Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून
पाच दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात
या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती बिहारमधील
पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहतील. उद्या मध्य प्रदेशातील
छत्तरपूर मधल्या गाढा इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह समारंभाला
राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आदरांजली
अर्पण करून, केवडिया इथं होणाऱ्या नर्मदा आरतीमध्ये
सहभागी होतील. केवडिया इथं एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती मुर्मू भेट देणार
आहेत. त्यानंतर अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या
तसंच गांधीनगर मधल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला
त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर स्मृतीवन भूकंप स्मारक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा
स्थळ असलेल्या धोलावीराला त्या भेट देणार आहेत.
****
केंद्र तसंच राज्य शासनाच्या कल्याणकारी
योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून
प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” हा उपक्रम परभणी जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.
यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या उपक्रमाच्या
माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी गावात योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का, याचा आढावा प्रत्यक्ष गावाला नियमितपणे
भेट देऊन घ्यावा, अशी सूचना पालकमंत्री
मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली आहे.
***
बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष
देशमुख हत्येप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करावी
आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन
दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू
धनंजय देशमुख यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
****
देशात २०३६ पर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या
नोंदणीत ५०टक्के वाढ करण्याचं स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच
साकारता येईल, असं प्रतिपादन राज्यपाल
सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या
दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. दरम्यान, नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २४
वा दीक्षांत समारंभ काल कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली
पार पडला. डॉक्टरांनी शासनाच्या आरोग्य खात्यात कामाचा अनुभव घेण्याचं आवाहन राज्यपालांनी
केलं.
****
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्याच्या
बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी
सांगितलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने
पुणे इथं काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी
ते बोलत होते. परिषदेत मांडलेल्या सकारात्मक सूचना च्या संदर्भात धोरणात्मक निर्णय
घेणार असून बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न
करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात काल
झालेल्या जनता दरबारात ६५१ अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या
अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यात येत्या २८
फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक आणि इतर आस्थापनांच्या वतीने मुलाखती घेण्यात येणार
असल्याचं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी सांगितलं.
****
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
प्रकरणी शिरूर इथल्या एका आरोपीला बीडच्या
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली
आहे. २९ डिसेंबर २०१९ रोजी ही घटना घडली होती.
****
बंगालचा उपसागर तसंच ओडिशाच्या काही
भागात आज पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी
नोंदवली गेली. भूकंपाचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागाखाली ९१ किलोमीटर खोल होते. यात
कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा
उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप होत आहे. हा सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय
करण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी
विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. प्रयागराज
मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात
असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांदड
यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात
आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी भाविकांनी
संगमात पवित्र स्नान केलं.
****
No comments:
Post a Comment