Tuesday, 28 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 28.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जानेवारी २०२० दुपारी १.०० वाजता
****
विकासाचा वेग साधायला हवा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नागपूर मेट्रोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे आज उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.  विकास कामांच्या बाबतीत केंद्र सरकार राज्य सरकारची साथ सोडणार नाही, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य यावेळी नागपूर इथं उपस्थित होते. नागपूर मेट्रोचं श्रेय आपलं नसून, या मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचं हे श्रेय असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी, गडकरी तसंच फडणवीस यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं

नीतीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यास सांगितलं. लढाऊ विमानांची नागपूरला उत्पादन तसंच बांधणी होईल, त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचं गडकरी म्हणाले. कोणतंही राजकारण न करता, विकासाला पूर्ण सहकार्याची भूमिका गडकरी यांनी व्यक्त केली.

नागपूर मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यात अकरा किलोमीटर लांबीच्या सीताबर्डी ते लोकमान्य नगर या मार्गावर मेट्रो धावणार असून, या मार्गावरची सहा स्थानकं सुरु झाली आहेत.
****
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौड यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधान भवनातल्या आपल्या दालनात दौंड यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून निवडून आले, त्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
****
सहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बारा हजार कोटी रुपये थेट वर्ग करून, एक नवीन विक्रम नोंदवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजराथमध्ये गांधीनगर इथं भरलेल्या तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते आज संवाद साधत होते. शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्याला शासकीय योजनांचं पाठबळ यामुळे अन्नधान्य उत्पादनात भारताचा जगातल्या पहिल्या तीन देशात क्रमांक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. दोन हजार बावीसपर्यंत शेतीतून होणारं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान आज राष्ट्रीय छात्रसेना एनसीसीच्या सैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. नवी दिल्लीच्या करियप्पा संचलन मैदानात, पंतप्रधानांनी एनसीसीच्या विविध तुकड्यांच्या संचलनाचं निरीक्षण केलं. या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच शौर्य क्रीडा प्रकारांचं सादरीकरण सध्या सुरू आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिभावान छात्रसैनिकांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयानं आफ्रिकी चित्ता भारतातल्या अनुकूल अधिवासात आणण्यास परवानगी दिली आहे. भारतीय चित्ता आता नामशेष झाला असल्यानं, आफ्रिकेतल्या नामिबिया देशातून चित्ता आणण्याची परवानगी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली होती, न्यायालयानं यासंदर्भात तीन तज्ज्ञांची समिती नेमली असून, दर चार महिन्यांनी समितीला अहवाल देण्यास सांगितलं आहे. योग्य सर्वेक्षण आणि पाहणीनंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दहा दिवसात चीनमधून आलेल्या तीन हजार ७५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र, कोरोना विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. कोरोना बाधितांना होणा-या खोकला आणि तापासाच्या लक्षणांची तक्रार पाच प्रवाशांनी केली होती, त्यांच्या रक्ताचे नमूने परिक्षणासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले होते. त्यापैकी तिघांचा अहवाल मिळाला असून, त्यात विषाणू आढळले नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इतर दोघांचे अहवाल आज मिळण्याची शक्यता आहे, असं आरोग्य विभागाच्या अधिका-यानं सांगितलं.
****
ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि जेलेना ओस्टापेंको या जोडीचा दुस-या फेरीतला सामना आज अमरिकेचा बेथानी मॅटेक सँड्स आणि ब्रिटेनची जॅमी मर्रे या जोड़ीशी होणार आहे. राफेल नादाल, स्टॅन वावरिंका, डोमिनिक थिएम आणि सिमोना हालेप यांनी काल आपापल्या गटात एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत राफेलचा मुकाबला ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डोमिनिक थिएमशी होणार आहे.
****


No comments: