Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 May 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१७ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातल्या सहा धरणांमधील गाळ काढून
त्यांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित केली जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील जायकवाडीसह उजनी, मुळा, कोयना, हातनूर आणि गोसीखुर्द या धरणांचा
यात समावेश आहे.यासंदर्भातील विविदा लवकरच प्रसिध्द होणार असल्याचही ते म्हणाले. काढलेला गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येणार
असल्याचही ते म्हणाले. जायकवाडी धरणात
१५ दशलक्ष घनमीटर एवढा गाळ साचलेला आहे. साधारणपणे
एक दशलक्ष घनमीटर पाणी निर्मितीसाठी ९०० कोटी
रुपये खर्च येतो, त्यामुळे गाळ काढण्याचं
महत्व याद्वारे लक्षात येतं.
****
जनगणना-२०२६ च्या आताच्या दुसऱ्या
टप्प्यात, घर यादी आणि घरमोजणी प्रक्रियेला
कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारने निश्चित केलेले ३३ प्रश्न यात विचारले
जाणार आहेत. ही घर यादी आणि घरमोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहाणार आहे. यामध्ये संबंधित
प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन घरातील स्थिती, सोयी-सुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील.
स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या
नागरिकांनी आपला स्वयं-गणना ओळख क्रमांक द्यायचा आहे. ज्यामुळे माहितीची पडताळणी करणे
आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात
येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासनही सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे.
****
आपत्ती-संकटांचं दशक म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँडस विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी
एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल
नेदरलँडस् इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक
संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट
यांसारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा
मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, भारताच्या सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या
प्रयत्नांना महत्त्वपूर्ण चालना देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या या भेटीत नेदरलँड्सनं प्रसिद्ध अनाईमंगलम ताम्रपट भारताला सुपूर्द केले. तीन
शतकांहून अधिक काळ लायडन विद्यापीठात जतन केलेल्या, ११व्या शतकातील चोल कालीन या कलाकृती तमिळ इतिहासाचा आणि
चोल साम्राज्याचा समृद्ध वारसा दर्शवतात.
****
देशात इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश
घेणाऱ्या शंभर मुलांपैकी केवळ ६२ मुलं इयत्ता बारावीपर्यंतचं शिक्षण घेतात असं नियतकालिक
रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात १४ ते १८ वर्ष वयोगटातील दोन कोटींहून
अधिक मुले शालाबाह्य आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण
आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली.
शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन
करणे आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी
धोरणांवर चर्चा करणे, या उद्देशानं काल दिल्लीत
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची
आव्हानं या कारणांमुळे ही मुले शिक्षण व्यवस्थेबाहेर राहात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
थायलंडच्या बँकॉक इथं सुरू असलेल्या
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात, भारताचे सात्विक साईराज
रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विजेतेपदासाठी
लढत आहेत. इंडोनेशियाच्या जोडीसोबतचा त्यांचा अंतिम फेरीचा सामना थोड्याच वेळेपूर्वी
सुरू झाला आहे.
****
नागपूर-मडगाव रेल्वे एक्सप्रेसला
काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या
हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून दोन दिवस चालवण्यात येत असलेल्या या रेल्वेला
प्रवाशांचा शंभर टक्के आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा
प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल, असं गडकरी यांनी यावेळी
सांगितलं. या रेल्वेला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्त्वाच्या स्थानकांवर
थांबा आहे.
****
मराठवाडा, कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी
पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात, उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही आहे.
****
जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये
शोध मोहीम सुरू केली आहे. गेल्या १२ मे रोजी मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा
एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी
मारला गेला. या घटनेनंतर पुंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
नियंत्रण रेषे लगतच्या कृष्णा घाटी क्षेत्रात
घुसखोराचा खात्मा झाल्यानंतर, संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा
व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, अतिरिक्त तपासणी नाके
उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
****
आयपीएल २०२६ हंगामात प्ले ऑफ पासून केवळ एक विजय दूर असलेल्या गुजरात टायटन्सची प्रतीक्षा केकेआरने आणखी वाढवली.
आठ विजयांसह आधीच १६ गुणांवर असलेल्या गुजरात संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी
त्यांच्या घरच्या मैदानावर, ईडन गार्डन्सवर, २४७ धावांच्या विशाल लक्ष्यासह झाला.
केकेआरसाठी फिन ॲलनने ९३ धावांची स्फोटक खेळी केली, पण तो शतक पूर्ण करू शकला नाही. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग
करताना गुजरातला केवळ २१८ धावाच करता आल्या.
****
No comments:
Post a Comment