Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २४ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप
दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटूंबियांचं विमानतळावर स्वागत केलं. शंखनादात
तसंच भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत हे स्वागत करण्यात आलं. ट्रंप यांनी नंतर साबरमती
आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
पंतप्रधान मोदी त्यांच्यासोबत यावेळी होते. ट्रम्प दांम्पत्यानं यावेळी चरखा चालवण्याचा
आनंद घेतला. दोन्ही नेते मोटेरा क्रिडासंकुलावर नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमातून जनतेला
आता संबोधित करणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या
भारत भेटी दरम्यान आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या
विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
****
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज गोंधळात
सुरूवात झाली. शेतकऱ्यांना दिलेली आश्र्वासनं पुर्ण करण्यात आणि महिलांविरुद्धचे गुन्हे
रोखण्यात सरकार अयशस्वी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील भाजपच्या सदस्यांनी केला.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याच्या मुद्दावर चर्चा व्हावी, अशी मागणी विधानसभेतील
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि काँग्रेस पक्ष एकत्र सत्तेवर येण्यापुर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये
ते एक लाख रुपये मदतीची मागणी करत होते, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. शेतकऱ्यांना
मदत देण्यासंदर्भात स्पष्टता नसुन केवळ वीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असल्यानं
यावर चर्चा व्हावी, असं फडणवीस म्हणाले. भाजप सदस्यांनी या मुद्दावर हौद्यात येऊन सरकारविरुद्ध
घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या गोंधळा दरम्यान २०१९-
२०२०च्या अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्या तसंच २०१४ ते २०१७ दरम्यानच्या अतिरिक्त खर्चाचा
तपशील मांडला.
****
भाजपच्या सदस्यांनी विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्यापुर्वी
विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. शेतकऱ्यांची दुःख दूर करण्यात आणि महिलांविरुद्धचे
गुन्हे रोखण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र विकास
आघाडीच्या सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि पिकाची नुकसान भरपाई म्हणून
हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेला आज एक
वर्ष पूर्ण झालं. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेनुसार वर्षाला एकूण सहा
हजार रुपये तीन टप्प्यामधे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होतात.
आतापर्यंत सुमारे आठ कोटी ४६ लाखांहून अधिक शेतकर्यांना या योजनेचा
लाभ मिळाला आहे. यामधे महाराष्ट्रातील ८४ लाख ५९ हजार शेतकरी आहेत. यासाठी केंद्रसरकारनं आतापर्यंत
५० हजार ८५० कोटी रुपये दिले आहेत.
****
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे
आधीच नाजूक असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेनं पुन्हा उभारी घेण्यात अडथळा निर्माण होऊ
शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे. यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा
दर तीन पूर्णांक तीन दशांश टक्के राहील, अशी आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अधिकारी
क्रिस्टालीना जॉरजीव्हा यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी हा दर दोन पूर्णांक नऊ दशांश टक्के
इतका होता.
*****
कुख्यात गुंड रवि पुजारीला सेनेगलमधून आज पहाटे भारतात
आणण्यात आलं. खंडणी, हत्या आणि इतर अनेक गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत. बेंगळुरू
पोलिसांनी त्याला फ्रान्समार्गे भारतात आणलं. गेल्यावर्षी सेनेगल पोलिसांनी त्याला
अटक केली होती. तेव्हापासून त्याच्या प्रत्यर्पणाचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिकडच्या
स्थानिक न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर रवी पुजारी सेनेगलमधून दक्षिण आफ्रिकेला
पळून गेला होता. मात्र काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल पोलिसांनी संयुक्त
कारवाईत त्याला पकडलं आणि सेनेगलमध्ये पाठवण्यात आलं होतं.
****
वेलिंग्टन इथं न्यूझीलंडविरुद्ध
पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं पहिल्या डावात भारतावर १८३ धावांची मोठी
आघाडी घेतल्यानंतर भारताचा दुसरा डाव अवघ्या १९१ धावात आटोपला. न्यूझीलंडच्या टीम सौदी पाच, तर ट्रेंट बोल्टनं
चार गडीबाद करत भारताच्या फलंदाजीला खिंडार
पाडलं. विजयासाठी आवश्यक नऊ धावा केवळ दहा चेंडूत पूर्ण करत न्यूझीलंडनं भारतावर दहा
गडी राखून विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment