Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26
May 2026
Time
11.00 to 11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांच्या ‘क्वाड’ गटाच्या परराष्ट्र
मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत सुरु झाली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर या
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. क्वाडचा मुख्य भर इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर असेल, असं जयशंकर यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं. जागतिक
स्तरावर पुरवठा साखळीची लवचिकता, संपर्क
मार्गांतले अडथळे, उत्पादन
आणि संसाधनांचं केंद्रीकरण तसंच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांतील कमतरता
यांसारख्या मुद्द्यांवर काम करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. इंडो-पॅसिफिक
क्षेत्रातील विशेष आव्हानांचा सामना करण्यासाठी सामरिक विश्वास वाढवणं, सागरी सुरक्षा सुनिश्चित करणं, आर्थिक पर्यायांना प्रोत्साहन देणं आणि अधिक सखोल
सहकार्याची भावना विकसित करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
भारत
सरकारनं लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस पुरवठा आणि वितरण नियमन सुधारणा आदेश अधिसूचित
केला आहे. याअंतर्गत पीएनजी गॅस जोडणी घेणाऱ्या घरगुती एलपीजी ग्राहकांना अतिरिक्त
सवलत आणि सुविधा देण्यात येणार आहे. या नवीन सुधारित तरतुदींनुसार, पीएनजी जोडणी घेतल्यानंतर ग्राहकांना ३० दिवसांच्या आत
एलपीजी जोडणी रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तसंच, भविष्यात पीएनजी सुविधा नसलेल्या भागात स्थलांतरित झाल्यास, ग्राहकांना त्यांची एलपीजी जोडणी पूर्ववत करण्यासाठी
ट्रान्सफर व्हाऊचर मिळवण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. हा निर्णय विशेषतः बदल्या
होणारे कर्मचारी, स्थलांतरित
कुटुंबं,
भाडेकरू आणि विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार
आहे.
****
केंद्र
सरकारने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन मंडळ नियम आणि राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण
नियम २०२६ अधिसूचित केले आहेत. राष्ट्रीय क्रीडा मंडळ हे राष्ट्रीय क्रीडा
संघटनांच्या मान्यता प्रक्रियेवर आणि प्रशासनाच्या निकषांवर देखरेख ठेवणार आहे.
तसंच,
राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण क्रीडाविषयक वादांचे जलद, स्वतंत्र आणि कमी खर्चात निवारण सुनिश्चित करणार आहे.
****
बाजारातील
अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना
दिलासा देण्यासाठी कांद्याला एक हजार ५८० रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित
खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या दीड महिन्यापासून कांद्याला क्विंटलमागे
केवळ एक हजार ते बाराशे रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्याने नाशिक
जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव तेराशे
ते साडे तेराशे रुपयांपर्यंत पोहोचला होता; त्यानंतर काल केंद्र सरकारने एक परिपत्रक जारी करत
कांद्याला एक हजार ५८० रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं.
****
राज्यातल्या
अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी
यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा-टॅक्सी संघटनांनी
सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातल्या विविध रिक्षा आणि
टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात
आलं होतं,
त्यावेळी ते बोलत होते.
****
नीट
पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याने राज्यभरात चर्चेला उधाण आलं
असून,
यामुळे प्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ वरही प्रश्नचिन्ह निर्माण
झाल्याची खंत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र, या संकटातून लातूर नक्कीच बाहेर पडेल आणि विद्यार्थ्यांचं
यश पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते काल लातूर इथं एका
कार्यक्रमात बोलत होते. लातूरची शैक्षणिक परंपरा आणि विद्यार्थ्यांची मेहनत ही
राज्यासाठी आदर्श राहिली आहे. काही व्यक्तींमुळे संपूर्ण लातूरच्या शैक्षणिक
प्रतिमेला धक्का बसू नये, असंही
देशमुख यांनी स्पष्ट केलं.
****
सोलापूर
जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अधिक मासात व्हीआयपी
दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
यांनी दिली. सध्या सुरु असलेल्या अधिक मासात मंदिरात देशभरातून लाखो भाविक पंढरपूर
इथं दर्शनाला येतात, व्हीआयपी
दर्शनामुळे सामान्य दर्शन रांगेतील भाविकांना दर्शना ला विलंब होतो, त्यामुळे हे दर्शन बंद करण्यात आलं आहे.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध पदवी आणि पदव्यूत्तर
अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या ३० दिवसांच्या आत जाहीर केले. विद्यार्थ्यांनी आपले
निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावेत, असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग
साबळे यांनी केलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत प्रयोगशाळा तपासणी सेवा पूर्ववत
सुरू झाली असल्याची माहिती, जिल्हा
आरोग्य अधिकारी, डॉ. संतोष सूर्यवंशी
यांनी दिली. नागरिकांना आणि गरोदर मातांना पूर्वीप्रमाणेच सर्व आवश्यक तपासण्या
मोफत उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment