Wednesday, 20 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या अधिकृत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय सुमदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध 'कोलोसियम' स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान आज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जियो माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील.

****

भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे ९९ टक्के विद्युतीकरण पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या वर्षी मार्चपर्यंत ६९ हजार ८७३ किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झाले होतं. या कामगिरीमुळे भारताने युरोपियन युनियन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागे टाकलं आहे.

****

अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरीकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं, आणि बनावट औषध विक्रीला आळा घालण, अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून, यासाठी केंद्र सरकारने कायदे करावे, अशी मागणीही संघटनेनं केली आहे.

****

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते काल संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी ३९ हजार कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

नीट युजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्चरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ देण्यात येणारे पुरस्कार काल जाहिर झाले. ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १४ जून रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

****

भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या २६ विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईई च्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. मार्च २०२६ ला दहावीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची २२ मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची दोन वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल.

****

अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के.एल. राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रित बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनुर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यांत प्रिन्स यादव याची निवड झाली आहे.

****

राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधल्या ६३३ गावं आणि एक हजार सहाशे बावन्न वाड्यांमध्ये सातशे सहा टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक, म्हणजे २४४ टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत.

****

अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः ८ ते ९ जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामं तातडीने उरकून घ्यावीत, असं आवाहन करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...