आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१
पर्यंत राज्यातल्या विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसंच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे
झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं
घेतला आहे. दोन हजार ८६० कोटी ८४ लाख सात हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात येणार
आहे. या निर्णयाचा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ४६ लाख ५६ हजारांहून
अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
****
महावितरणच्या सर्व वर्गवारीतल्या
ग्राहकांना वीज देयक रोखीनं भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात
आली आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद महानगर पालिकेची
सर्व कामं येत्या नोव्हेंबर अखेर पर्यंत डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. स्मार्ट
सिटी अंतर्गत जी आय एस आणि मॅपिंग गव्हर्नर्स अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध कामाची
आढावा बैठक, काल महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली
घेण्यात आली. यावेळी आयुक्तांनी काही सूचना देत कामं लवकरच पूर्ण करण्याचे आदेश दिले.
****
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या
संचालक मंडळ निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल
शेवटच्या दिवसापर्यंत १२६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १४ संचालक मंडळाच्या निवडीसाठी
दाखल झालेल्या या अर्जांची आज छाननी होणार असून, नऊ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज
मागे घेण्यात येणार आहेत.
****
नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले
जेष्ठ नेते तथा भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाचे माजी जिल्हा अध्यक्ष टी.
पी. सावंत यांच काल निधन झालं, ते ७३ वर्षाचे होते. सावंत यांचा १९८३ पासून भारतीय
रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बांधणीत सिंहाचा वाटा होता.
****
बोर्ड ऑफ डिसेबल क्रिकेट
असोसिएशनतर्फे औरंगाबाद इथं दिव्यांग आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरु आहे.
या मालिकेत काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय दिव्यांग संघानं बांग्लादेशवर ४३
धावांनी विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment