Wednesday, 29 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.01.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 January 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात साधु महंतांच्या विविध आखाड्यांनी आजचं शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री कुंभ मेळ्यात उद्भवलेल्या चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीनंतर भाविकांच्या सुविधेसाठी आखाड्यांनी हा निर्णय घेतला. कुंभमेळ्यात सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भाविकांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता, उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आज सकाळी सुमारे पावणे तीन कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आहे. स्नानासाठी आलेल्या भाविकांची गर्दी आज दुपारनंतर ओसरल्यावर साधु महंताच्या आखाड्याचं स्नान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेऊन तत्काळ मदतीचे निर्देश दिले.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ - 15 या शंभराव्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या क्षेपणास्त्रानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस ओ टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आाहे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला.

****

मुंबईतल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरचा २५० रुपयांचा पथकर आणखी एक वर्षासाठी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालयं आणि अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावेत, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.

****

राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी काल राज्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील आणि दायित्व पूर्ण अंमलबजावणी करण्याचं आवाहन, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं. नांदेड इथं काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

****

राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून, वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती, वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातलं वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. तीन प्रकरणांमध्ये  वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचं समोर आलं असून, या प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.

****

संदर्भित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. ते काल या योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. स्वस्त धान्य दुकानं, आपलं सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र आदी ठिकाणी या योजनेची नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना स्वामी यांनी यावेळी दिल्या.

****

मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने राज्यभरात मराठी भाषा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात काल ‘पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासह ग्रंथदान हा उपक्रम देखील राबवण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथदान करण्याचं आवाहन केलं.

रत्नागिरीमध्येही नगर परिषदेच्या दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काल एक कार्यक्रम झाला. मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करतं, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी यावेळी केलं. या निमित्तानं पुस्तक प्रदर्शन, ग्रंथदिंडी असे विविध उपक्रमही घेण्यात आले.

****

बीड जिल्हा ग्रंथालयात काल जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या शिरुर कासार ईथं ११ आणि १२ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची यावेळी मस्के यांनी माहिती दिली. 

****

No comments: