Tuesday, 25 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 25.04.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकावर तिरुवनंतपुरम आणि कासारगोड दरम्यान सुरू होणाऱ्या केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला रवाना करणार आहेत. केरळमधल्या तीन हजार २०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे.

***

आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा देशातल्या जनतेवर सकारात्मक प्रभाव पडला असून, जनतेमध्ये आनंदी आणि आशादायक भावना निर्माण झाली असल्याचं, एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. प्रसार भारती आणि आय आय एम रोहतक यांनी हे सर्वेक्षण केलं आहे.

***

आंबा पिकासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात येईल, अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते काल रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात किल्ला इथं शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचा समावेश करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं.

***

जागतिक ग्रंथदिन आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त काल नांदेड इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात माजी आमदार गंगाधर पटणे यांनी मार्गदर्शन केलं. स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसह युवकांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाचीही जोड अत्यावश्यक असल्याचं, त्यांनी यावेळी नमूद केलं. अमृत महोत्सवानिमित्त युवकांनी आपआपल्या गावाशी निगडीत असलेला मुक्तिसंग्रामाचा इतिहास, संदर्भ वाचण्याचं आवाहन पटणे यांनी यावेळी केलं.

***

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज-कुरखेडा मार्गावर वीज पडून एकाच कुटुंबातल्या चौघांचा काल मृत्यू झाला. देसाईगंज तालुक्यातल्या आमगाव इथलं हे कुटुंब तळेगावहून कार्यक्रम आटोपून येत असताना धावत्या मोटारसायकलवर वीज कोसळून पती पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू झाला.  

***

पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या सहाव्या रोल बॉल अजिंक्यपद विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष गटानं काल अर्जेंटिनाचा नऊ - एक असा पराभव केला.

//***********//

No comments: