Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २८ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
देशात
संशोधन आणि विकास क्षेत्रात उच्चविद्याविभुषित अनेक महिला कार्यरत असल्या, तरी जागतिक
स्तरावर महिला शास्त्रज्ञांच्या प्रमाणात ही संख्या पन्नास टक्के असल्याचं, राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत विज्ञान दिनाच्या अनुषंगानं बोलत होते.
जगभरात संशोधन क्षेत्रात कार्यरत महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण सरासरी तीस टक्के असताना,
भारतात हे प्रमाण फक्त पंधरा टक्के असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. विज्ञानात कार्यरत
महिला ही यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे.
विज्ञान शाखेत उच्च शिक्षण आणि अध्यापनात महिलांची संख्या वाढवण्यासाठी अनुकूल
वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाले
राष्ट्रीय
विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या
रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही
रमण यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आज ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून
विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नागरिकांच्या
इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना या विषयावर आज विधानसभेत चर्चा झाली. नागरिकांच्या
इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधीमंडळानं केंद्र सरकारकडे पाठवला
होता. मात्र अनुसूचित जाती -जमाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात
येत नसल्याचं, संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
नेते ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी, याबाबत बोलताना, इतरमागास प्रवर्गाची
जातनिहाय जनगणना करण्यात यावी, हा मुद्दा केंद्राकडे सर्वांनी मिळून लावून धरावा, अशी
मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, यासंदर्भात एका शिष्टमंडळानं
पंतप्रधानांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
****
विना अनुदानित
शाळांना अनुदान देण्याची मागणी तसंच शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा
मुद्दा आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या रुपात मांडण्यात आला. विधान परिषद विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात
संबंधित विभागाची बैठक सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं शालेय शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांनी सदनाला सांगितलं.
****
वाहनांच्या
क्षमतेपेक्षा अधिक होणारी मालवाहतुक - ओव्हर लोडिंग थांबवावी, अशी मागणी शेतकरी कामगार
पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. ते विधान परिषदेत बोलत होते. अनेक अपघातांनाही
ओव्हरलोडिंग कारणीभूत असल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यासंदर्भात कायद्याचं काटेकोर
पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून, पथकर नाक्यांनाही अशा वाहनांवर लक्ष ठेवण्याची
सूचना देण्यात आली असल्याचं, मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या
वाहनचालकांविरोधात कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
मराठा आरक्षणाची
सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावी, अशी मागणी आर आर पाटील
फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भात
सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या अर्जात पाटील यांनी, अशा घटनात्मक बाबींवर कलम
१४५/३ नुसार घटनापीठाला निर्णय देण्याचा अधिकार आहे, त्याकरता पाच न्यायमूर्तींचं
घटनापीठ तत्काळ गठीत करून, त्या घटनापीठाने याबाबत निर्णय द्यावा अशी विनंती केली.
मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेल्या मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य दाखवून हे आरक्षण कशा
प्रकारे टिकवण्यात येईल याचा खुलासा करावा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
****
सीमेपलिकडच्या साधनांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ
देणार नाही, बालाकोट हवाई हल्ल्यातून हा संदेश स्पष्ट केला असल्याचं, संरक्षण मंत्री
राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत वायूसेना अभ्यास केंद्रात बोलत होते. तीनही
सेना दलांचे प्रमुख सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यावेळी उपस्थित होते. कठोर निर्णय
घेण्यासाठी सैन्य दल तसंच राजकीय नेतृत्वाची भूमिका मोठी असते, कारगील, उरी आणि पुलवामा
सारख्या हल्ल्यांमधून ही बाब सिद्ध होत असल्याचं, रावत यांनी नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment