Thursday, 20 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20.02.2020 TIME 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल झालेल्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर न्यायालयानं आज त्यांना १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना फडणवीस यांनी हे दोन्ही खटले नागपुरातली एक झोपडपट्टी हटवण्यासंदर्भातल्या आंदोलनाशी निगडित असल्याचं सांगितलं. आपल्यावर कोणताही वैयक्तिक खटला नाही असं सांगू, यामागे कोणाचा हात आहे हेही आपल्याला माहीत आहे असं फडणवीस म्हणाले. वेळ आल्यावर आपण स्पष्टीकरण देवू असंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी तीस मार्च रोजी होणार आहे.
****
एअरसेल मॅक्सिसप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम या दोघांविरोधात तपास पूर्ण करण्यासाठी दिल्ली न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाला चार मे पर्यंतची मुदत दिली आहे. या प्रकरणी चार देशांना पुरावे देण्यासंदर्भातली पत्रं पाठवण्यात आली असून, त्यांच्याकडून उत्तर येणं बाकी असल्याचं, अंमलबजावणी संचालनालयानं न्यायालयाला सांगितलं. चिदंबरम यांनी अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात या करारांना मंजुरी देऊन काही विशिष्ट व्यक्तींना लाभ मिळवून दिल्याचा आरोप सीबीआय तसंच ईडीकडून केला जात आहे.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा युवकांची भेट घेतली. गेल्या चोवीस दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली. मागच्या सरकारनं घेतलेल्या अनेक लोकहिताच्या निर्णयांना हे सरकार स्थगिती देत असल्याची टीका दरेकर यांनी केली.
****
मराठवाड्यातला पाण्याचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी मिळणं आवश्यक असून, पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्नासंदर्भात आज औरंगाबाद इथं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आयोजित केलेल्या पीक पाणी परिषदेचं उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील विविध नद्यांचं पाणी मान्यवरांच्या हस्ते एका घड्यामध्ये टाकून या परिषदेला सुरूवात झाली. समन्यायी पाणी वाटप होऊन, आपल्याला हक्काचं पाणी मिळावं, पाणी साठवणुकीसह पाण्याचं वितरणही योग्य पद्धतीने व्हावं असं सांगतानाच, जनतेनं जलसाक्षर होण्याची गरजही टोपे यांनी व्यक्त केली. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार कल्याण काळे, अर्जुन खोतकर यांच्या सह अनेक लोकप्रतिनिधी या पीक पाणी परिषदेला उपस्थित आहेत.
****
गेल्या पाच वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेत जमिनींचा पोत सुधारण्यास मदत मिळत असून दोन लाख माती नमुन्यांची पाच वर्षात तपासणी करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेत जमीनीमध्ये लोहाचे प्रमाण कमी आहे तर जस्त, तांबे, बोरान, सल्फरचे प्रमाण मध्यम आहे. त्यामुळे जमिनीतील सुक्ष्म मुलदव्याचे प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी सांगितलं.
****
वर्धा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात अमरावतीच्या जात पडताळणी विभागातले जिल्हा संशोधन अधिकारी तथा वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे यांचा मृत्यू झाला. त्यांचा कारचालकही या अपघातात ठार झाला. कंटेनर आणि कारची धडक होऊन झालेल्या या दुर्घटनेनंतर अपघातस्थळापासून काही अंतरावर कंटेनर सोडून चालक पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात केसलाघाट-नागाळा या मार्गावर काल रात्री उशीरा झालेल्या अपघातात सात जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांची भरधाव जीप रस्त्याच्या कडेला उभ्या नादुरुस्त ट्रकला धडकून हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिला, आणि दीड वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. गंभीर जखमींवर चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
पंडित नाथ नेरळकर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं औरंगाबाद इथं गानमहर्षी डॉ अण्णासाहेब गुंजकर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथल्या कलश मंगल कार्यालयात उद्या आणि परवा आयोजित या दोन दिवसीय महोत्सवात स्नेहल ठोसर, सम्राट पंडित, हेमा उपासनी, रवींद्र खोमणे, मुनव्वर अली यांचं गायन होणार आहे. नाट्यक्षेत्रातल्या योगदानासाठी प्राध्यापक त्र्यंबक महाजन तर संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी श्रीपाद कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात येणार आहे. उद्या आणि परवा सायंकाळी साडे सहा वाजता आयोजित हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
****
रेल्वेच्या सोलापूर विभागात बोरोटी- दुधनी- कुलाली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. हे काम २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्यानं या मार्गावरच्या तब्बल १७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
****


No comments: