Saturday, 9 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

 

·      दहावीचा निकाल जाहीर, ९२ टक्के मुलं उत्तीर्ण; मराठवाड्यात लातूर जिल्हा अव्वल

·      थॅलेसेमिया'संकल्प सप्ताहाचा समारोप;राज्य थॅलेसेमियामुक्त करण्याचा निर्धार

·      वाहतुक नियमांविषयी जागरूकतेसाठी राज्यभरात ६० वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव

·      राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश

आणि

·      आगामी दोन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९२ पूर्णांक ०९ शतांश टक्के लागला असून यंदाही ९४ पूर्णांक ९६ शतांश टक्के निकालासह मुलींनी बाजी मारली आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतकं आहे.

विभागीय निकालात यंदा ९७ पूर्णांक ६२ शतांश टक्के गुणांसह कोकण विभाग अव्वल स्थानी तर ८८ पूर्णांक ४१ शतांश टक्के निकालासह छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८९ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांसह बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तर जालना जिल्ह्याचा निकाल ८५ पूर्णांक ९० शतांश टक्के लागला आहे. लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ४२ शतांश टक्के लागला आहे. विभागात लातूर जिल्हा ९२ पूर्णांक आठ टक्क्यांसह पहिल्या तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३ पूर्णांक ६२ शतांश टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल ९१ पूर्णांक २९ टक्के लागला आहे.

राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले असून, यात लातूर विभागातील सर्वाधिक १०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी २३ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या १७ माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ७९ पूर्णांक ६५ शतांश टक्के लागला असून, गौरी जगताप ही विद्यार्थिनी ९४ पूर्णांक ६० शतांश टक्के घेऊन गुण घेऊन मनपाच्या सर्व शाळांमधून प्रथम आली आहे

****

दरम्यान, या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळालं नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी या विद्यार्थांना दिला.

****

महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित 'एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे' अभियानांतर्गत 'संकल्प सप्ताहाच्या' समारोप कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयी सुविधांसाठी शासन कार्य करत असल्याचं, बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या..

बाईट- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

या कार्यक्रमादरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिला आणि मुलींसाठी 'पीसीओडी क्लिनिक'चं ऑनलाईन उद्घघाटन करण्यात आलं. थॅलेसेमिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर, संस्था आणि रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

वाहतुक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभरात ६० वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असून, या उद्यानात लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत.

****

'मातोश्री ग्राम समृद्धी' योजनेंतर्गत शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्र शासनाचा विकसित भारत - रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा अद्याप अंमलात आलेला नाही; त्यामुळे मनरेगा योजना पूर्ववत सुरू राहील, असं मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं.

****

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी आज शपथ घेतील. काल त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. कोलकाता इथल्या ऐतिहासिक 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर हा शपथविधी सोहळा होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्ता स्थापन करत आहे.

दरम्यान, तमिळनाडूत टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. डाव्या पक्षांसह इतर काही पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं, त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे.

पुदुच्चेरीमधे ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन. रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

****

आकाशवाणीच्या नव्वदाव्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉन घेण्यात आली. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅराथॉनमध्ये सहभागी झाले. दिल्ली इथं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या उपक्रमात सहभागी झाले. यासंदर्भात गौरव द्विवेदी म्हणाले…

बाईट- प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सनी खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी कृत्रिमरित्या तयार केलेल्या चीजचा वापर केल्यास, त्याची माहिती पदार्थांच्या सूचीत स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

****

राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. ही खरेदी केंद्रं पोर्टल बंद केल्यानं रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडलेली आहे. याबाबत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती.

****

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांना भेटी द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण योजनांची माहिती देऊन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात  २०२५-२६ मध्ये शासकीय आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला, याची माहिती तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

****

नाशिकच्या ‘टीसीएस’ कंपनीतीतील सक्तीनं धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला येत्या सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा खानला पोलिसांनी परवा छत्रपती संभाजीनगर इथं नारेगाव परिसरातून अटक केली.

दरम्यान, निदा खानला छत्रपती संभाजीनगर इथं लपण्यास मदत केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रशासनानं अधिक चांगलं काम करावं, असं आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते काल लोणावळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. 'सामाजिक न्याय' ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत लातूर इथं काल समाधान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये विविध १२ विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्याद्वारे नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. एकूण १६५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं. शहरातील सुमारे दोन हजार नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. संबंधितांनी विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन प्राधिकरणाचे सचिव प्रविण उन्हाळे यांनी केलं आहे.

****

हवामान

लातूर जिल्ह्यात काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सध्या काढणीस आलेला मका, हरभरा, तसंच फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

आगामी दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव तसंच परभणी इथं ४० अंशापेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...