Tuesday, 12 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑगस्ट २०२ सकाळी .०० वाजता

****

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारताने तीव्र निषेध केला आहे. अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही, असं भारताने आधीच स्पष्ट केल्याचं, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेही सुरुच ठेवेल, असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हत्तीचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी जागतिक हत्ती दिवस आज साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्त तामिळनाडुत कोईम्बतूर इथं राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, यामध्ये हत्तींचं संवर्धन, मानव - हत्ती संघर्ष सोडवणं या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत.

****

लोकसभेत काल कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक, २०२५ आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक, २०२५ ही दोन विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर झाली. विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली.

नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक २०२५ हे सहा दशकं जुन्या प्राप्तिकर कायदा, १९६१ ची जागा घेईल. भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या २८५ शिफारसींचा यात अंतर्भाव केला आहे. याआधीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं. सुधारित विधेयकात क्लिष्ट भाषा हटवून सुलभ कर भाषेत प्राप्तिकर सवलतींचं विवरण देण्यात आलं आहे.

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायद्यातील सुधारणा विधेयकालाही लोकसभेत गदारोळातच मंजूरी मिळाली.

राज्यसभेत काल गोवा विधानसभा मतदारसंघांमधल्या अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचं पुनर्समायोजन विधेयक संमत झालं. लोकसभेनं हे विधेयक गेल्या आठवड्यात मंजूर केलं होतं.

****

देशात हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं गेल्या ५ वर्षात १७१ तपासण्या केल्या असल्याचं, केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितलं. एअर इंडियाच्या बोईंग विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताव्यतिरिक्त उड्डाणातल्या व्यत्ययाच्या दोन घटना झाल्या, तर तांत्रिक बिघाडामुळे तातडीनं विमान उतरावं लागल्याच्या १० घटना झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीज संस्थेच्या वतीनं काल पुण्यात बायोव्हर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. जैव इंधन आणि हरित हायड्रोजन उत्पादनाचा वापर वाढला तर भारत ऊर्जा निर्यातदार देश बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

परभणी महामनगरपालिकेतर्फे आज शहरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा सायकल फेरी काढण्यात आली. राजगोपालाचारी उद्यानात असलेल्या स्मृती स्तंभाला अभिवादन करुन या सहा किलोमीटर अंतराच्या फेरीचा समारोप झाला. क्रीडा प्रेमी, सायकलिस्ट, विद्यार्थी नागरीक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. हर घर तिरंगा या अभियानात सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते यांनी केलं.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि संघाच्या ग्रामविकास मंडळाचे सदस्य भीमराव त्रंबक घारे यांचं काल नाशिक इथं निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी क्षेत्रात त्यांनी आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले.

****

छत्रपती संभाजीनगर येथील चंपा चौक ते जालना रोड रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्यासाठी काल पोलिस बंदोबस्ताने महानगर पालिकेच्या वतीने मोजणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेचे उच्चस्तरीय अधिकारी पथक तसंच पोलिस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

****

बीड जिल्हा वकील संघाची निवडणूक काल पार पडली. यामध्ये सुभाष पिसोरे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. वकील संघाच्या अध्यक्षपदी सुभाष पिसोरे, उपाध्यक्ष रघुराज देशमुख, तर सचिवपदी  सुभाष काळे यांची निवड झाली.

****

हिंगोली इथं झालेल्या २७ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी चमकादार कामगिरी केली. वैयक्तिक गटात मुलांमध्ये वेदांत काळे, मुलींमध्ये श्रेया मोइम या खेळाडूंनी पहिला क्रमांक पटकावला. मुलांच्या सांघिक गटातही छत्रपती संभाजीनगरचा संघ अव्वल ठरला.

****

१८व्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडला कालपासून मुंबईत प्रारंभ झाला. १० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ६४ देशांमधून २८८ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

****

No comments: