Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· ऑपरेशन सिंदूर मोहिमेची वर्षपूर्ती; दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी
भारत कटीबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· देशभरातल्या ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य
तपासणी मोहीम आजपासून सुरू
· विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे शासनाचे
निर्देश
· ऊस शेतीत नवी क्रांती घडवून आणणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचा जालना इथं शुभारंभ
आणि
· धाराशिव जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित
****
ऑपरेशन सिंदूर मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं
आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. या मोहिमेला मिळालेल्या
अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते, या शब्दांत तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य
दलाचं कौतुक केलं. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी, यानिमित्त
दिलेल्या संदेशात भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्व विस्कळीत
करण्याच्या प्रयत्नांना, या मोहिमेतून जोरदार आणि योग्य
प्रत्युत्तर दिल्याचं नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
यासंदर्भात बोलतांना, दहशतवाद
हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं
प्रतिपादन केलं. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो, या कामगिरीतून भारतीय सैन्याची तयारी आणि समन्वय दिसून येत असल्याचंही पंतप्रधानांनी
म्हटलं आहे. या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधानांनी आपल्या
समाजमाध्यमांवर ऑपरेशन सिंदूरचं बोधचिन्ह असलेला डीपी ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही
हा डीपी ठेवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीचा अंदाज
आला,
असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या मोहिमेच्या
दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी
कौतुक केलं. या मोहिमेमुळं आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाचं सामर्थ्य अधिक बळकट
करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
देशभरातल्या ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत
वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ
घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या
मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले -
बाइट- केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय
****
बिहारमधे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा आज
विस्तार झाला. पाटणा इथल्या गांधी मैदानावर राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता
हसनैन यांनी ३० मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये माजी मुख्यमंत्री
नितीशकुमार यांचे पुत्र निशांतकुमार यांचाही समावेश आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र
मोदी,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष
नितीशकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची
पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काऊंटर प्रकरणी
मुंबई उच्च न्यायालयानं २२ जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं २०१८ मध्ये
दिलेल्या निकालात सर्व २२ आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या
भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
अहमदाबादजवळ
नोव्हेंबर २००५ मध्ये झालेल्या कथित एन्काऊंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती.
त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. याप्रकरणातला महत्त्वाचा
साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर २००६ मध्ये झालेल्या कथित एन्काऊंटरमध्ये
मृत्यू झाला होता. याप्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या
२१ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर एन्काऊंटरचा आरोप झाला होता. मात्र, हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण
विशेष न्यायालयानं नोंदवलं.
****
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च
प्राथमिकता असून त्यांची फसवणूक आणि शैक्षणिक नुकसान करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे
दाखल करा असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईत वांद्रे इथल्या डॉ.बळीराम हिरे
महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसवल्याचा
प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा पाटील यांनी मुंबईत सविस्तर आढावा घेतला, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
****
जालना जिल्ह्यात ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या
दिशेने ‘सुपर ५० एआय फार्मर्स’ या अभिनव पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कृषी विभाग आणि फाईंडेबिलिटी
सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
शेती अधिक सक्षम करणं, हा यामागचा उद्देश आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री
पंकजा मुंडे,
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवडक
शेतकरी तसंच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा
आणि लोहारा तालुक्यातल्या सात पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत
पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि संभाव्य
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
यांनी यासंदर्भात आदेश जारी केले. या सातही प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध
नसल्यानं अवैध पाणी उपसा होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत.
****
बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या
तपासात बीड पोलिसांनी लातूर मधून तत्कालीन जिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी अविनाश प्रभाकर
पाठक यांना अटक केली आहे. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याअंतर्गत
लातूर जिल्हा पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास बीड
जिल्हा पोलीसांकडून सुरू आहे.
****
नांदेड इथं ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत ४३
लाख ४८ हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली
आहे. अमेरिका,
कोलंबिया तसंच चीनमधून आणलेल्या शस्त्रांसह देशी तलवारी, खंजीर आदी एकूण ४ हजार ७९६ धारदार शस्त्र यावेळी जप्त करण्यात आली.
****
जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्या
राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे ‘संकल्प
सप्ताहा’ची सांगता आणि थॅलेसेमिया मुक्तीसाठी पुढील वाटचालीसाठी आरोग्य विभागाचा निर्धार, या विषयी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात डॉ अपर्णा डिकोंडवार
यांनी अधिक माहिती दिली -
बाईट - डॉ अपर्णा डिकोंडवार
****
जालन्याच्या जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचा दूरदृश्य
संवाद यंत्रणेच्या माध्यमातून कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्राम
महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध
राहण्याचे निर्देश दिले. कार्यालयीन कामकाजात कोणत्याही खाजगी व्यक्तीचा हस्तक्षेप
असू नये,
अशी स्पष्ट सूचनाही मित्तल यांनी दिल्या.
****
लातूर–जहीराबाद या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्यानं
वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लातूर-बाभळगाव-निटूर ते निलंगा–औराद शहाजानी
मार्गे जाणाऱ्या या महामार्गावर मोठमोठ्या भेगा, खड्डे
आणि तडे पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढल्याचं, याबाबतच्या
बातमीत म्हटलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधल्या ३ पोल्ट्री फार्ममधल्या
सुमारे अडीच लाख कोंबड्या, सव्वा ९ लाख अंडी आणि २८ मेट्रीक
टनांहून अधिक पशुखाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बर्ड फ्लूमुळे ही कारवाई करण्यात आली.
****
उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात
घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे तिरूपती
- छपरा जंक्शन – तिरूपती दरम्यान विशेष रेल्वेच्या
दोन फेरी चालवण्यात येणार आहे. ही विशेष रेल्वे आज रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी तिरुपती इथून सुटेल आणि रविवारी सकाळी पावणे आठ वाजता छपरा इथं पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात ही गाडी १२ मे रोजी सकाळी ५ वाजता छपरा इथून सुटेल आणि गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता तिरुपती इथं पोहोचेल.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्सं
बंगळुरु यांच्यात सामना होणार
आहे. लखनऊ इथं सायंकाळी साडे सात वाजता सामना सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment