Tuesday, 31 January 2017

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जानेवारी २०१७ सकाळी ६.५० मि.


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 January 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      संसदेच्या अर्थसंल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

·      चालू बॅँक खात्यातून पैसे काढण्यावरचे निर्बध भारतीय रिझर्व्ह बँकेनं हटवले

·      आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

·      लातूरच्या किर्ती ऑईल मिलमध्ये टाकाऊ पदार्थांच्या हौदात विषारी वायुमुळे गुदमरून नऊ कामगारांचा मृत्यू

आणि

·      म्मू काश्मीरमधल्या हिमस्खलनात बचावलेल्या पाच जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू;  मृतांत परभणी जिल्ह्यातल्या ताडकळसच्या जवानाचा समावेश 

****

संसदेच्या अर्थसंल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. दोन सत्रात चालणाऱ्या या अधिवेशनात अर्थसंकल्पासह ३४ विधेयकं सादर होणार आहेत. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून नोटाबंदीनंतरच्या या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, निवडणूक काळात काही मुद्यांवर मतभेद असले तरी संसद ही सर्वपक्षीय पंचायत असून संसदेच कामकाज सुरळीत चाललं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थसंल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कामकाज सुरळीत चालवण्याचं आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू बॅँक खात्यातून पैसे काढण्यावरचे निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे चालू खात्यातून खातेदारांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पैसे काढता येणार आहेत. बचत खात्यातूनही एकाचवेळी २४ हजार रूपये काढण्यास बँकेनं परवानगी दिली आहे. ए टी एम मधून खातेदारांना ही रक्कम काढता येईल. मात्र एका आठवड्यात २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा अद्याप कायम आहे.

****

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युतीचा कोणाचाही प्रस्ताव आला नसून, ही निवडणूक स्वबळावरचं लढणार असल्याचं शिवसेन पक्ष प्रमुख द्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुंबईत काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती न करण्याचे संकेत दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगांवकर, यांनी युतीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी हा खुलासा केला. आपण पूर्ण सामर्थ्यानिशी मैदानात उतरलो असून, मुंबई महानगरपालिका जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही द्धठाकरे यांनी केला.

****

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आज सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला सुरूवात होणार असून ते दुपारी एक वाजेपर्यंत चालेल. या आंदोलनाला विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचं संयोजकांच्यावतीनं सांगण्यात आलं.

मराठा क्रांती मोर्चानं आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी राज्यभर शांततेच्या मार्गानं मोर्चे काढूनही, सरकारनं आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचं संयोजकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रास्ता रोको नियमात बसत नसल्यामुळे चक्का जाम आंदोलन शांततेत करावं, आंदोलन कर्त्यांनी वाहतुकीस अडथळा आणल्यास, कडक कारवाईचा इशारा, औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते काल बोलत होते.

****

केंद्र शासनानं परिवहन कार्यालयाच्या विविध शुल्कांमध्ये केलेल्या वाढीच्या निषेधार्थ, आज रिक्षा आणि वाहतूक दारांनीही राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज औरंगाबाद इथंही आंदोलनाचा इशारा लाल बावटा रिक्षा युनियननं दिला आहे.

****

लातूर इथं औद्योगिक परीसरातल्या हरंगुळ रोडवरच्या किर्ती ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड या ऑईल मिलमध्ये टाकाऊ पदार्थांचा हौद साफ करताना विषारी वायुमुळे गुदमरून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल रात्री घडली. खाजगी कंत्राटदारांमार्फत हे काम केलं जात होतं. २० फूट खोल आणि ६०० चौरस फूट लांबी -रूंदीच्या या हौदात साफसफाईसाठी हे कामगार आतमध्ये उतरले होते. प्रारंभी केवळ तीनच कामगार आतमध्ये उतरले. काही वेळानं कंत्राटदार कामाच्या ठिकाणी आला, त्याला आतून कामगार काहीच प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आल्यानंतर तो पाहणी करत असताना हौदात पडला. यात त्याचाही मृत्यू झाला. कंत्राटदार आणि त्याचे कामगार आतमध्ये पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीचे पाच कामगार त्यांना शोधण्यासाठी हौदात उतरले, असता त्यांचाही या विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला. एका कामगाराला दोरखंडाच्या मदतीनं हौदात उतरवत असताना गुदमरल्याची जाणीव झाल्यानं त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर हा हौद फोडून विषारी वायु बाहेर काढण्यात आला. रात्री दीड वाजेच्या सुमारास हौदातल्या नऊ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहे. आमचं  हे बातमीपत्र न्यूज ऑन ए.आय.आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधी स्थळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुष्पचक्र अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

****

म्मू काश्मीरमधल्या च्छिल भागात झालेल्या हिमस्खलनातून बचावलेल्या पाच जवानांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात राज्यातल्या तीन जवानांचा समावेश आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस इथला बालाजी अंबोरे, सातारा जिल्ह्यातला गणेश ढवळे, आणि सांगली जिल्ह्यातला रामचंद्र माने या जवानांचा समावेश आहे. अंबोरे यांचं पार्थीव उद्या नांदेडला आणलं जाणार असून, त्यानंतर ते त्याच्या गावी पाठवलं जाईल.

****

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ झाला असून औरंगाबाद जिल्ह्यातल्या  कन्नड पंचायत समितीच्या आठ गणांत अकरा उमेदवारांचे तेरा अर्ज तर जिल्हा परिषदेच्या चार गटात पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. पैठण तालुक्यातील पंचायत समितीच्या पाच गणांतून सहा उमेदवारांनी तर जिल्हा परिषदेच्या आपेगाव गटातून एका उमेदवारानी अर्ज दाखल केला. खुलताबाद जिल्हा परिषद गटात दोन उमेदवारांचे तीन तर पंचायत समिती गणात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत. वैजापुर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत अंधारी इथल्या गटात केवळ १ उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि पंचायत समितीच्या १२० गणांसाठी एकूण ९७ अर्ज काल दाखल झाले. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ३४ तर पंचायत समितीसाठी २५ अर्ज दाखल झाले असल्याचं, तर नांदेड जिल्ह्यच्या नायगाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी काल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

लातूर तालुक्यातल्या एकुरगा जिल्हा परिषद गटातून कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून धिरज विलासराव देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ३४ तर पंचायत समितीसाठी २५ अर्ज दाखल झाले असल्याचं, उपजिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी सांगितलं. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

गोदावरी खोरे समन्यायी पाणी वाटप लोकसमिती स्थापन करण्याची मागणी, प्रसिध्द जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी केली आहे. औरंगाबाद इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित, जायकवाडीची कहाणी या विशेष व्याख्यानात ते काल बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाआधारे जल व्यवस्थापन शक्य आहे, असा पर्याय विकसित करणं ही काळाची गरज असल्याचं पुरंदरे यावेळी म्हणाले.

****

शौचालय असूनही केवळ अनुदान लाटण्यासाठी खोटे प्रस्ताव दाखल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे. शहर स्वच्छ अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी आलेल्या अनुदान प्रस्तावांच्या छाननीनंतर अडीच हजार जणांकडे शौचालय असूनही प्रस्ताव दाखल झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.

****

नांदेड इथं काल राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शालेय विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते, फेरीचा समारोप एका पथनाट्याच्या सादरीकरणानं झाला. 

//********//

No comments: