Monday, 11 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार नागरिकांनी इंधनाचा योग्य आणि संयमानं वापर करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी, पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जगभरात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाल्याचं सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी काल हैदराबाद इथल्या जाहिर सभेत देशाला सशक्त बनवण्यासाठी सात प्रकारचे संकल्प करण्याचं आवाहन केलं, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील धोरणांमुळे भारताला आवश्यक तेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऊर्जा बचत, आत्मनिर्भरता आणि जबाबदार वापर ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.

****

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तत्पूर्वी त्यांनी सोमनाथ इथं रोड शो मध्ये सहभाग घेतला, आणि सोमनाथ मंदिराच्या समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि दीर्घकालीन परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या विशेष प्रदर्शनाला भेट दिली.

****

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आज साजरा होत आहे. १९९८ मधल्या पोखरण अणुचाचण्यांच्या यशाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोखरण अणुचाचण्यांच्या यशामागील आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि वैज्ञानिक कौशल्याचं आपण आज अभिमानाने स्मरण करत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रतिभेला प्रोत्साहन, संशोधनाला बळ आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणारे उपाय निर्माण करण्यावर आपला भर कायम राहील, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि तज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

जागतिक स्तरावर अस्थिरता असूनही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालु आर्थिक ‍वर्षात यात सहा पूर्णांक सहा शतांश टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचं भारतीय स्टेट बँकेनं आज प्रसारित केलेल्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात मागिल आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित घरेलू उत्पादनात सात पूर्णांक दोन शतांश टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे. अहवालानुसार अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एक वर्ष पहिल्या कर्जवाढीच्या ११ टक्के शक्यतेच्या तुलनेत ती वाढून १६ टक्के झाल्याचं म्हटलं आहे.

****

राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ॲक्टलागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुण्यात काल भारती विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत, तसंच दीड लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी दुसरा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार, येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

****

लातूर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलसमृद्ध अभियानात तांबरवाडी, फत्तेपूर, पारधेवाडी, महादेववाडी, कवळी, हिप्परगा आणि दावतपूर या सात गावांमध्ये आता नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी "एकात्मिक विकास अभियान" राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध शासकीय योजना आणि आरोग्य सुविधा एकत्रितपणे गावपातळीवर पोहोचवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत येत्या १५ मे रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिर तसंच महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिराचा शुभारंभ होणार आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा गावातच उपलब्ध करून देणं, आणि कायमस्वरूपी आरोग्य जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

****

बीड शहरातील भाजी मंडई परिसरात ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध सोरट जुगारावर पोलिसांनी कारवाई केली असून, ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...