Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडून
उच्चस्तरीय समिती स्थापन
· इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि
गृहविभागाची संयुक्त कारवाई-मुख्यमंत्र्यांचा इशारा
· देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा मागे घेण्याची विविध
संघटनांची मागणी
आणि
· मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज
****
घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या
लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं
एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर
नाओलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्याबदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे पुढे
गंभीर आव्हान उभं राहातं, आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन
करेल, असं अमित शाह यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
भारत आणि अमेरिका यांच्यात आज महत्त्वाचा
द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्त्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची
उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो
यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री
डॉ. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची
बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही
मदत करण्यावर डॉ. जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला.
****
राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी
लक्षणीयरीत्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृहविभाग
संयुक्त कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पेट्रोल आणि
डिझेलच्या वाढीव मागणीचाही पुरवठा केला जात असल्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण होत
असल्याचं त्यांनी सांगितलं. याचवेळी, व्यावसायिक पेट्रोल डिझेलचा
खप मात्र कमी होताना दिसत असल्यामुळे वाढीव मागणी असलेल्या भागातलं पेट्रोल आणि डिझेल
व्यावसायिक ठिकाणी वळवलं जात आहे का, याच्या पडताळणीचे आदेश देण्यात
आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकार पेट्रोल आणि
डिझेलची साठेबाजी करू देणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिला.
****
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे
शिल्पकार ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचं नाव देण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात
येणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण
बदल्यांना मुदतवाढ देण्याला, तसंच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये
पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यालाही आज मान्यता
देण्यात आली.
डोंबिवलीतल्या सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर
मंदिराला जमीन देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला.
****
नाशिक मधल्या कांद्याला १ हजार ५८०
रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे
जाहीर केलं आहे. कांद्याचे दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला,
दरम्यान, कांद्याला २४ रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा
या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्तारोको
आंदोलन करण्यात आलं.
****
भारतीय जनता पक्षानं लोकशाहीचा लिलाव
मांडल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपूरमध्ये
माध्यमांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली
जिल्ह्यातले काँग्रेसचे २३ नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असून, या सर्वांना व्हीप जारी करून अपात्र करण्याची
कायदेशीर प्रक्रिया तातडीनं सुरू करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या
मुद्द्यांवरून आज नागपूर इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सायकल
मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
****
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या
प्रमुख उपस्थितीत मुंबईत सायनच्या महानगरपालिका रुग्णलयात 'टीबी मुक्त भारत' अभियानाचा
आज शुभारंभ करण्यात आला. मुंबईला टीबीमुक्त करण्यात आपण यशस्वी झालो, तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल, असं राज्यपालांनी नमूद केलं. या कार्यक्रमात राज्यपालांनी ३० क्षयरुग्णांच्या
पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. राज्यपालांच्या या निर्णयाबद्दल महापौर रितू तावडे
यांनी राज्यपालांना ‘निक्षय मित्र’ प्रमाणपत्र
प्रदान केलं.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं
‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’
ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री
प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. प्रत्येक आगाराला आपल्या बसगाड्यांच्या इंधन वापराचं
नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था
आणि काही धार्मिक संघटनांनी, प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा
कायदा २०२६’ ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली
आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला
आहे. मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी सरकारनं या मंदिरांच्या मूलभूत समस्यांचं
निराकरण करावं, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
****
बीड शहरातही या प्रस्तावित कायद्याविरोधात
सकल वारकरी समाज आणि मंदिर संरक्षण समितीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं.यात, हा प्रस्तावित कायदा तात्काळ रद्द करावा,
या प्रमुख मागणीसाठी वारकरी दिंडी काढण्यात आली.
यावेळी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरातील
भाविकांच्या सोयीसाठी विविध सार्वजनिक सुविधांच्या दुमजली बांधकामाला राष्ट्रीय स्मारक
प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. काल याबाबतचे अधिकृत मंजुरी पत्र जारी करण्यात आलं.
या विकासकामामध्ये व्यापारी संकुल, दर्शनबारी, पादचारी पूल,
प्रतीक्षा कक्ष, भक्तनिवास, सभामंडप, आदी कामांचा समावेश आहे.
****
नांदेडचं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान
आणि पुण्याचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केन्द्र यांच्यामधे नुकताच एक सामंजस्य
करार झाला आहे. यानुसार, भांडारकर संशोधन केन्द्राच्या
‘भारत विद्या’ या विविध ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या मंचासाठी मराठवाडा-विदर्भ विभागात
समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान कार्य करणार आहे. प्राचीन भारतातल्या विविध
ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार
तयार करण्यात आले आहेत.
****
जागतिक जैवविविधता दिनानिमित्त हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात उगम ग्राम विकास संस्थेत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात
आली. उगमचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. कयाधू
नदी काठावरच्या जैवसंपदेचं संवर्धन गरजेचं असल्याचंही पाईकराव यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी
निवडणूक २०२६ चा कार्यक्रम घोषित झाला असून, दोन्ही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात कायदा
आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक
विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या काही शेतकऱ्यांचे अर्ज कागदपत्रांतील किरकोळ त्रुटींमुळे
विमा कंपनीमार्फत अपात्र ठरवण्यात आले होते. असे चार हजार १०२ अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी
प्राप्त झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता तात्काळ
करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने
केलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमधे
होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या १४ हवामान
केंद्रांपैकी ६० टक्के केंद्रांवर, पुढचे दोन दिवस अडीच मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मोसमी पावसाचं आगमन झालं
असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल.
****
राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी
इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी
४३ अंश सेल्सियस, छत्रपती संभाजीनगर
इथं ४१ पूर्णांक दोन, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस
तापमान नोंदवलं गेलं.
विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे
दोन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment