Monday, 29 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोना विषाणूचा प्रसार कायम असलेल्या भागात ३० जूननंतरही टाळेबंदी कायम राहील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      लडाखमध्ये भारताच्या जमिनीवर नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं- पंतप्रधान नरेंद्र मोदी.

·      राज्यात पाच हजार चारशे ९३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, काल दिवसभरात १५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      औरंगाबाद जिल्ह्यात नऊ बाधितांचा मृत्यू तर २७१ नवे रुग्ण.

·      बीड वगळता मराठवाड्यातल्या अन्य सात जिल्ह्यातल्या रुग्णांच्या संख्येत वाढ.

आणि

·      राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया.

****

राज्यात ज्या भागात कोरोना विषाणूचा प्रसार कायम आहे, अशा भागात ३० जूननंतरही टाळेबंदी कायम राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्याच्या अन्य भागात मात्र टाळेबंद हळूहळू कमी केली जाईल, असं ते म्हणाले. काल सामाजिक माध्यमांवरुन जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. टाळेबंदी अधिक वाढू नये, हे जनतेच्याच हातात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये आणि कुठेही विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गर्दी झाली आणि कोरोना विषाणूचे रुग्ण वाढल्यास त्या भागात कडक टाळेबंदी लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. केवळ आर्थिक चक्र सुरु करण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेन सुरु केलं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

कोरोना रुग्णावरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचं सांगतांना जी जी औषधं यासाठी सुचवली जात आहेत ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्लाझ्मा थेरपीनं नव्वद टक्के रुग्ण बरे होत असून, या थेरपीचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याचं ते म्हणाले. कोरोना विषाणू मुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडिज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईत यशस्वी झालेली योजना आता राज्यभर राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबिनचं बोगस बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

देशाचं अखंडत्व कायम ठेवण्यासाठी भारताची कटिबद्धता आणि ताकद जगानं बघितली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लडाखमध्ये भारताच्या जमिनीवर नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान काल देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा ६६ वा भाग काल प्रसारित झाला.  भारत मित्रत्वाच्या भावेनेचा आदर करतो, त्याचबरोबर आपल्या शत्रुंना चोख उत्तर देण्यासही सक्षम आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी उठवण्यात येत असताना आपण या विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा, असं ते म्हणाले. टाळेबंदी उठवली जात असताना आपण अधिक सावध रहायला हवं, असं त्यांनी नमूद केलं.

स्वावलंबित्वाकडे वाटचाल करताना स्थानिक वस्तूंच्या खरेदीचा आग्रह धरला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.

कोविड १९ च्या महामारीबरोबरच यंदा  देशाला इतरही संकटांचा सामना करावा लागत असल्याचं सांगून त्यांनी, ॲम्पन, निसर्ग चक्रीवादळं, टोळधाड अशा विविध आपत्तींचा आणि त्यावर केलेल्या उपायांचा उल्लेख केला.

संकटांची मालिका जरी आली तरी धीराने त्यावर मात करुन उभं राहणं ही भारताची संस्कृती आहे असं सांगून, पंतप्रधानांनी, कृषी, कोळसा खाणी अशा विविध विषयांत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची माहीती दिली.

निसर्गाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग आवश्यक आहे त्यामुळे यंदा गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही मूर्ती आणि विसर्जनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

****

प्रवाशांनी एक जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित रेल्वे गाड्यांच्या आरक्षित केलेल्या रेल्वे तिकीटाचे सर्व पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या सर्व गाड्या रेल्वेनं नुकत्याच १२ ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.  

****

देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचा दर ५८ पूर्णांक ५६ शतांश टक्के झाला असून सध्या एकूण उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखाहून जास्त झाली आहे. कोविड १९ प्रतिबंधासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. देशात सध्या दोन लाख तीन हजार ५१ रुग्णांवर उपचार सुरु असून तीन लाख नऊ हजार ७१२ रुग्ण बरे झाले आहेत.

****

राज्यात काल पाच हजार चारशे ९३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ६४ हजार ६२६ एवढी झाली आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात एकूण १५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात या आजारानं सात हजार ४२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात उपचार घेणाऱ्या २२० रुग्णांना ते बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आतापर्यंत या आजारातून राज्यभरात ८६ हजार ५७५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल उपचार सुरू असताना नऊ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच महिला आणि चार पुरूषांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण सिटी चौक, सादात नगर, रामकृष्ण नगर, सिडको एन सेवन, सिडको एन बारा टीव्ही सेंटर चौक तसंच सिल्लेखाना भागातले होते. याशिवाय दोन रुग्ण वैजापूरचे तर एक रुग्ण खुलताबादचा होता. या आजारानं जिल्ह्यात आतापर्यंत २४७ रुग्णांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, काल जिल्ह्यात २७१ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ५०३७ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातले १७३ तर ग्रामीण भागातले ९८ रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारातून दोन हजार ५५६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्ह्यात काल आणखी ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५०४ झाली आहे. काल आढळून आलेल्या बांधितांमध्ये जालना शहरातले ३९, तर पानशेंद्रा आणि जाफ्राबाद तालुक्यातल्या भारज इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, उपचारानंतर कोरोना विषाणुमुक्त झालेल्या १९ रुग्णांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत ३३६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. शहरातल्या शामनगर, खंडोबा गल्ली, पाच नंबर चौक तसंच एक व्यक्ती उमरगा तालुक्यातल्या बलसुरचा रहिवाशी आहे. याशिवाय सात जण हे उदगीरमधले आहेत.

दरम्यान, लातूर तालुक्यातल्या धानोरा इथं दोन विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानंतर ग्रामस्थांनी काल आणि आज असे दोन दिवस जनता संचारबंदी पाळून आपले व्यवहार पूर्णतः बंद ठेवले आहेत. दोन दिवसांपूर्वी हे रुग्ण आढळले होते.

****

परभणी जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. परभणी शहरात दोन, तर जिंतूर आणि सोनपेठ इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १०९ झाली आहे.

दरम्यान, जिंतूर शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं शहरात काल रात्री बारा वाजेपासून उद्या ३० जूनच्या रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश जारी केले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन बाधित रुग्ण आढळले. यापैकी दोघे जण हे भूम तालुक्यातल्या इडा इथले रहिवाशी आहेत, ते दोघेही अगोदरच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातले आहेत, अन्य एक रुग्ण हा परंडा तालुक्यातल्या नालगावचा रहिवाशी आहे.  यामुळे आता जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही २०९ झाली आहे, यापैकी १६६ रुग्ण बरे झाले आहेत तर नऊ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात नवीन पाच बाधित रुग्ण आढळले आहेत. मन्नास पिंपरी, ताकतोडा, केंद्रा बुद्रुक आणि लिंगपिंपरी या गावचे रहिवाशी असलेले हे रुग्ण सध्या सेनगावच्या विलगीकरण कक्षात आहेत.

दरम्यान, हिंगोली आणि कळमनुरीचा प्रत्येकी एक आणि राज्य राखीव पोलिस दलाचा एक जवान असे तिघेजण उपचारानंतर बरे झाल्यानं काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण २६६ रुग्णांपैकी आतापर्यंत २३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले. नांदेड आणि लोहा शहरातला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यात एकूण बाधित रूग्णांची संख्या ३६७ झाली आहे. तर काल चार रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २७९ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

पालघर जिल्ह्यात काल आणखी ३१४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. अहमदनगर जिल्ह्यात २५, सोलापूर जिल्ह्यात ९६, रायगड १७२, सांगली १९, धुळे १०७, जळगाव १८६, तर गोंदिया जिल्ह्यात नवे सात रुग्ण आढळले.

****

नवीन आणि जुना जालन्याला जोडणारे मस्तगड, रामतीर्थ, लक्कडकोट आणि राजमहल टॉकीज इथले पूल पुढील काही दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल ही माहिती दिली. या पुलांवरून केवळ रुग्णवाहिकेला परवानगी असणार आहे. नवीन जालन्यामध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या अधिक असून तुलनेनं जुन्या जालन्यामध्ये बाधितांची संख्या कमी आहे. नागरिकांनी या दोन्ही भागात विनाकारण होणारं स्थलांतर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, केवळ अर्ध्या तासात कोरोना विषाणूचा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी ५० हजार कीटस्‌ची मागणी नोंदवण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

****

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या कोविड १९ वरच्या औषधाला आयुष मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परीषद- आयसीएमआरनं अद्याप नाहरकत पत्र दिलेलं नाही. त्यामुळे या औषधांचा साठा राज्यात कोठेही आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेच्या कामाची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी काल पाहणी केली. प्रयोगशाळा उभारणीचं काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांना दिल्या.

****

येत्या बुधवारच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर इथं उद्या रात्री अकरावाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये पैठणचं संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर इथल्या पादुकांचा यात समावेश आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे अटी-शर्थींसह प्रमुख संस्थानच्या पादुकांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळाली आहे. पादुकांसोबत २० जणांना जाण्यास मुभा देण्यात आली आहे.

****

राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या खातेदारांना पीक कर्ज वितरण करता यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी बँक संघटनांतर्फे करण्यात आली आहे. संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना या मुद्दावर पत्र पाठवण्यात आलं आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून बँकांना या संदर्भात स्पष्ट निर्देश मिळावेत, त्या अभावी या खातेदारांना पीक कर्ज वितरण करता येत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल कोल्हापूरमध्ये ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून संसर्ग नियंत्रणात येताच ही प्रक्रिया राबवली जाईल असं देशमुख म्हणाले.

****

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थ‍ितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयं तसंच उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधल्या शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अध्यापनाकरता नव-युगातील साधने’ या विषयावरच्या ऑनलाईन चर्चासत्रात ते काल बोलत होते. मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणं आवश्यक असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परिक्षा घेणं आणि त्याकरता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परिक्षा घेणं शक्य आहे, असं राज्यपालांनी नमूद केलं.

****

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीमध्ये यापुढे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधं आणण्याची गरज भासू नये, अशी मागणी खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. जलिल यांची काल घाटी प्रशासनासोबत बैठक झाली, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या, नियोजनामध्ये सुधारणा व्हावी, जबाबदारी निश्चित करावी यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधं आणावे लागतात याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि घाटीच्या अधिष्ठातांना देण्यात आल्याचं विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या बैठकीत सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड पंचायत समितीच्या माजी सभापती शिवकांता गंडरस यांनी काल आत्महत्या केली. त्या ४८ वर्षांच्या होत्या. मुदखेड तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाच्या त्या जेष्ठ महिला कार्यकर्त्या होत्या. कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी जानेवारी महिन्यात मुदखेड पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या पार्थिवावर डोणगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ते काल संगमनेर इथं वार्ताहरांशी बोलत होते. चीन प्रकरणात पंतप्रधान जनतेची दिशाभूल करत असून, त्यांनी जनतेला याबाबत सविस्तर माहिती द्यायला पाहिजे, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

****

परभणी शहर तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली. पूर्णा, मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला. गंगाखेड शहरासह परिसरातल्या काही भागात काल दुपारी पाऊस झाला. पूर्णा-नांदेड रस्त्यावरच्या गौर नजीक पुलाचं काम सुरु असून पर्यायी रस्त्यावरही पावसाचं पाणी साचल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

****

हिंगोली जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी चांगला पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात ४१ मिलीमीटर पाऊस झाला असून दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. यामध्ये गोरेगाव -सेनगाव रस्त्यावर आजेगावनजिकचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातल्या अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असून, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

****

परभणी जिल्ह्यात सावर्जनिक ठिकाणी फिरल्यास तसंच मास्क न वापरल्यास पहिल्यांदा २०० रुपये आणि नंतर ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल या अनुषंगानं एक शुद्धीपत्रक जारी केलं. पोलिस विभाग, महानगरपालिका आणि संबंधित शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना कारवाईचे आदेश बहाल केले आहेत.

****

राज्यात तीन महिन्यांच्या खंडानंतर कालपासून केशकर्तनालय सुरु झाले. राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करुन हे सलून सुरु करण्यात आले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

नव्याने आता प्रत्येक ग्राहकाला आणि कारागिराला disposal apron सुध्दा वापरायला सलून मालकांनी सुरूवात केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आता प्रत्येकजण सजग होत आहे. याबाबत बोलताना रामनगरी या प्रसिध्द सलूनचे मालक सुनील तुरपुरते म्हणाले “शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सर्व आम्ही खबरदारी घेत आहोत आणि दुकानाचं काम सगळं सॅनिटाईजचा वापर करून निर्जंतूक करून दुकानाचं काम सुरू असेल. आणि तेच ग्राहकांना disposable ज्या ज्या वस्तू देता येतील, नॅपकिन असेल, apron असेल आमचे स्वतःचे apron असतील, एकमेकांची बाधा एकमेकांना होऊ नये म्हणून. ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी आम्ही त्या ग्राहकांना appointment देत आहोत.”

अरूण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर.

****

परभणी शहरात वसमत रस्त्यावरच्या गुलमोहर लॉजमधून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं काल सुमारे ३७ हजार रूपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी तिघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर इथल्या श्री केशवराज विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मराठवाडा पातळीवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन योग शिबिराचा काल समारोप झाला. या शिबिरात अनेक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला.

****

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या रेणापूर इथं चौदाव्या वित्त आयोगामधून जलशुद्धीकरण कक्षाचं उद्घाटन कृषी आणि पशुसंवर्धन सभापती मीरा टेंगसे यांच्या हस्ते काल झालं

****

लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथं लातूर वृक्ष चळवळीअंतर्गत १२५ झाडं लावून ऑक्सिजन झोन तयार करण्यात आला. पुण्याची गो ग्रीन संस्था आणि हरीत बाभळगाव ग्रुपच्यावतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. 

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी काम करणारे सरपंच आणि पोलीस पाटील यांचा काल सत्कार केला. 

****

बुलडाणा जिल्ह्यात अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी इथल्या हनुमान सागर धरणावर वीज निर्मिती संच सुरू करण्यात आले आहेत. मागील १३ वर्षांपासून धरणातल्या पाण्याच्या पातळीप्रमाणे वीज निर्मिती करण्याचं काम सुरू आहे. या वीज निर्मिती संचाची क्षमता एक हजार ५०० किलो वॅट असून, सध्या एक हजार किलो वॅट विद्युत निर्मिती करण्यात येत आहे.

****

No comments: