Friday, 31 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.01.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 January 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण

बीडसह बहुतांश ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका संपन्न, बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच

छत्रपती संभाजीनगर इथं जी बी एस आजाराचे पाच संशयित रुग्ण, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

आणि

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत २३ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला ३६ विविध पक्षांचे मिळून ५२ खासदार उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं.

****

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन, आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या काल नवी मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला 'महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४' होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त, पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर, खरात यांनी हा खुलासा केला, त्या म्हणाल्या,

“या परिक्षेकरता जवळपास दोन लाख ८६ हजार इतके उमेदवार बसलेले आहेत. सगळी व्यवस्था अतिशय चोख आहे, प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत. आणि कोणतीही पश्नपत्रिका लिक झालेली नाही.’’


दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे  तक्रार दाखल करण्यात आली आहे.

****

फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधले विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्त न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. ज्या परीक्षा केंद्रावर मागच्या पाच वर्षांत गैरप्रकार झाले होते त्या शाळांना मात्र हाच निर्णय लागू असेल, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

****

बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते काल बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...

‘‘चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विलमींगच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील.


दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहन पवार यांनी केलं. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन, जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या ७०३ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडयास काल जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असं आश्वासन सावे यांनी दिलं.

****

लातूर इथंही काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत ४९० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार असल्याचं, पालकमंत्री यावेळी म्हणाले.

****

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण मराठा समाज मुंबईत धडकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी काल जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एसचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बुलडाणा तसंच जालना इथल्या रुग्णांचा समावेश आहे. या पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर तीन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराबाबत नागरिकांनी घेण्याच्या खबरदारीबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी माहिती दिली...

“जे काही पेशन्ट आपल्याकडे डिटेक्ट झालेले आहेत, त्यापैकी दोन पेशन्ट डिस्चार्ज झालेले आहेत. काही जास्त चिंता करण्याचा विषय नाहीये. यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे, वेळोवेळी हात धुणे, दूषित पाणी पिण्यात येऊ नये, शिळं अन्न खाण्यात येऊ नये, आणि फिवर वगैरे, चार पाच दिवसांपेक्षा जास्त लूज मोशन्स वगैरे असेल, आणि विकनेस जाणवत असला, तरी तत्काळ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.’’

****

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ पुरस्कार, कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना काल प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये चार सुवर्ण, ११ रौप्य आणि आठ कास्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमाई केली. महिलांच्या ४०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात राज्याच्या सानवी देशवाल हिने सुवर्णपदक पटकावलं.

****

बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या दोन फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.

****

प्रशासनाने पारदर्शिता आणि दायित्व समजून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी केलं आहे. शंभर दिवसांचा कृती आराखडा, जिल्हा सुशासन निर्देशांक, यासह विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यालयीन स्वच्छता आणि सोयी सुविधा, क्षेत्रीय भेटी, ई - सुविधांमध्ये वाढ, याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देश दिले.

****

No comments: