आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
महाशिवरात्रीचा
उत्सव आज देशभरात भक्तीभावाने साजरा होत आहे. ठिकठिकाणच्या शिवमंदीरांसह ज्योतिर्लिंगांच्या
दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. राज्यात त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर
सह मराठवाड्यात परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि वेरुळच्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी
परराज्यातूनही हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी सामुहिक पारायणासह
रुद्राभिषेक आदी पुजांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात
बेलाच्या पानांची आकर्षक आरास करण्यात आली असून यासाठी सुमारे ४०० किलो बेलाच्या पानांचा
वापर करण्यात आला आहे.
दरम्यान,
महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या
आहेत. हा उत्सव प्रत्येकाच्या जीवनात शांतता, समृद्धी आणि आनंद घेउन येणारा ठरो असं
त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
सोलापूर
जिल्ह्यात वैराग रस्त्यावर राळेरास शेळगाव दरम्यान एसटी बस आणि जीपची टक्कर होऊन चार
जण ठार झाले. आज सकाळी हा अपघात झाला. अपघातग्रस्त जीपमधले प्रवासी पंचायत समितीचे
कर्मचारी असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे. या अपघातात पाच ते सहा जण
जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
****
लातूर
जिल्ह्यातल्या औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काल औसा शहरातल्या स्वस्त धान्य गोडाऊनला
अचानक भेट देत धान्य आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी पोत्यात कमी धान्य असल्याचं
निदर्शनास आल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरित
करत असताना धान्याच्या पोत्यांचं वजन करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना
केली.
****
यंदा उशीरापर्यंत
चाललेल्या पावसामुळं नाशिक जिल्ह्यात सरासरी ७८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून जिल्ह्यातील
२४ धरणांमध्ये ५१ हजार ५८४ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत
तो केवळ ३८ टक्के होता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment