Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस-अनेक मंडळात अतिवृष्टी-धरणांतून
पाण्याचा मोठा विसर्ग सुरू
·
नांदेड तसंच लातूर जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून आज
शाळांना सुटी जाहीर
·
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमाचं आयोजन
·
मराठा आरक्षणासंदर्भात दोन्ही समाजाच्या हिताचा विचार
करणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आणि
·
राज्यभरात दीड दिवसांच्या गणरायाचं विसर्जन
****
मराठवाड्यासह
राज्याच्या बहुतांश भागात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागात
अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे नद्या नाल्यांना पूर आले असून, प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदेड
जिल्ह्यातल्या १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. देगलूर, नायगाव तसंच
मुखेड तालुक्यातल्या तीन हजारावर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. राज्य
आपत्ती प्रतिसाद दल - एस डी आर एफ ची एक तुकडीही देगलूर तालुक्यात तैनात करण्यात आली
आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे...
बाईट – अनुरोग पोवळे, नांदेड
नायगाव
तालुक्यात ढगफुटीमुळे मानार प्रकल्पाचा कालवा ओसंडून वाहत होता. हे पाणी ईकळीमोर गावात
शिरुन मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुखेड तसंच लोहा तालुक्यातल्या काही
गावांमध्येही पाणी शिरलं होतं.
दरम्यान, विष्णुपुरी
प्रकल्पाचे तीन दरवाजे तर उर्ध्व मानार धरणाचे सात दरवाजे उघडून विसर्ग सुरू आहे. दक्षिण
मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी वाहत असल्यामुळे
काही गाड्यांच्या मार्गात बदल झाला असून, काही गाड्या पूर्णत:
तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या
नेतृत्वात स्थापन समितीने काल जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. खासदार
रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात
६० पैकी २९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून, तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या
सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी काल पूरस्थितीचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. जिल्ह्यातल्या
परिस्थितीबाबत आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी अधिक माहिती दिली...
बाईट – जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे, लातूर
बीड जिल्ह्याच्या
धारूर तालुक्यात वाण नदीच्या पुलावरून जाणारी रिक्षा पुराच्या पाण्यात वाहून गेली.
आडस-अंबाजोगाई रस्त्यावरील अवरगाव जवळ ही दुर्घटना घडली, यात वाहून
गेलेले नितीन कांबळे यांचा मृतदेह काल सकाळी सापडला असून, अनिल
लोखंडे यांचा शोध घेण्यासाठी बीडहून विशेष शोधपथक दाखल झालं आहे. नदीला पूर आला की,
सतत पुलावरुन पाणी वाहून हा रस्ता बंद पडतो. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन
या पुलांची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, कुठल्याही
नदीनाल्यास पूर आला असेल तर पाण्यात जाण्याचं अनाठायी धाडस करू नये, असं आवाहन धारूरचे तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी केलं आहे.
हिंगोली
जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे एक फुटाने उघडून १२ हजार १४१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी
पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
परभणीच्या
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय
यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना खबरदारीचे उपाय सांगावेत, अशा सूचना
त्यांनी केल्या.
जालना शहरासह
जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरु असून, नदी- नाल्यांना पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
धाराशिव
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, भारतीय जनता
पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी काल या नुकसानाची पाहणी केली. जिल्ह्यातल्या
नुकसानाचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावं,
अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
यांच्याकडे केली आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा
९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात सध्या ५७ हजार ४६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची
आवक सुरु असून, धरणाच्या १८ दरवाजातून ६६ हजार २४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
गोदापात्रात सोडलं जात आहे.
****
दरम्यान, मराठवाड्याच्या
बहुतांश भागात आजही यलो अलर्ट दिलेला असून, पुणे, अहिल्यानगर तसंच कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला
आहे.
****
राष्ट्रीय
क्रीडा दिन आज साजरा होत आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा
दिवस साजरा केला जातो. शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ, ही यंदाची
या दिवसाची संकल्पना आहे.
यानिमित्त
छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या
हस्ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या ॲथलीट्सचा सत्कार केला जाणार आहे. आज दुपारनंतर
राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण-साईच्या परिसरात हा कार्यक्रम होणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
स्वित्झर्लंडमधल्या
झुरीच इथं झालेल्या डायमंड लीग अंतिम स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर
राहीला. त्याने ८५ पूर्णांक एक शून्य मीटर अंतरावर भाला फेकून ही कामगिरी केली. जर्मनीच्या
जुलियन वेबरनं या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.
****
मराठा आरक्षणासंदर्भात
राज्य शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल मुंबईत बोलत होते. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ
देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दहा टक्के
आरक्षण दिल्यावरही मराठा समाजाच्या आंदोलनाचं कारण कळलेलं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीचा मराठा समाजातल्या विचारवंतांनी पुनर्विचार
करावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
मराठा समाजाला
ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्याची मर्यादा हटवण्याची मागणी काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत
होते. केंद्रात तसंच राज्यात भाजप प्रणीत सरकार आहे, त्यामुळे दिल्लीत
जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, असं सपकाळ यांनी
म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण
मोर्चासाठी मुंबईकडे निघालेल्या समर्थकांसह मनोज जरांगे पाटील आज शिवनेरी किल्ल्यावरून
पुढे रवाना होत आहेत. आझाद मैदानावर फक्त एक दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मान्य नसून, ओबीसी कोट्यातून
मराठा आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषणाचा इशारा जरांगे पाटील यांनी
दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यभरात
दीड दिवसांच्या गणपतीचं काल विसर्जन झालं. घरोघरी काल विराजमान झालेल्या गणरायाला भक्तांनी
वाजतगाजत निरोप दिला. मुंबईत समुद्रकिनाऱ्यांसह अनेक ठिकाणी व्यवस्था केलेल्या कृत्रीम
तलावांवर भाविकांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
छत्रपती
संभाजीनगर इथं काल वरद गणेश मंदिराच्या प्रांगणात सामुहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं.
विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयामाने गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू
केला आहे. नागरिकांचा विशेषत: महिलांचा या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
****
ज्येष्ठ
अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८७ वर्षांचे
होते. विविध चित्रपट आणि नाटकांसह चिमणराव गुंड्याभाऊ मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्याभाऊंची
भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे.
****
आरोग्य
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी
एकत्रीकरण समितीच्या वतीने काल धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात
आला. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या समितीनं
दिला आहे. या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी समितीच्या वतीने १९ ऑगस्टपासून
बेमुदत संप आंदोलन केलं जात आहे.
****
No comments:
Post a Comment