Tuesday, 12 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      परकीय चलन खर्चाच्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार

·      विकसित भारत जी रामजी कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी

·      भविष्यात अर्थव्यवस्थेच्या नेतृत्त्वाची महाराष्ट्रात क्षमता-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये समावेशाची आशा संपुष्टात

****

परदेशी उत्पादनांचा वापर कमी करणं आणि परकीय चलन खर्च करणाऱ्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुनरुच्चार केला. गुजरातच्या वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यांनी, परदेशी वस्तूंच्या ऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करून “व्होकल फॉर लोकल” ही जनचळवळ बनवावी, असं आवाहन केलं. सध्याच्या परिस्थितीत सोन्याची खरेदी टाळावी, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य द्यावं, असंही पंतप्रधानांनी सुचवलं. ते म्हणाले…

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, पंतप्रधानांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियम पदार्थ तसंच परदेशी उत्पादनांचा अनिर्बंध वापर टाळण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले…

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीने प्रतिसाद देत आपला 'कान्स' दौरा रद्द केला. शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्त्वाचे निर्बंध लागू केले, यामध्ये जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाइन,  तसंच सरकारी कामासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, या नियमांचा समावेश आहे

****

दरम्यान, देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून ६० दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. देशात ४५ दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि ६० दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं. तर देशात सध्या ७०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली.

****

जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक सहा दशांश टक्के वाढ नोंदवू शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

****

विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजिविका मिशन ग्रामीण कायदा २०२५ लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या एक जुलै पासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान

****

भविष्यात अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट - २०२६ या दोन दिवसीय परिषदेत Vision For India @100 या परिसंवादात बोलत होते. महाराष्ट्र आज ६६० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे, जी देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे १५ टक्के योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा २० टक्क्यांहून अधिक असून, देशाची 'डेटा सेंटर' आणि 'स्टार्टअप' राजधानी महाराष्ट्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातल्या न्यायालयांसाठी ‘एक खटला एक डाटा’ प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं, त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या–त्या प्रकरणाची माहिती, एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबॉट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली.

****

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित नऊ आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक, अशा दहा जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे दहा अर्ज तर पाच अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यता भासल्यास सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे.

****

कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही, याचं गुजरातमधलं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलं आहे. ते काल मुंबईत 'सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते.

****

बालभारती’तर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहेत. जून २०२६ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पुस्तकं उपलब्ध होणार असल्यानं पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तके खरेदी करावीत, असं आवाहन ‘बालभारती’ च्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची इमारत जून २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. या स्थानकाचा जवळपास एक एकर जागेचा परिसर पूर्णपणे छताने आच्छादित केला जाणार आहे. या स्थानकात पहिल्या मजल्यावर खाद्य पदार्थांची दुकानं आणि हॉटेल, मुलांसाठी खेळ, तसंच प्रवाशांच्या आरामासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. स्थानकाच्या दोन्ही बाजूस तिकीटघर आणि प्रवेशद्वार असणार आहे. पीटलाईनचं काम येत्या चार महिन्यात पूर्ण होणार असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याचं प्रभावी व्यवस्थापन करणं आवश्यक असून, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. त्या काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. भूजल पातळीत वाढ, पाणी साठवण क्षमता वाढ, कालव्यांची दुरुस्ती आदी मुद्यांचा आढावा घेऊन त्यांनी, आवश्यक सूचना केल्या.

****

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्याबरोबरच पर्यायी पीक धोरण राबवण्याची आवश्यकता असल्याचं, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. वाढतं तापमान, अवकाळी पाऊस, आणि घसरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं, त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये समावेश करण्याची आशा  संपुष्टात आली आहे. सध्या मुंबईचा संघ ११ पैकी आठ सामने गमावून सहा गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. आरसीबीसह सनरायजर्स हैदराबाद, आणि गुजरात टायटन्स हे दोन संघही प्रत्येकी १४ गुण मिळवत, अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झालेला पंजाब किंग्ज संघ १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

राज्यात काल जळगाव इथं सर्वाधिक ४४ पूर्णांक पाच दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४२ पूर्णांक आठ, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक दोन तसंच बीड इथं ४२ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

****

 

 

 

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...