Wednesday, 29 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 29.01.2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक आरोपी मुकेश याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळूल लावली आहे. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यावर मुकेशनं त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे. त्यासाठी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास कार्यरत संपर्क विभाग सुरु करण्यात आला असून, तिथं या विषाणूसंदर्भातली सगळी माहिती उपलब्ध असणार आहे. या संपर्क विभागाचा दूरध्वनी क्रमांक ०११-२३ ९७ ८० ४६ असा आहे. आतापर्यंत देशातल्या विविध विमानतळांवर तब्बल ३५ हजार प्रवाशांची आरोग्यविषयी तपासणी केल्याचंही डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत चार दिवस चाललेल्या सोहळ्याची आज संध्याकाळी “बिटिंग द रिट्रीट” कार्यक्रमानं सांगता होणार आहे. नवी दिल्लीतल्या विजय चौकात होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमात यावर्षी भारतीय संगीत रचना सादर होणार आहेत. लष्कर, हवाईदल आणि नौदल तसंच केंद्रीय सशस्त्र पोलीस बल यांची बॅन्ड पथकं त्यांच्या चोवीस सांगितिक रचना उपस्थितांसमोर सादर करतील.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या किनी टोल नाक्यावर काल रात्री पोलीस आणि गुंडांची टोळी यांच्यात गोळीबार झाला. या घटनेमध्ये पोलिसांच्या गोळीबारात एक गुंड गंभीर जखमी झाला. रात्री उशीरा ही घटना घडली. या तिन्ही गुंडांना पोलिसांनी अटक केली असून, ते गुंड राजस्थानातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****


No comments: