Tuesday, 26 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:26.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२६ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी हल्ले करत राहणारे दहशतवादी कारखाने बंद करावेत, असा सल्ला त्यांना देणं गरजेचं असल्याचं मत, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी व्यक्त केलं आहे. ते काल स्विर्त्झलँडमध्ये जिनिव्हा इथं आंतरसंसदीय संघाच्या १४८ व्या आमसभेत, बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं बंदी घातलेल्या दहशतवाद्यांपैकी सर्वात जास्त दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर आहे, असा आरोप त्यांनी केला.

****

कर्नाटकात, कल्याण राज्य प्रगती पक्षाचे नेते जी जनार्दन रेड्डी यांनी त्यांचा पक्ष भाजपात विलीन केला. भाजपा नेते बी एस येडीयुरुप्पा आणि कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष बी वाय विजेंद्र यांच्या उपस्थितीत जनार्दन रेड्डी आणि त्यांच्या पत्नी अरुणालक्ष्मी यांनी भाजपात प्रवेश केला.

****

लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा जिंकू असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जागावाटपाबाबत तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले. महादेव जानकर यांच्या पक्षाला लोकसभेत एक जागा देण्याचा निर्णय झाल्याचं देखील फडणवीस यांनी  यावेळी सांगितलं.

****

पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या विकासाकरता सुरु असलेल्या ७३ कोटी रुपयांच्या आराखड्यातली कामं वेगानं सुरु असून, विठ्ठल मंदिराला पुरातन, ७०० वर्षापूर्वीचं रूप येऊ लागलं आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातली ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचं काम अंतिम टप्प्यात आहे.

****

सोलापूर इथं होळी निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आयोजित केलेल्या, होळी करा लहान पोळी करा दान, या उपक्रमाअंतर्गत एकूण एक हजार पोळ्यांचं संकलन करण्यात आलं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जय हिंद फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरणपोळ्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये असणाऱ्या गरीब नागरिकांना देण्यात आल्या.

****

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी पोलिसांनी जंगमपूर जंगलातून सुमारे २८ लाख ४० हजार रुपये किंमतीची मोहफुलाची दारु जप्त केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

****

No comments: