Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 20 May 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मे २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· अणुऊर्जा
निर्मितीसाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांसोबत सामंजस्य करार
· नीट
पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे; मोटेगावकर
यांच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी
· ऑनलाईन
फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलीसांकडून पर्दाफाश; चार
संशयितांना अटक
· डॉ.
गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
· उन्हाच्या
वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या
आणि
· पुढील
दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता
****
महाराष्ट्रात
अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी,
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर
जनरेशन कंपनी लिमिटेड, या चार कंपन्यांसोबत सुमारे साडेसहा लाख
कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा
तसंच एक लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपारिक ऊर्जा मंत्री
अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ ऊर्जा
निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी
निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान,
ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया असल्याचं,
फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीने काल मुख्यमंत्र्यांची
भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,
इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंह यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या विकासासाठी शासन राबवत असलेल्या विविध
योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
****
नीट पेपरफुटी
प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तीन
विद्यार्थ्यांच्या घरांवर काल छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्त्वाची
कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात
आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का,
याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान
एक हजार विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं
वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
दरम्यान,
या प्रकरणी सीबीआयनं लातूर इथं आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी
कोचिंग क्लासमधल्या कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोटेगावकर
याच्या बारावीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी
सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मोटेगावकर आणि
पी. व्ही. कुलकर्णी या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल लातूर इथं
RCC क्लासेससमोर निदर्शनं केली. मोटेगावकर संचालित RCC
क्लासच्या हजारो विद्यार्थ्यांकडून घेतलेलं शैक्षणिक शुल्क परत करण्यात
यावं, आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी,
अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पेट्रोल आणि
डिझेलच्या किमतींमध्ये काल सुमारे नव्वद पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली. एक आठवड्याहून
कमी काळात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे आता मुंबईत पेट्रोल १०७ रुपये ५९ पैसे
आणि डिझेल ९४ रुपये ८ पैसे प्रतिलीटर झालं आहे. चार वर्षांहून अधिक काळानंतर ही दरवाढ
झाली आहे. इराणचं युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद होणं, यामुळे
कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
पुणे विमानतळावरून
तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये दोन महिला आणि एका अल्पवयीन
मुलाचा समावेश आहे. ते पुण्याहून आसामच्या गुवाहाटी इथं जाण्याच्या प्रयत्नात होते.
मागच्या दहा महिन्यांमध्ये पुण्यातून सत्त्याण्णव बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात
आली आहे.
****
अधिक परतावा
मिळवून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलीसांनी
एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चार संशयितांना अटक केली. सायबर पोलीसांनी तांत्रिक
विश्लेषण करुन थेट वसई इथं सुरु असलेलं बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं. वेगवेगळ्या
बँक खात्यांमधील तब्बल १ कोटी १९ लाख रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत
मिळवून देण्यात पोलीसांना यश आलं आहे. या अभियंत्याची तब्बल तीन कोटी १४ लाख ९९ हजार
८९१ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
****
७० कोटी रुपयांच्या
आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पी एम एल
ए न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी
वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
****
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ. गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य
परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २३ तारखेला हा पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहे. डॉ. गनी पटेल यांनी खुलताबादच्या चिस्तीया महाविद्यालयात इतिहास
विभाग प्रमुख तसंच प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय सामाजिक,
साहित्यिक आणि सहकार क्षेत्रामध्येही ते कार्यरत आहेत.
****
संतसाहित्याच्या
ज्येष्ठ अभ्यासक डॉ. कुमुद गोसावी यांचं काल पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं,
त्या ८५ वर्षांच्या होत्या. डॉ. गोसावी या मूळ छत्रपती संभाजीनगरच्या
रहिवासी होत्या. त्यांनी अनेक भारतीय संतांची चरित्रे लिहीली असून,
पैठणच्या संत एकनाथ महाराजांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांची एकनाथ
महाराजांवरील एकोबा ही कादंबरी मराठीसह इंग्रजीतही प्रकाशित झाली. आपल्या साहित्याद्वारे
गोसावी यांनी, संतांचे विचार, भक्ती आणि समाज
प्रबोधनाचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं.
****
अंबाजोगाई इथल्या
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे
प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला.
काल सकाळी ही घटना उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ
बुरांडे यांचा बुडून मृत्यू झाला होता.
****
बीड जिल्ह्यात
माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका
बारा वर्षांच्या मुलाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास
ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
शासनाच्या विविध
योजनांच्या अनुदानाला कथितरीत्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ काल बीड इथं पंचायत
समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं
शेतकरी सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औषध विक्रेता
संघटनेच्या वतीनं, आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर
नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या
सहाय्यक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी
आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवावीत, तसंच गरज भासल्यास,
सदर विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं
आहे.
****
परभणी जिल्ह्यात,
महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण
प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात
येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार
आहे.
****
बीड जिल्ह्यात
गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरच्या गावांतली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात
घेत, शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे.
आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
****
राज्यात उन्हाच्या
वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं
राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधल्या ६३३ गावं आणि एक हजार सहाशे बावन्न वाड्यांमध्ये सातशे
सहा टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक,
म्हणजे २४४ टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत.
****
राज्यात काल
अमरावती इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश
सेल्सियस तापमानाची नोंद झाली, त्या खालोखाल
अकोला इथं ४६ पूर्णांक पाच दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी
४४ पूर्णांक दोन, बीड ४३ पूर्णांक तीन,
छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, तर धाराशिव
इथं ४२ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
येत्या दोन दिवसात
मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
दरम्यान,
अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः ८ ते ९ जून दरम्यान
मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान
तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक
कामं तातडीने उरकून घ्यावीत, असं आवाहन वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment