Tuesday, 29 August 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे आज सकाळी ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान घसरले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं राज्य शासनानं म्हटलं आहे. आज सकाळी सुमारे साडे सहा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघात स्थळाहून प्रवाशांना मुंबईला आणण्याकरिता वैद्यकीय पथकासह दहा रुग्णवाहिका आणि २० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, अनेक खासगी वाहनांचीही यासाठी मदत घेण्यात आली. रेल्वेमार्गावरून डबे हटवण्याचं काम सुरू असून, यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. दिल्लीकडे जाणारी, मंगला एक्सप्रेस नाशिकरोड इथून मनमाड पुणे मार्गे एर्नाकुलमला परत गेली असून, मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस तसंच राज्यराणी एक्सप्रेस इगतपुरी इथं अडकून पडल्या आहेत. वाराणसी, कामायनीसह काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस पुणे, दौंड मार्गे वळवण्यात आली असून, पुष्पक, भागलपूर, गोरखपूर आदी अतिजलद गाड्याही लोणावळा -पुणे- दौंड मार्गे मनमाडकडे वळवण्यात आल्या आहेत. जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस मनमाडहून परत जालन्याकडे वळवण्यात आली आहे.

****

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस देशभरात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातले क्रीडापटू तसंच क्रीडाप्रेमींनी या दिनानिमित्त शुभेच्छा देत ध्यानचंद यांना अभिवादन अर्पण केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात विविध क्रीडा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार सरदार सिंह तसंच रियो पॅरालिंपिकमध्ये भाला फेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारे देवेंद्र झांझरिया यांना देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. याव्यतिरिक्त इतर १७ खेळाडूंना मानाचे अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कारही राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं सकाळी क्रांती चौकातून शालेय विद्यार्थ्यांनी अभिवादन फेरी काढून ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण केली. शहरातल्या विविध शाळांचे विद्यार्थी तसंच क्रीडापटू या अभिवादन फेरीत सहभागी झाले होते.

****

गणराया पाठोपाठ आज सायंकाळी घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन होत आहे. गौरीच्या मखरासह सजावटीच्या इतर साहित्यानं बाजारपेठा सजल्या असून, घराघरात उत्सवाच्या वातावरणात गौरींच्या स्वागताची तयारी सुरू आहे. उद्या घरोघरी पारंपरिक पद्धतीनं ज्येष्ठा गौरी पूजन होणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी इथं जिल्हा परिषदेच्या शाळेचं छत कोसळून झालेल्या शाळकरी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी निंबोडी गावकऱ्यांनी अहमदनगर जामखेड रस्ता सुमारे चार तास रोखून धरला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, संपूर्ण शाळेचं नव्यानं बांधकाम करावं, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या.

****

राज्या-राज्यातील गुन्हेगारांचे आणि गुन्हेगारीसंबंधीच्या माहितीची देवाणघेवाण करता यावी, या उद्देशानं काल नागपुरात आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील गुन्हेगारांना पायबंद घालण्यासाठी त्या राज्यातील सीआयडी अन्य राज्याच्या सीआयडी आणि पोलिसांमध्ये समन्वयक म्हणून भूमिका वठविणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत ठिकठिकाणच्या ५५० गुन्हेगारांच्या माहितीचं आदानप्रदान करून त्यांना कसं नियंत्रित करायचं, यासंबंधी काही निर्णय घेण्यात आले.

****

देशभरात अवयव दानाच्या चळवळीला गती मिळत असून, गाव पातळीवर ही मोहीम राबवण्यासाठी, आज आणि उद्या राज्यस्तरीय महा अवयव दान अभियान हाती घेण्यात आलं आहे. आज विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून गावागावात अवयव दाना विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. जालना इथं ही याच अनुषंगानं, आज सकाळी, महाफेरीचं आयोजन करण्यात आलं.

****

बीड जिल्हा उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातले पदाधिकारी, तसंच नागरिकांनी शौचालय बांधून प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन बीडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी केलं आहे. काल बीड इथं संवादपर्व कार्यक्रमांतर्गत आयोजित स्वच्छ भारत मिशन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. दोन ऑक्टोबरपर्यंत बीड जिल्हा उघड्यावर शौचापासून १०० टक्के मुक्त करण्यासाठी  स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग नोंदवावा असं, आवाहनही गोल्हार यांनी केलं.

****




No comments: