Sunday, 23 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.02.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 February 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्यातल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना

आणि

·      दिल्लीत अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आज समारोप

****

अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा हा ११९वा भाग होता.

मुझे यह देखकर भी बहुत खुशी होती है कि आज स्पेस सेक्टर हमारे युवाओं के लिए बहुत फेव्हरेट बन गया है कुछ साल पहले तक किसने सोचा होगा कि इस क्षेत्र में स्टार्ट-अप और प्रायव्हेट सेक्टर की स्पेस कंपनियों की संख्या सैकड़ों में हो जाएगी! हमारे जो युवा, जीवन में कुछ थ्रीलिंग और एक्साइटींग करना चाहते हैं, उनके लिए स्पेस सेक्टर, एक बेहतरीन ऑप्शन बन रहा है

नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नसल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. इसरोच्या यशाचा परीघ खूपच मोठा असल्याचं म्हणत इस्रोच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत गाठलेल्या यशाचा आढावा त्यांनी घेतला. आता आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या पथकांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. देशाचा युवा वर्ग अंतराळ क्षेत्राकडे वळू लागला असून, त्यामुळेच गेल्या काही वर्षांत या क्षेत्राशी संबंधित स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातल्या अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात पोहचली असल्याचं त्यांनी सांगितलं.

अंतराळ क्षेत्राप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही भारत वेगानं आपली ओळख प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. या क्षेत्राशी संदर्भात पॅरीस इथं झालेल्या परिषदेत भारताच्या प्रगतीचं जगानं कौतुक केल्याचा अनुभव त्यांनी श्रोत्यांना सांगितला.

एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल, असं पंतप्रधान म्हणाले. ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून, आपण एकत्रितपणे छोट्या -छोट्या प्रयत्नांतून याचा सामना करायला हवा असं ते म्हणाले.

अधिक वजन या मोटापा कई तरह की परेशानियों को, बीमारियों को भी जन्म देता हैहम सब मिलकर छोटे-छोटे प्रयासों से इस चुनौती से निपट सकते हैं, जैसे एक तरीका मैंने सुझाया था, “खाने के तेल में दस प्रतिशत (10%) की कमी करना

येत्या काही दिवसांमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार असल्याचं स्मरण करून देताना पंतप्रधानांनी आपल्या मुलांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यादृष्टीनं त्यांनी ‘वैज्ञानिक म्हणून एक दिवस’ ही कल्पना मांडली. नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ, एक वैज्ञानिक म्हणून जगून पाहावं, संशोधन प्रयोगशाळा, तारांगणं किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

पुढच्या महिन्यात आठ मार्च रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे आपल्या महिला शक्तीला वंदन करण्याची विशेष संधी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यंदाच्या महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी, एका दिवसासाठी आपण आपल्या समाजमाध्यमांची खाती देशातल्या काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहोत. या खात्यांवर त्या त्यांचं काम, त्यांच्या समोरची आव्हानं, अनुभव देशवासियांना सांगतील, असं ते म्हणाले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी नमो ॲपवर तयार केलेल्या मंचाच्या माध्यमातून सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतीमधलं त्याचं स्थान याबद्दलची माहितीही पंतप्रधानांनी आजच्या मन की बातमध्ये दिली. महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी राज्य सरकारचं चार सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे. राज्य शासनानं ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.

****

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत विधानभवनात झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्च पासून सुरु होणार आहे.

****

समाजसेवक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठी केलेल्या कामामुळे समाजात सकारात्मक बदल झाला, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

मानवजातीला स्वच्छतेचा अमूल्य संदेश देणारे थोर समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

****

दिल्लीत सुरू असलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. तालकटोरा मैदानात सुरु असलेल्या या समारोप सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, माजी खासदार विजय दर्डा आदी मान्यवर उपस्थित आहेत.

देशाच्या राजधानीत एक चांगलं संमेलन पार पाडल्याबद्दल अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या

दिल्लीमध्ये संमेलन ही मराठीसाठी नक्कीच फार मोठी गोष्‍ट आहे. आणि ही आमंत्रित संस्था आहे ‘सरहद’. त्यांनी पूर्वी घुमान संमेलन घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होता. परंतू दिल्ली म्हणजे आणखी वेगळी गोष्‍ट आहे, इथे पुष्‍कळ जास्त राजकीय हालचाल आहे. त्यामुळे हे कसं काय त्यांना जमेल असं वाटत होतं. परंतू त्यांनी फार मनापासून आणि यशस्वीपणे हे आयोजन केलं आहे. विषय आम्ही थोडे बदलेले होते नेहमीपेक्षा. तेही लोकांना अतिशय आवडले आहेत. आम्हाला एक चांगल संमेलन देशाच्या राजधानीमध्ये पार पाडण्याचं समाधान मिळतं आहे.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी विद्यापीठानं प्रयत्न करून रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत असं प्रतिपादन, राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या ४१ व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम न बनवता त्यांच्यात कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोनही आणला पाहिजे तरच राष्ट्राचा विकास साधता येईल, असंही राज्यपालांनी नमूद केलं.

****

महाशिवरात्र येत्या २६ तारखेला साजरी होत आहे. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथाच्या मंदीरात यात्रा महोत्सव सुरु होत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना लवकर दर्शन घेता यावं, यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात येत आहे. उत्तर घाटावरील पायऱ्यांवर भव्य मंडप उभारण्यात आला आहे.

****

बीड इथं प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या ४० लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या योजनेसाठी राज्य शासनाकडून मिळालेला पैसा घरातल्या गृहीणीनं घरासाठीच खर्च केला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.

****

बीड इथल्या मराठवाडा माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या ऊसतोड कामगार आणि शेतमजूरांच्या विद्यार्थ्यांची दिल्लीतल्या एफ वन इन्फोटेक या आयटी कंपनीत नेटवर्क अभियंता म्हणून निवड झाली आहे. अतिशय दुर्गम, ग्रामीण भागातून येऊन विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट करत चांगली नोकरी मिळाल्याचं आत्मिक समाधान असल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलं, तर अभ्यासात सातत्य ठेवून संवाद कौशल्य, मुलाखत कौशल्य विकसित केल्यास आयटी क्षेत्रात सर्वसाधारण विद्यार्थी देखील चांगल्या पदावर काम करू शकतो, असं महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर देशमुख यांनी सांगितलं.

****

No comments: