्या व्यक्तींनाच या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
****
बीड जिल्हा प्रशासनाने आता ३१ ऑगस्ट पर्यंत संचारबंदी
कायम ठेवली आहे, मात्र यात काही बाबींना सूट देखील देण्यात आली आहे. पाच ऑगस्टपासून
जिल्ह्यात अनेक बाबी सुरू होणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या
आदेशात म्हटलं आहे.
****
लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने
सन्मानित करावं, अशा मागणीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलनं एकमतानं
संमत केला आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा, यासाठी पक्षाच्यावतीने राज्यात प्रत्येक
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पक्षाचे
राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कानगो आणि तुकाराम भस्मे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१
जुलै
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
राज्य सरकारचं एक लाख शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचं
उद्दिष्ट.
·
समता दलाच्या माजी अध्यक्ष जया जेटली आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना
संरक्षण दल भ्रष्टाचार प्रकरणी चार वर्ष तुरुंगवास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची
शिक्षा.
·
आयटीआयमध्ये उद्यापासून केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश
प्रक्रिया.
·
राज्यात आणखी ११ हजार १४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद;
२६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·
औरंगाबादमध्ये सहा, नांदेड आणि लातूरमध्ये प्रत्येकी चार, जालना
दोन तर परभणी आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू. बीडमध्ये ३७ तर हिंगोलीत
पाच नवे रुग्ण.
आणि
·
परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघनाच्या संशयावरुन सक्तवसुली
संचालनालयाची औरंगाबाद शहरातल्या कॅटरिंग व्यवसायिकाच्या मालमत्तांवर धाड, ६३ लाख रुपये
रोख आणि सात किलो सोन्याच्या विटा जप्त.
****
राज्य
सरकारनं शेतमजुरांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला असून राज्यातल्या
सुमारे एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. कृषीमंत्री दादा
भुसे यांनी काल ही माहिती दिली. प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात झाली असून, प्रशिक्षण
घेतलेल्या शेतमजुरांना प्रमाणपत्र दिलं जाईल, आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध
करुन दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. सध्या कापूस आणि मका या पिकांवर फवारणीची कामं
मोठ्या प्रमाणावर करावी लागणार असल्यानं, ही प्रमुख पिकं असलेल्या क्षेत्रात किटकनाशक
फवारणीचं, कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्यानं हाती घेतला आहे,
असं त्यांनी सांगितलं. संबंधित जिल्ह्यातले आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक-कृषि
अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून, ग्रामीण भागातल्या
शेतमजुरांनी नोंदणी करावी आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन, कृषी विभागाचे सचिव
एकनाथ डवले यांनी केलं आहे.
****
समता
दलाच्या माजी अध्यक्ष जया जेटली आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआयच्या विशेष न्यायालयानं संरक्षण दलाच्या एका व्यवहारात भ्रष्टाचार प्रकरणी
चार वर्ष तुरुंगवास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तहलका न्यूज
पोर्टलने जानेवारी २००१ मध्ये एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हा भ्रष्टाचार उघड केला होता.
जया जेटली यांच्यावर संरक्षण खात्याच्या थर्मल इमेजर्स खरेदी प्रकरणात लाच घेतल्याचा
आरोप आहे. या प्रकरणी काल निर्णय देताना न्यायालयानं जया जेटली, पक्षातले त्यांचे सहकारी
गोपाल पचेरलवाल आणि निवृत्त मेजर जनरल एस.पी.मुरगई या तिघांना काल सायंकाळपर्यंत न्यायालयासमोर
शरण येण्याचे निर्देश दिले होते, मात्र सीबीआय न्यायालयानं सुनावलेल्या या शिक्षेनंतर
लगेचच दिल्ली उच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिली.
****
कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआय प्रवेशाची
प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार असून उद्या एक ऑगस्टपासून प्रवेश
प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक
यांनी काल ही माहिती दिली. आयटीआयच्या संकेतस्थळावर प्रवेशासंबंधी सविस्तर माहिती दिली
असल्याचं त्यांनी सांगितलं. आयटीआय महाविद्यालयं कधी सुरु होतील याबाबत टाळेबंदीसंदर्भात
शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया
ऑनलाईन पद्धतीनं सुरु करीत आहोत, असं ते म्हणाले.
****
कोरोना
विषाणू नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातला दुवा म्हणून भूमिका
बजावावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुण्यात काल कोविड व्यवस्थापन
आणि नियोजनाबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. वाढता रुग्ण आणि मृत्यू दर कमी करणं हे आव्हान
असून, यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात
प्रत्येक जिल्ह्यात कृती दल निर्माण होत आहेत, यामुळे कोरोना उपाययोजनांमध्ये सुसूत्रता
येईल, असं ते म्हणाले. व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन-९५ मास्कचा पुरवठा, केंद्रानं
एक सप्टेंबरनंतरही करावा, अशी विनंती पंतप्रधानांना केली असून, सर्व लोकप्रतिनिधींनी
सुद्धा आपापल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला त्याचा लाभ होईल,
असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात
काल आणखी ११ हजार १४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एका दिवसात
रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक आहे. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ११ हजार
७९८ झाली आहे. काल २६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या
विषाणू संसर्गानं १४ हजार ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आठ हजार ८६० रुग्णांना
बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत दोन लाख ४८ हजार ६१५
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ६० पूर्णांक ३७ शतांश टक्के इतका असून, मृत्यू
दर तीन पूर्णांक ५८ शतांश टक्के इतका आहे. राज्यभरात आतापर्यंत २० लाख ७० हजार १२८
चाचण्या करण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये विश्रांती नगरमधल्या
४६ वर्षीय, अविष्कार कॉलनीतल्या ७९ वर्षीय, सिल्लोड तालुक्यातल्या ५० वर्षीय पुरुष
रुग्णांसह रऊफ कॉलनीतल्या ७४ वर्षीय आणि खोकडपुऱ्यातल्या ७६ वर्षीय महिलांचा समावेश
आहे. बीड शहरातल्या ६० वर्षीय पुरुषाचाही काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६९ झाली आहे.
दरम्यान,
जिल्ह्यात काल आणखी २७६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. शहरात प्रवेश करणाऱ्या
तपासणी नाक्यावर केलेल्या अँटीजेन चाचणीमधून ३८ जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या १३ हजार ८४२ झाली आहे. तर काल २८१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी
सोडण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार ९६१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त
झाले असून, सध्या तीन हजार ४१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
दरम्यान,
औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या १५६ शिक्षक, अधिकारी
- कर्मचाऱ्यांची काल महापालिकेच्या वतीनं अँटीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छता
विभागात काम करणाऱ्या एका २७ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा अहवाल बाधित आला आहे. आजही
अँटीजन चाचणीची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ११ ते ५ या दरम्यान विद्यापीठातील
आरोग्य केंद्रात विद्यापीठातल्या सर्व शिक्षक, अधिकारी - कर्मचाऱ्यांनी चाचणी करून
घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात नांदेड शहरातल्या
४० वर्षीय, नेरली इथल्या ५० वर्षीय, देगलूर इथल्या ६८ वर्षीय पुरुष रुग्णांसह, कंधार
इथल्या ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ७८ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे.
दरम्यान,
जिल्ह्यात काल आणखी ११७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीमध्ये
७५, तर अँटिजेन चाचणीतून ४२ बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार
६८५ झाली आहे. तर काल ५६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत
८४६ रुग्ण बरे झाले असून, सध्या ७४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यातल्या
आणखी एका आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोविडची लक्षणं
जाणवल्याने या आमदारांनी कोविड चाचणी करून घेतली, त्यात लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानं,
त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.
****
लातूर
जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये लातूर शहरातल्या
७५ वर्षीय, औसा तालुक्यातल्या उजनी इथल्या ५० वर्षीय, लातूर तालुक्यातल्या कासारगाव
इथल्या ७० वर्षीय पुरुष रुग्णांसह लातूर शाहरातल्या ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान,
लातूर जिल्ह्यात काल १०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये ५१ जण हे
अँटिजेन चाचणीतून बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ९९२
झाली आहे. त्यापैकी एक हजार १८० रुग्ण बरे झाले असून, सध्या ४९५ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
जालना
जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जालना शहरातल्या
८० वर्षीय आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा इथल्या ६५ वर्षीय पुरुष रुग्णांचा
समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू जाला आहे.
दरम्यान,
जिल्ह्यात काल आणखी ५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या दोन हजार १४८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४०
रुग्णांना काल सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले चौदाशे रुग्ण बरे झाले असून,
सध्या ६५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात गंगाखेड इथल्या झैदीपुरा भागातल्या ३२ वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा परभणीत
उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोविड १९मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता
२८ झाली आहे.
दरम्यान,
जिल्ह्यात काल आणखी २९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये परभणी शहरातले नऊ,
गंगाखेड शहरातले आठ, तर तालुक्यातले पाच, मानवत तालुक्यातले दोन, पाथरी इथले दोन, तर
जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि निझामाबाद इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ६०४ झाली आहे. तर काल ८९ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत ३५८ रुग्ण बरे झाले
असून, सध्या २१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत
या विषाणू संसर्गानं ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान,
जिल्ह्यात काल आणखी १३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातले
६७, उमरगा ३२, तुळजापूर तालुक्यातले १६, वाशी नऊ, कळंब तीन, परंडा आणि भूम प्रत्येकी
दोन, तर लोहारा इथला एक रुग्ण आहे. त्यामुळे
जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता ९९१ इतकी झाली. त्यापैकी ४८२ रुग्ण बरे झाले असून, सध्या
४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान,
शहरातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी
उस्मानाबाद शहरात एक ऑगस्टपासून दुचाकी वाहनांना प्रतिबंध केला आहे. या आदेशानुसार
फक्त शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतल्या व्यक्तींनाच यातून सूट देण्यात
आली आहे.
****
बीड
जिल्ह्यात काल आणखी ३७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये परळी इथले १७, बीड
मधले दहा, अंबाजोगाई चार, माजलगाव आणि गेवराई इथले प्रत्येकी दोन, तर केज आणि आष्टी
इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७३४ झाली आहे.
सध्या जिल्ह्यात ३९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान,
बीड जिल्हा प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी कायम ठेवली आहे, मात्र यात काही बाबींना
सूट देखील देण्यात आली आहे. पाच ऑगस्ट पासून जिल्ह्यात अनेक बाबी सुरू होणार असल्याचं
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यातला एक रुग्ण अँटिजेन चाचणीतून
बाधित आढळला. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५९८ झाली आहे. तर काल नऊ रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ४३० रुग्ण बरे
झाले असून, सध्या १६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत
काल आणखी एक हजार २२३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५३ रुग्णांचा मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यात काल तीन हजार ६५८ नवे रुग्ण, तर ६४ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात
काल ५३२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार
५७९, अहमदनगर ४२८, पालघर २६५, सांगली २४१, सातारा १६५, बुलडाणा ७५, यवतमाळ ५४, अमरावती
२३, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
अमरावती
जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयात कोविड नमुना घेण्यासंदर्भात घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद
आणि निंदनीय असून, असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असं महिला आणि बालकल्याण मंत्री
यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका युवतीचा कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी नमुना
घेतल्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून तिच्यासोबत
गैरवर्तन केलं. पिडीत मुलीने या प्रकाराची बडेनरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं हा
प्रकार समोर आला. सदर व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
****
परदेशी
चलन व्यवस्थापन - फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याच्या संशयावरुन सक्तवसुली संचालनालय
- ईडीनं औरंगाबाद शहरातल्या एका कॅटरिंग व्यावसायिकाविरूद्ध कारवाई केली. काल सकाळी
ईडीनं या व्यक्तीच्या तीन मालमत्तांवर काल धाड टाकून ६३ लाख रुपये रोख आणि सात किलो
सोन्याच्या विटा जप्त केल्या. ईडीनं काल ट्विटरवर ही माहिती दिली. या व्यावसायिकाच्या
घरासह, कार्यालयाचीही झडती घेण्यात आली असून, अधिक चौकशी सुरू असल्याचं, संचालनालयानं
म्हटलं आहे.
****
अखिल
भारतीय सेवानिवृत्त बँक कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १८ लाख रुपये
मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश महासंघाच्या राज्य शाखेचे मानद सचिव श्रीकांत पै यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. बँकेतल्या सेवानिवृत्तांसाठी स्थापन
करण्यात आलेल्या या संघटनेचे देशभरात अडीच लाखांवर सदस्य आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या
संकटाशी लढत असतांना सरकारच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी या महासंघानं स्वेच्छेनं
मदत संकलित केली, यापैकी ६० टक्के रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तर ४०
टक्के रक्कम पंतप्रधान मदत निधीत जमा केली आहे.
****
लातूर
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांना कोणतेही खासगी रुग्णालय अनामत मागणार नाही,
याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर
इथं कोविड-19च्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. डॉक्टरवर हल्ला करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर
कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी प्रशासनानं विषाणूचा पाठलाग- चेस दी व्हायरस मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात
चाचण्या कराव्या, असं देशमुख यांनी सांगितलं. तसंच नागरीकांनीही ताप, सर्दी, खोकला
ही लक्षणं जाणवताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
जालना
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू नियमांचं उल्लंघन करणाऱ्या
नागरिकांवर काल महसूल आणि पोलीस प्रशासनानं कारवाई केली. या कारवाईत ३७५ नागरिकांकडून
७५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
राज्य
शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातल्या सुमारे तेराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
सेवा आजपासून समाप्त करत असल्याचं पत्र सरकारनं जारी केलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
कालावधीत कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी दिले असतांनाही, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातल्या कक्ष अधिकाऱ्यांनी २७
जुलै रोजी सेवा समाप्तीचं पत्र काढलं आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार
असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड
शहरातल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयास नांदेड दक्षिण
विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी काल एक रूग्णवाहीका, तीन व्हेंटिलेटर,
एक कार्डियाक मशिन आपल्या स्थानिक विकास निधीतून दिली आहे.
****
परभणी
तालुक्यातल्या आनंदवाडी इथल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेचा
लाभ देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली
आहे. माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन दिलं. मागील वर्षी शेतीमध्ये उत्पन्न झालं नसल्यामुळे बाकी असलेलं कर्ज फेडता
आलं नाही, त्यामुळे या योजनेचा लाभ देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
****
अण्णाभाऊ
साठे जन्मशताब्दी महोत्सवांच्या सांगता समारंभानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या वतीनं आज आणि उद्या ऑनलाईन व्याख्यान आणि वेबिनारचं आयोजन करण्यात आलं
आहे. यामध्ये प्रख्यात विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार डॉ विजय चोरमारे, डॉ संजय शिंदे आणि
प्राध्यापक बाबुराव गुरव यांचं आज व्याख्यान होणार आहे. उद्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ऋषिकेश
कांबळे, आणि गझलकार प्राध्यापक मुकुंद राजपंखे हे विचार मांडणार आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात पूर्णा इथं काल बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली.
यावेळी हा सण शांततेने आणि शासनानं जारी केलेल्या नियमांचं पालन करून साजरी करण्याबाबत
सूचना देण्यात आल्या.
****
परभणी
जिल्ह्यात पालम तालुक्यातील पेठशिवणी इथले संभाजी शिराळे यांनी परिस्थितीवर मात करत,
शेतीकामासाठी आवश्यक वेगवेगळे यंत्र बनवण्यात यश आल्यानंतर, शेतीसाठी रोबोट तयार करण्यासाठीचे
प्रयत्न सुरु केले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
दहावी नापास असलेल्या संभाजी
यांनी औरंगाबाद येथे वेल्डिंग वर्कशॉपमधील नोकरी सोडून गाव गाठले. आणि शेतातील कामासाठी
लोखंडी अवजारे बनविण्यास विश्वदीप उद्योगच्या माध्यमातून पेठशिवणी येथे सुरूवात केली.
मागणी वाढल्यामुळे सुमारे आठ कामगारांच्या मदतीने सौरउर्जेवरील यंत्र तयार करण्यात
येऊ लागली. आणि पाहता पाहता शेतकऱ्यांच्या गरजा भागविणारे हक्काचे दालन झाले. कृषी
विद्यापीठ शास्त्रज्ञ, अभियंते यांनी भेटी देऊन या कामाचे कौतुक केले. यातूनच रोबोट
यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास स्थानिकांना
यशस्वी रोजगार देत यशस्वी होता येते हेच संभाजी शिराळे यांनी दाखवून दिले आहे.
आकाशवाणी
बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
औरंगाबाद
शहरातील उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांचं अनुदान वाटप करण्याची मागणी स्वाभिमानी
रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जून महिन्यापासून
या लाभार्थ्यांना अनुदान मिळालं नसल्याचं शहराध्यक्ष आदिनाथ खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
परभणी
इथं भारतीय जनता पक्ष युवा मोर्चानं राज्य सरकारच्या विरोधात भीक मांगो आंदोलन केलं.
एकीकडे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवलं जात आहे, तसंच शासनाच्या विविध महामंडळाच्या
कर्मचाऱ्यांना सक्तीनं निवृत्त केले जात आहे. तर दुसरीकडे मंत्र्यांना लाखो किमतीच्या
गाड्या खरेदी केल्या जातात, असा आरोप करत यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला.
****
उस्मानाबाद
पोलीस ठाण्यातला पोलीस नाईक आतिश सरफाळे याला काल तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ
अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या विरोधातल्या लोकांविरुद्ध कारवाई करणं तसंच वैद्यकीय
प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं पाच हजार रुपये लाच मागितली होती. त्यापैकी तीन हजार
रुपये घेताना त्याला काल एका उपाहारगृहात सापळा रचून अटक करण्यात आली.
****
लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं गौरव करावा, अशी मागणी केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यंदा अण्णाभाऊ साठे यांचं
जन्मशताब्दी वर्ष असून या मागणीचं पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे, असंही ते म्हणाले.
****
येत्या
पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी नाशिकमधून गोदावरी
नदीच्या उगमस्थानावरून कलश भरून जल नेण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमधल्या पुरोहित संघाचे
प्रतिनिधी आणि राम मंदिर लढ्यातील कार सेवकांनी ब्रम्हगिरी आणि कुशावर्त तीर्थांमधून
हे जल घेऊन ते आखाड्याच्या महंतांकडे सुपूर्द केले. आज हे जल आयोध्येकडे पाठवण्यात
येणार आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...