Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन
दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम केला आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम निर्धाराचे प्रतीक असल्याचं म्हटलं
आहे. या मोहिमेच्या यशामागे सशस्त्र दलांचे अद्वितीय शौर्य आणि दृढनिश्चय असल्याचं
राष्ट्रपती म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी यांनी पहलगाम
इथं निष्पाप भारतीयांवर झालेल्या हल्ल्याला सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचं
सांगत, ऑपरेशन सिंदूरमुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत देशाची कटीबद्धता अधोरेखित झाल्याचं नमूद
केलं. तसंच नागरिकांनी सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ सामाजिक माध्यमांवरील प्रोफाइल
फोटो बदलण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनी ऑपरेशन सिंदूर ही भारताची ऐतिहासिक मोहीम असल्याचं सांगत, भारतीय सैन्याच्या
अचूक कारवाईची आणि पराक्रमाची प्रशंसा केली.
****
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब
कल्याण मंत्रालयानं मातृ आणि बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ‘जननी’ हा डिजिटल
उपक्रम सुरू केला आहे. प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात
जतन आणि निरीक्षण करण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत
एक कोटी ३४ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गर्भावस्थेपूर्व सेवा, प्रसूती, प्रसूतीनंतरची
काळजी, नवजात बालकांची देखभाल आणि कुटुंब नियोजन सेवांचा मागोवा घेणं, हा या उपक्रमाचा
उद्देश आहे.
****
टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय
जोसेफ यांनी आज तामिळनाडूचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. कालही विजय
यांनी राज्यपालांची भेट घेऊन पक्षाच्या आमदारांची यादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचं
पत्र सादर केलं होतं. सरकार स्थापनेसाठी विजय यांना आणखी आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता
आहे. दरम्यान, व्हीसीके पक्षानं विजय यांना पाठिंबा देण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही.
डाव्या पक्षांनीही राज्यपालांकडं सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सरकार स्थापन करण्याची आणित विधानसभा सभागृहात बहुमत
सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
****
तंत्रज्ञान विकास मंडळानं
स्वदेशी विकसित टाईप-फोर कंपोझिट सीएनजी सिलिंडर उत्पादन आणि व्यापारीकरणासाठी प्रगत
उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी एका खासगी फर्मसोबत करार केला आहे. या उत्पादन निर्मितीत
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. आत्मनिर्भर
भारत अंतर्गत स्वच्छ ऊर्जा गतिशीलता, कार्बन उत्सर्जन कमी करणं
आणि स्वदेशी उत्पादन मजबूत करण्याच्या दृष्टीने सरकारचं हे महत्वाचं पाऊल आहे. या उपक्रमाच्या
माध्यमातून पर्यावरणपूरक वाहतूक आणि नवीन ऊर्जा क्षेत्रातील प्रगत गॅस साठा प्रणाली
सिस्टममध्ये भारताच्या देशांतर्गत क्षमतांचं बळकटीकरण अपेक्षित आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या, शुक्रवारी
जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एक
पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे ‘संकल्प सप्ताहा’ची सांगता आणि थॅलेसेमिया मुक्तीसाठी पुढील
वाटचालीसाठी आरोग्य विभागाचा निर्धार, या विषयी कार्यक्रमाचं आयोजन
करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांची उपस्थिती असणार आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर
तालुक्यातील तीन पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लुचे नमुने पॉझीटीव्ह आले. त्यामुळं या पोल्ट्री
फार्मच्या जवळ असणाऱ्या इतर सहा पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य
नष्ट करण्यात आलं आहे. याठिकाणचे नमुने पुढील तपासासाठी भोपाळला पाठवण्यात आले आहेत.
****
पुणे जिल्ह्यातील बालिका लैंगिक
अत्याचार प्रकरणी नंदुरबारमध्ये काल कॅन्डल मार्च काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला
मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
****
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू
घडविण्याच्या उद्देशाने केंद्र तसंच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात
आलेल्या खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर म्हणजे राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटिंग, सायकलिंग आणि
अॅथलेटिक्स या खेळांच्या निवड चाचण्या, पुण्यातल्या बालेवाडीमधील
शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या ११ आणि १२
तारखेला तसंच १८ आणि १९ तारखेला घेण्यात येणार आहेत. या निवड प्रक्रियनंतर अॅथलेटिक्समध्ये
१६ खेळाडू, सायकलिंगमध्ये १ आणि शुटिंग या क्रीडा प्रकारामध्ये १० खेळाडूंची निवड करण्यात
येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी उद्या ०८ मे पर्यंत kiscepune@gmail.com या ई-मेलवर
अर्ज पाठवण्याचं आवाहन क्रीडा विभागाने केलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या
अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं, अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबाद
इथं होणार आहे.
दरम्यान, स्पर्धेत आज
संध्याकाळी लखनऊ इथं लखनऊ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्सं बेंगळुरु यांच्यात सामना
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment