Monday, 27 July 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.07.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ६६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या १३ हजार १०४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले २३ तर ग्रामीण भागातल्या ४३ रुग्णांचा समावेश आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित ३४० रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
सांगली जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष आणि मिरज इथल्या शासकीय कोविड रुग्णालयातल्या एकूण २३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामधे कोविड रुग्णालयातल्या प्रत्येकी १ परिचारक तसंच परिचारिका, २ डॉक्टर, १ कारकून आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, एका आरोग्य कर्मचाऱ्याचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
रत्नागिरीतले प्रख्यात वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांचं आज पहाटे कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. रत्नागिरी पालिकेच्या आयुर्वेदीय दवाखान्यात त्यांनी अनेक वर्षं सेवा दिली. ब्रिज या खेळाच्या प्रसारासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरांसह जिल्ह्यातली अनेक शिवमंदिरं आज श्रावणी सोमवारीही बंद आहेत. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर इथं दरवर्षी होणारी ब्रह्मगिरीची महाप्रदक्षिणा यंदा रद्द करण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दाचू गावांतला दहशतवाद्यांचा अड्डा सुरक्षा दलांनी शोधून काढला आहे. या ठिकाणाहून हातगोळे, काडतुसं, १ एके ४७ रायफल, १ रेडियो तसंच काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
****
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलाम यांना अभिवादन करताना, कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा विज्ञानापासून राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडला असल्याचं, म्हटलं आहे.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...