Wednesday, 26 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 26.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 April 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

आकाशवाणीवरचा 'मन की बात' हा कार्यक्रम देशाच्या सभ्यतेच्या भावनेचं प्रतिबिंब असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागानिमित्त प्रसारभारतीनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'मनकीबात@100' या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या प्रवासात मन की बात हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरेल, असं उपराष्ट्रपती म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या भावना समजून घेतात आणि ते मन की बात कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कर्तृत्वाचा गौरव करतात, असं अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी ज्यांचा उल्लेख केला असे शंभर जण या परिषदेला उपस्थित असून, यात राज्यातल्या सात जणांचा समावेश आहे. यामध्ये स्वच्छता मोहिमेला आपल्या निवृत्तीवेतनातून पाच हजार रुपये देणगी देणारे पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी, किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवणारे चंद्रपूर इथले बंडू धोत्रे, २१ वर्षाखालील कबड्डी संघाची कर्णधार असलेली साताऱ्याची सोनाली हेलवी, ट्रॅक्टर वापरून कोविड 19 लसीकरणाला सुरुवात करणारे नाशिकचे राजेंद्र यादव, पुण्याचे कोविड योद्धा डॉक्टर बोरसे, गोदावरी स्वच्छता अभियानात मोलाचं सहकार्य करणारे नाशिकमधले चंद्रकिशोर पाटील, भरड धान्याचं गेल्या वीस वर्षांपासून अनोख्या पद्धतीनं उत्पन्न घेणाऱ्या अलिबागच्या शर्मिला ओसवाल यांचा समावेश आहे. दरम्यान, मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी ३० तारखेला प्रसारित होणार आहे.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रशंसा केली असून, या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाल्याचं नमूद केलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारता २०१४ ते २०२३ या काळात राष्ट्रीय महामार्गामध्ये ५३ हजार ८६८ किलोमीटरपेक्षा जास्त वाढ झाल्याची माहिती गडकरी यांनी ट्विट संदेशात दिली होती. चांगल्या रस्ते संपर्कामुळे अर्थव्यवस्थेतल्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांना बळकटी मिळाली असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.

***

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचं काल निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड इथं बादल यांचं अंत्यदशर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, बादल यांच्या निधनाबद्दल देशात दोन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे.

****

देशात गेल्या २४ तासात नऊ हजार ६२९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, १९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ११ हजार ९६७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६१ हजार १३ रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ टक्के आहे.

***

रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं काम प्राथमिक स्तरावरही पोहोचलेलं नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या प्रकल्पाबाबत सध्या माती परीक्षण सुरू असून, या परीक्षणाचा अहवाल आल्यानंतरच या ठिकाणी प्रकल्प होईल की नाही, हे निश्चित होईल, असं सामंत यांनी सांगितलं. खासदार शरद पवार यांच्याशी नाट्यपरिषदेसंदर्भात बैठक होती, मात्र बारसू संदर्भात पवार यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग सरकार नक्की करून घेईल, असं सामंत यांनी सांगितलं.

***

दरम्यान, एखादा प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्यावं, त्यांचा विरोध असेल, तर तो का आहे, हे समजून घेण्याची गरज खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज बारसू रिफायनरी संदर्भात पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या अधिकारी आणि आंदोलकांची बैठक आहे. या बैठकीतून काही तोडगा निघाला नाही, तर आपण एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची सूचना उद्योगमंत्री सामंत यांना केल्याचं, पवार यांनी सांगितलं.

***

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवण्याचे निर्देश, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले आहेत. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीनं नियोजन करावं, काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी भरारी पथकं कार्यान्वित करण्याच्या सूचना सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

***

छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, आयुष्यमान भारत कार्ड किंवा मनरेगा नोंदणी विषयक माहिती देण्यासाठी, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी माहितीसाठी, अठरा शून्य शून्य सव्वीस सत्तर शून्य शून्य सात, या क्रमांकाचा वापर करावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं आहे.

 

//***********//

 

 

No comments: