Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· तीर्थराज प्रयाग सर्वांना एकता आणि समरसतेची प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· बसस्थानकं आणि आगारांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश
· अध्यापक भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता-निवड प्रक्रियेत नवीन कार्यपद्धतीचा
अवलंब
· कविवर्य कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे वणी गावाची कवितांचं गाव म्हणून घोषणा
आणि
· प्रसिध्द नाटककार प्रशांत दळवी यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार जाहीर
****
तीर्थराज प्रयाग आपल्याला एकता आणि समरसतेची
प्रेरणा देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तरप्रदेशात
प्रयागराज इथल्या महाकुंभाच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या लेखात पंतप्रधानांनी
ही बाब नमूद केली आहे. संपूर्ण जगात अशा विराट आयोजनाची तुलना नसल्याचं सांगत, कुंभमेळ्याचं
हे नियोजन व्यवस्थापन क्षेत्रातल्या व्यावसायिकांसाठीही कुतुहलाचा विषय असल्याचं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे. या महाकुंभातून देशवासियांनी भारताच्या विराट सामर्थ्याचं जगाला दर्शन
घडवलं असून,
याच आत्मविश्वासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी
मार्गक्रमण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. तरुणपिढीचा कुंभमेळ्यातला सहभाग
हा समाधानकारक असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
****
भारतीय तरुणांकडे जागतिक आव्हानं सोडवण्याची
क्षमता असल्याचं,
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात भारती
अभिमत विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. देशातील तरुणांनी लोकशाही
मूल्यांचं पालन करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. देशाच्या विकासात पुण्याच्या महत्त्वपूर्ण
योगदानाचा उल्लेख करत ही समाजसुधारकांची भूमी असल्याचं बिर्ला यांनी नमूद केलं.
या सोहळ्यात सहा हजार आठशे पंधरा विद्यार्थ्यांना
पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आली, त्यापैकी ४२ विद्यार्थ्यांना
सुवर्णपदकं देऊन गौरवण्यात आलं.
****
राज्यातील सर्वच बसस्थानक आणि आगारांचे तातडीने
सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
पुण्यात काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात
एस.टी महामंडळाची बैठक आज मंत्रालयात झाली, त्यावेळी सरनाईक बोलत होते.
एसटी तसंच आरटीओ परिसरातल्या भंगार वाहनांची १५ एप्रिलपूर्वी विल्हेवाट लावण्याची सूचना
सरनाईक यांनी केली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याचा निर्णय या
बैठकीत घेण्यात आला. बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची
संख्या वाढवण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची
मागणी राज्यसरकारकडे करत असल्याचं, सरनाईक यांनी सांगितलं. महिलांनी
कोणतीही शंका न बाळगता एसटीतून प्रवास करावा, असं आवाहन सरनाईक यांनी केलं.
ते म्हणाले –
लाडक्या बहिणींना माझी परिवहन
मंत्री म्हणून विनंती आहे, आपला प्रवास ज्या पद्धतीनं तुम्हाला पूर्वीच्या माध्यमातून
करत होतात, तसाच करा. पूर्ण सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे. जर आमच्या परिवहन
विभागामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातनं पोलिसांच्या
माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल. एस टी डेपो मध्ये आमच्या एस टी
महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेस नव्हे तर ज्या गाड्या आर टी ओ नं जप्त
केलेल्या आहेत, त्याचं सुद्धा पूर्णपणे पंधरा एप्रिलच्या आत पूर्णपणे विल्हेवाट लावण्याचा
निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पुण्यात काल घडलेल्या
घटनेच्या निषेधार्थ शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने
आज छत्रपती संभाजीनगर इथं बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आलं. पक्षाच्या महिला पदाधिकारी
आणि कार्यकर्त्या यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन
इथं दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येबाबत कठोर पावलं उचलण्याचे
तसंच दोषींवर कठोर शासन करण्याचे निर्देश महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष
धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत
होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या अन्य एका हत्या प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या संशयित
आरोपी बाबत देखील माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचं मेश्राम यांनी सांगितलं.
नागरिकांनी कोणत्याही शोषणाला बळी न पडता, अन्यायाविरोधात दाद मागण्याचं
आवाहन मेश्राम यांनी केलं. प्रशासकीय दिरंगाई प्रकरणी कारवाईचा इशाराही मेश्राम यांनी
दिला आहे –
शोषित बांधवांना विनंती करतो की त्यांनी कोणत्याही पद्धतीच्या शोषणाला बळी न पडता, त्यांच्याविरूध्द जो काही अन्याय होत असेल, त्याच्याविरूद्ध त्यांनी आवाज
आपला बळकट करावा. समाधानी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं व्हावं.
आणि जर प्रशासन आपल्या कामामध्ये दिरंगाई किंवा कुचराई दाखवत असेल, तर आयोग त्यांच्यावर भविष्यकाळामध्ये कठोरातील
कठोर कारवाई करण्यासाठी कटीबद्ध आहे.
****
राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक
पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने मान्यता दिली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता
येण्यासाठी यापुढे नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
या नव्या पद्धतीत शैक्षणिक क्रेडेन्शियल तसंच उमेदवारांची मुलाखतीमधली कामगिरी गृहीत
धरण्यात येणार आहे. या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष
निवड प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
****
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात शिरवाडे
वणी हे ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचं गाव आता कवितांचं गाव
म्हणून ओळखलं जाणार आहे. आज कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषा विभाग, राज्य
मराठी भाषा विकास संस्था आणि शिरवाडे- वणी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात
आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय
सामंत, वि. वा. शिरवाडकर यांच्या नात पिहू शिरवाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिरवाडे इथं पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचं आयोजन करण्याची घोषणा
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र चौंडी
विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेचे
सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. चौंडी इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.
दरवर्षी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनामित्त चौंडी येथे मोठा उत्सव
साजरा करण्यात येतो. यावर्षीही उत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने करण्यात
येणारी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथलं बाबा
वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आरती
प्रभू पुरस्कार यंदा प्रसिध्द नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर करण्यात आला आहे. २१
हजार रूपये,
स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि शाल-श्रीफळ असं
या पुरस्काराचं स्वरुप आहे. बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आज पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली.
येत्या
आठ मार्चला चि.त्र्यं.खानोलकर यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांच्या हस्ते आणि बाबा वर्दम थिएटरच्या अध्यक्षा ज्येष्ठ
अभिनेत्री सौ वर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत
कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक शंभु शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार
आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या
माकणी इथल्या प्रहार दिव्यांग उत्पादक गटाने २०१५ पासून सुरू केलेल्या बचत गटाच्या
माध्यमातून एलईडी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना उमेद अभियानाच्या
कर्मचाऱ्यांनी व्यवसाय करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिलं. दिव्यांगत्वावर मात करत कौशल्य
विकसित करून गावातच त्यांना स्वतःचा व्यवसाय करून उमेद अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर
होत आलं, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. याबद्दल अधिक माहिती देत आहेत, या
बचत गटाचे सदस्य महंमद अली अत्तार –
बाईट – महंमद अली अत्तार
****
लातूर कलामंच आणि विलासराव देशमुख फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी लेखक तथा सुप्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर
यांची प्रकट मुलाखत होणार आहे.अमोल पालेकर यांचे ‘ऐवज - एक स्मृतिबंध’ हे
आत्मकथनपर पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या निमित्ताने अमोल पालेकर यांची तसेच
पुस्तकाच्या क्यूरेटर संध्या गोखले या दोघांची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीच्या
या कार्यक्रमास अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असं
आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथं बारावीच्या
परीक्षा केंद्रामध्ये निलंबित नायब तहसीलदार आपल्या मुलाला कॉपी देण्यासाठी परीक्षा
केंद्रामध्ये दाखल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनिल तोरडमल असं याचं नाव असून, त्याला
यापूर्वीच सेवेतून निलंबन केलेलं आहे. तोरडमलविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment