Wednesday, 29 May 2019

Text - AIR News Bulletin, 29.05.2019....News at 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
राज्याच्या चार लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला आज मंजुरी देण्यात आली. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गेल्या वर्षी पीक कर्जाच्या उद्द‍िष्टाच्या केवळ चोपन्न टक्केच कर्जं वितरीत झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणं अपेक्ष‍ित आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
केंद्र शासनाच्या मुद्रा बॅंक, प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांच्या पत पुरवठ्यात वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध विभाग आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
राज्यात दुष्काळग्रस्त भागात कामाची मागणी होताच, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजनेतून तातडीने काम उपलब्ध करुन देण्याची सूचना रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत दिली. राज्यात चालू आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामावरच्या मजूर उपस्थितीमध्येही वाढ झाली असून सध्या राज्यात ३८ हजार ८११ कामं सुरू असून त्यावर तीन लाख ७७ हजार ३२८ मजूर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुंबईत दिली.
दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागानं नव्यानं धोरण निश्चित केलं आहे, यात दिव्यांगांना शिक्षण, त्यांना उत्तम आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी आज पाचव्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत २० मंत्र्यांनीही शपथ घेतली. शपथविधीनंतर पटनायक यांनी मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं. गृह आणि सामान्य प्रशासन खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं. अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते पेमा खांडू यांनी शपथ घेतली. राज्यपाल बी.डी.मिश्रा यांनी इटानगरमध्ये खांडू आणि त्यांच्या मंत्रीमंडळातल्या अकरा सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली. काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत मनसेला बरोबर घ्यावं असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता.
****
राज्यात आतापर्यंत तीनशे चौऱ्याहत्तर तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे, यापार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते आज  बोलत होते. राज्यातल्या आठशे चार आरोग्य संस्था आणि दोन हजार सातशे पंचावन्न शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
अकोला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीत १३९ मतांचा झालेला फरक हा मानवी चूक असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलं आहे. कर्मचाऱ्यांकडून झालेली ही चूक असून यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचं पापळकर म्हणाले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी मात्र, अकोला लोकसभा मतदारसंघातली निवडणूक रद्द करण्याच्या मागणीवर कायम आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला जिल्ह्यात, आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याखाली कारावास भोगलेल्या पंच्याऐंशी व्यक्तींना शासनानं दरमहा दहा हजार रुपये मानधन सुरु केलं आहे. तर, अशा कारावासात मरण पावलेल्या बंदींच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. या सर्वांचं मानधन आज खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आलं.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाथरी शाखेअंतर्गत येणाऱ्या गावांतल्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचा दुसरा हप्ता त्वरीत द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसनं दिला आहे.
****

No comments: