Monday, 11 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विकसित भारत जी रामजी कायदा २०२५ लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी

·      देशभरातल्या न्यायालयांसाठी सरन्यायाधीशांकडून ‘एक खटला एक डाटा’ प्रणालीची घोषणा

·      भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात क्षमता-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाची प्लेऑफमध्ये समावेशाची आशा मावळली

****

विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजिविका मिशन ग्रामीण कायदा २०२५ लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या १ जुलै पासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान १२५ दिवस रोजगार मिळण्याची खात्री देण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान

****

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी ‘एक खटला एक डाटा’ प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं, त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणाची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळं याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी आज केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.

****

पायाभूत सुविधा, नाविण्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास ही इकोसिस्टीम महाराष्ट्रात उभारत असून भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट - २०२६ या दोन दिवसीय परिषदेअंतर्गत सकाळच्या सत्रात झालेल्या Vision For India @100 या परिसंवादात बोलत होते. दशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचे इकोनॉमिक इंजिनराहिले आहे असं सांगत, महाराष्ट्र आज ६६० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे, जी भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १५ टक्के योगदान देत असल्याचं सांगितलं. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा २० टक्क्यांहून अधिक असून देशाची डेटा सेंटरआणि स्टार्टअपराजधानी महाराष्ट्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीने प्रतिसाद देत आपला कान्सदौरा रद्द केला आहे. शेलार यांनी आपल्या विभागासाठी इंधन बचतीचे तीन महत्त्वाचे निर्बंध लागू करत जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाइन, सरकारी कामकाजासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हे नवीन नियम लागू केले आहेत. देशहितासाठी वैयक्तिक प्रलोभनं बाजूला सारून शिस्त पाळणं, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे शेलार यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आय आय टी मुंबई इथं हवेतला कार्बनडाय ऑक्साइड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्त्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बनडाय ऑक्साइडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आय आय टी मुंबईच्या चमूचं त्यांनी यावेळी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसांत हा प्रकल्प व्यावसायिक तत्त्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

****

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची इमारत जून २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. या स्थानकाचा जवळपास एक एकर जागेचा परिसर पूर्णपणे छताने आच्छादित केला जाणार आहे. या स्थानकात पहिल्या मजल्यावर खाद्य पदार्थांची दुकानं आणि हॉटेल, मुलांसाठी खेळ, तसंच प्रवाशांच्या आरामासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. स्थानकाच्या दोन्ही बाजूस तिकीटघर आणि प्रवेशद्वार असणार आहे. या कामाबाबत नुकतीच खासदार डॉ. भागवत कराड यांनी विविध रेल्वे संघटना आणि रेल्वे अधिकारी यांची बैठक घेतली, त्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पीटलाईनचं काम येत्या चार महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.

लातुर जिल्ह्यात, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींच्या ६ शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केलं आहे. या अतर्गत जिल्ह्यातील लातूर एमआयडीसी, लामजना, तोंडारपाटी, मरशिवणी, जाऊ आणि बावची या निवाशी शाळांचा समावेश आहे. इथं प्रवेशासाठी शासनाचे आरक्षणाचे नियम लागू असून, त्यानुसार अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त भटक्या जमाती ३ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५ टक्के जागा राखीव आहेत.

****

महाराष्ट्र शासनानं सुरु केलेलं अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण तात्काळ थांबवावं या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जनतेसमोर जाहीर करण्यात यावा. अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच नागरिकांना त्यावर सूचना, हरकती आणि मते प्रभावीपणे मांडता येतील. त्या मांडण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत वाढवावी, अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी यावेळी केली.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाची प्लेऑफमध्ये समावेश करण्याची आशा संपुष्टात आली आहे. सध्या मुंबईचा संघ ११ पैकी आठ सामने गमावून सहा गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर २ गडी राखून विजय मिळवत, गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केलं. आरसीबीसह सनरायजर्स हैदराबाद, आणि गुजरात टायटन्स हे दोन संघही प्रत्येकी १४ गुण मिळवत, अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्ज १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आज पंजाब किंग्ज संघाचा दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सामना होणार आहे. धर्मशाला इथे संध्याकाळी साडे सात वाजता होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवल्यास, पंजाब संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

****

उद्याच्या १२ मे, जागतिक परिचारिका दिनाचं औचित्य साधून धुळे जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशन, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं आज रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केलं.

****

राज्यात आज जळगाव इथं सर्वाधिक ४४ पूर्णांक पाच दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४२ पूर्णांक आठ, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक दोन, बीड इथं ४२ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

****

कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं गुजरातमधलं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत  'सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे, असं राज्यपाल म्हणाले.

****

जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक सहा दशांश टक्के वाढ नोंदवू शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...