Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करणार आहेत. दिल्लीत जनरल करिअप्पा परेड मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याची यावर्षीची संकल्पना ‘युवा शक्ती - विकसित भारत’ ही आहे. यावेळी ८०० हून अधिक कॅडेट्सकडून, राष्ट्र उभारणीसाठी एनसीसीची वचनबद्धता दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात १८ मित्र देशातले १४४ कॅडेट्स सहभागी होणार आहेत. शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मेरा युवा भारत योजनेच्या साडेसहाशे स्वयंसेवकांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती असेल.
****
उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होत आहे. हा कायदा लागू करणारं देशातलं हे पहिलंच राज्य असून, यासंदर्भातल्या सर्व नियमांची अंमलबजावणी, अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आणि इतर तयारी पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी स्पष्ट केलं आहे. समान नागरी कायद्यासंदर्भातल्या एका संकेतस्थळाचं अनावरणही आज त्यांच्या हस्ते होणार आहे. जात, धर्म आणि लिंगाधारित नागरी कायदे तसंच लग्न, घटस्फोट, वारसाहक्क आदी अधिकार सर्वांना समान असावेत यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचं, धामी यांनी सांगितलं.
****
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत. त्रिवेणीसंगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, परवा २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गर्दी असलेल्या भागात जलद प्रतिसाद पथकं तैनात करण्यात आली आहेत.
महाकुंभ मेळ्याचं औचित्य साधून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि महिलांचे अधिकार याविषयी जनजागृती करणारी दालनं उभारली आहेत. याबरोबरच देशभरातल्या कलाकारांनी तयार केलेली हस्तकला, विविध कलाकृती असलेली वस्त्र, जैविक उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
****
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिल्लीतल्या आकाशवाणी भवनमध्ये मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या १३९ नागरिकांना विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आमंत्रित कऱण्यात आलं होतं. प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल तसंच आकाशवाणीचे उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे, अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचं महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी स्पष्ट केलं आहे. या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्यानं, स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसंच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत कळवण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नसल्याचं, यादव यांनी सांगितलं.
****
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या ७३ झाली असून, यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला. या आजारावर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. जीबीएस आजारावर पुण्यातल्या कमला नेहरु रुग्णालयात आणि पिंपरी चिंचवडमध्ये वायसीएम रुग्णालयात मोफत उपाचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर इथल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं काल उद्घाटन झालं. महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचवण्यासाठी राज्यातल्या गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांचा माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असे सामंत यावेळी म्हणाले.
आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यावेळी उपस्थित होते.
****
खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होत आहे. भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांनी पुरूषांच्या आईस हॉकीमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं. आज अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकून, पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.
****
पहिल्या महिला हॉकी इंडिया लीग स्पर्धेचं विजेतेपद ओडिशा वॉरियर्सने जिंकलं आहे. काल रांची इथं झालेल्या अंतिम सामन्यात ओडिशा वॉरियर्सने जे एस डब्ल्यू सुरमा हॉकी क्लबचा दोन - एक असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment