Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन
• वक्फ सुधारणा विधेयकाचा मसुदा आणि सुधारित विधेयकाला संसदीय समितीची मान्यता
• प्रयागराज महाकुंभात मौनी अमावस्येला सात कोटींहून जास्त भाविकांचं पवित्र स्नान- चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू
• लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्यशासनाकडून विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर
• विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाईम कमी करत आपल्यातल्या क्षमतांचा विकास करावा- राज्यपालांचं आवाहन
आणि
• सर्व शासकीय इमारतींचं विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार आहे. शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
****
संयुक्त संसदीय समितीनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला आणि सुधारित विधेयकाला बहुमतानं मान्यता दिली आहे. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर आज सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, विरोधी पक्षातल्या सदस्यांनी या अहवालावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अहवाल घाईघाईत स्वीकारल्याचं मत द्रमुकचे नेते डी राजा यांनी व्यक्त केलं असून, तृणमूल काँग्रसचे कल्याण बॅनर्जी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी अहवालाच्या विरोधात मतदान केलं आहे.
****
उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं महाकुंभात मौनी अमावस्येच्या दिवशी काल सायंकाळपर्यंत सात कोटींहून जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं. जगातल्या सर्वात मोठ्या या धार्मिक सोहळ्यात तेरा जानेवारीपासून आतापर्यंत २७ कोटींहून जास्त भाविकांनी अमृतस्नान केलं आहे.
काल मौनी अमावस्येला अमृत स्नानाच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. महाकुंभचे पोलीस उप महानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बॅरिकेट्स तुटल्यामुळे आखाडा मार्गावर झोपलेले भाविक इतर भाविकांच्या पायाखाली येऊन जखमी झाले असं कृष्णा यांनी सांगितलं. या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केली आहे. याप्रकरणी तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज मोहिमेला काल मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या मोहिमेसाठी चोवीस खनिजं निश्चित केली असून, लिथियम, कोबाल्ट आणि निकेलसारख्या खनिजांच्या उत्खनन आणि इतर प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.
ऊस आणि ऊसाच्या मळीपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलच्या दरांनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. इंधनात इथेनॉलचं मिश्रण करण्यामुळे परकीय चलनात एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत झाली असून, शेतकऱ्यांनाही चाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाईम कमी करत आपल्यातल्या क्षमतांचा विकास करावा, असं आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात ते काल बोलत होते. विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या, परभणी इथल्या बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा हरहरे हिला राज्यपालांच्या हस्ते नांदेड चान्सलर सुवर्ण पदकानं यावेळी सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान, विद्यापीठाच्या २०२३-२४ या वर्षासाठीच्या पुरस्कारांचं वितरण आज होणार आहे. या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार परभणी जिल्ह्याच्या झरी इथले सूर्यकांतराव देशमुख यांना जाहीर झाला आहे.
****
लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्यशासनानं विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं ही घोषणा केली, ते म्हणाले...
‘‘महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या, आर्थिक टंचाईमुळे ती संधी दुर्दैवाने त्यांची गमावु नये, पहिल्यांदा अशी एक शिष्यवृत्ती योजना वर्षाला २४ विद्यार्थ्यांना, लोककला आणि लोकवाद्य यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिना अशा प्रकारची शिष्यवृत्ती आज आम्ही घोषित करत आहोत. योजनेचे निकष काय असेल, फॉर्म कसे असतील, योजनेला नाव काय असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घोषित करु.’’
छत्रपती संभाजीनगर इथं ऑरिक सिटीत आयटी कंपन्यांना ५० एकर जागा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असं शेलार यांनी सांगितलं. यामुळे दरवर्षी दहा हजाराहून अधिक रोजगार निर्माण होतील, याशिवाय ड्रोन उद्योगासाठी देखील प्रयत्न केले जातील, असं ते म्हणाले.
**
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेचा काल समारोप झाला. राष्ट्रवादी विचारधारेचा राजकीय प्रवास या विषयावर शेलार यांनी व्याख्यानमालेचं समारोपाचं पुष्प गुंफलं. शहरी नक्षलवाद रोखणं हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान असल्याचं शेलार यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. आज सकाळी ११ ते ११ वाजून दोन मिनिटांपर्यंत देशभरात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मौन पाळण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या सर्व शासकीय इमारतींचं विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. आतापर्यंत राज्यातल्या एक हजार १५७ शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, उर्वरित ३३२ शासकीय इमारतींवर हे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावेत, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार आज बीड दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
****
परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काल नियोजन समितीची बैठक घेतली. जिल्ह्यात लवकरच सकारात्मक बदल पहायला मिळतील, मानवविकास निर्देशांकात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला,
‘‘सगळ्या अधिकार्यांना सूचना दिल्या आहे, कुठलाही ढिसाळपणा चालणार नाही, आणि जिल्हावासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल, जेव्हा हे जे आम्ही नियोजन केलेलंय ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल. मानव विकास निर्देशांक जो आहे तो तिसऱ्या नंबरला आहे, तो वाढवण्याच्या आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय. दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करतोय, अनेक गोष्टी आहेत. दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, यासाठी जातीने लक्ष दिलं जाईल.’’
****
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ सचिन मिराज यानं कांस्यपदक जिंकलं तर महिलांच्या व्यक्तिगत ट्रायथलॉन स्पर्धेत डॉली पाटीलनं सुवर्ण आणि मानसी मोहितेनं रौप्यपदक पटकावलं. पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदक मिळवत पहिल्या स्थानावर आहे.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राबवलेल्या विविध उपक्रमामुळे वार्षिक शैक्षणिक अहवाल पाहणीत जिल्ह्याने छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. याविषयी माहिती देणारा हा वृत्तांत..
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टानुसार आकांक्षित धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्वसमावेशक गुणवत्ता विकास कार्यक्रम, मॉडेल स्कूल, परसबाग, रीड धाराशिव, ग्रामशिक्षण केंद्र स्थापना यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयांची वाचनाची सवय लावून वाचन संस्कृतीला चालना दिली. त्यामुळे असर च्या वार्षिक शैक्षणिक अहवालात धाराशिव प्रथम आला आहे.’’
****
दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक तसंच राज्यातल्या दुग्धशाळांमधल्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यात बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर १६ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काल तुळजापूर इथं दर्शन घेतल्यानंतर खासगी बसद्वारे या महिला परत निघाल्या असता, सोलापूर घाटात हा अपघात झाला. जखमींवर धाराशिव इथं उपचार सुरू आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सूट मिळणार नाही, असं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. शहरात आतापर्यंत सात कोटी ५३ लाख रुपये मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. उर्वरित मालमत्ताधारकांना निर्धारित मुदतीत कर भरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
बीड तालुका पुरवठा विभागानं कामावरून कमी केलेल्या हमालांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी माथाडी मंडळानं कारवाई करावी, या मागणीसाठी बीड गोदाम हमालांनी माथाडी बोर्डासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. याबाबत लेखी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे, हे आंदोलन पुकारल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यात ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरुगण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी एक हजार २०२ पथकांची स्थापना करण्यात आली असून, घराघरांत जाऊन दोन वर्षांवरील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या पथकांना सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ.एम.आर.कोरे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment