Monday, 24 July 2017

text-AIR News Bulletin,Aurangabad 24.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

लोकसभेत आज विरोधकांनी गोरक्षेच्या मुद्यावरून प्रचंड गदारोळ केला. गोरक्षेच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचारावर स्थगन प्रस्ताव देत चर्चेची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या गदारोळातच प्रश्नकालाचं कामकाज सुरू ठेवलं. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी, गोरक्षेच्या नावावर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पंतप्रधानांनी राज्यसरकारांना दिले असल्याचं सांगितलं. त्यानंतरही विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरूच ठेवला.

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी प्रश्नकाळात कापडउद्योगांच्या समस्येकडे लक्ष वेधलं. पिंपरी चिंचवडचे खासदार श्रीरंग बारणे यांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात पंढरपूरचा समावेश करावा, तसंच महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांच्या विकासाचा मुद्दा मांडला. राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी भायखळा तुरुंगात झालेलं मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं.

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याकडे लक्ष वेधत, दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं. शून्य प्रहरात हा मुद्दा मांडताना खैरे यांनी अमरनाथ यात्रेकरूंना पूर्ण संरक्षण पुरवण्याची मागणी केली.

लातूरचे खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी अकरावी प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करत, दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी तसंच पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळावा, यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याची मागणी केली.

****

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही विरोधकांच्या घोषणाबाजीत आजपासून सुरूवात झाली. विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येत, संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरत घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळातच विविध अध्यादेश सदनाच्या पटलावर मांडण्यात आले. त्यानंतर दिवंगत माजी मंत्री शिवाजीराव पाटील, भिलारे गुरुजी यांच्यासह दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मान्यवरांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घ्यायची काय गरज आहे, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. असे अर्ज भरून घेणं म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

****

राज्य सरकारनं सुगंधित सुपारीवरची बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गुटख्यावरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीनं अहवाल दिल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी नमूद केलं. राज्य सरकारनं २०१२ मध्ये गुटखा, तंबाखू, जर्दा यांसारख्या पदार्थांवर बंदी घातली होती.
                                      ****

इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं औरंगाबाद शहरातल्या चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपाचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं संबंधित पेट्रोल पंपचालकांना करार रदद करण्याबाबत नोटीस बजावली आहे. या पेट्रोलपंपात इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून ग्राहकांना कमी इंधन दिलं जात असल्याचं उघडकीस आल्यानंतर कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.

****

प्राप्तीकर विभागानं गेल्या तीन वर्षात देशभरातून सुमारे ७२ हजार कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता उघड केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात ही माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी विमुद्रीकरणानंतर या वर्षी १० जानेवारी पर्यंत सुमारे पाच हजार ४०० कोटींपेक्षा अधिक अघोषित रक्कम आणि ३०० किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

****

कॅलिफोर्नियामधल्या एनहॅम इथं झालेल्या यू एस ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणयनं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात प्रणयनं भारताच्याच पी कश्यपचा २१-१५, २०-२२, २१-१२ असा पराभव केला.

****

लष्कराला शस्त्रसाठा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात तुडवडा निर्माण झाल्यानं नियंत्रक आणि महालेखापाल - कॅगनं शस्त्रास्त्र कारखाना मंडळावर ताशेरे ओढले आहेत. कॅगनं संसदेत सादर केलेल्या अहवालानुसार मार्च २०१३ पासून मंडळानं लष्कराला अपुरा शस्त्रसाठा पुरवल्याचं निदर्शनास आलं आहे. २०१५ मध्ये सादर केलेल्या उच्चस्तरीय अहवालात यासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त करुनही मंडळाच्या शस्त्र पुरवठ्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं कॅगनं म्हटलं आहे.

****

No comments: