Sunday, 24 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

परभणीसह जिल्हाभरात सध्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईसदृश्य स्थितीमुळे नागरीकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. यात गेल्या सहा दिवसांपासून बहुतांश पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा तसंच कॅनच्या रांगा दिसून येत असल्याचं वृत्त आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मशागतीची कामे सुरू आहेत. शेती मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरमध्ये गरजेचं असलेलं डिझेल भरण्याकरीता शेतकरी कॅन घेऊन पेट्रोलपंपांवर दाखल होत आहेत.

****

मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत दीर्घकालीन तर काही ठिकाणी कमी ते मध्यम कालावधीचे पावसाचे खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येवून कमी पाण्यावर तग धरणारी पिकांची निवड, पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीजप्रक्रिया, मिश्रपीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देणं यासह पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि मृद – जलसंधारण उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर इंद्र मणि यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठ आणि कृषि विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीने शेती करावी अथवा थेट संपर्क करण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे.

****

देशात उत्तरेकडील काही राज्यं तसंच विदर्भाच्या काही भागांत आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागांत तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. राज्यात कोकण - मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

****

इबोला या विषाणुजन्य संसर्ग प्रभावित देशांतील बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटना- डब्ल्यूएचओ च्या शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. काँगो, युगांडा तसेच त्यांच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण सुदान आणि इतर देशांमध्ये हा आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

****

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं आहे. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका वैद्यकीय अभ्यासक्रम संस्थेच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचं ‘सॉफ्टवेअर, तर रुग्णालयं आणि सुविधा ‘हार्डवेअर’ असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्ये आणि समर्पण देशातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘विकसित भारत’ आणि ‘निरोगी भारत’ संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनानं विकसित भारत G RAM G अधिनियम- 2025 अंतर्गत, नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्श अर्थात नागरिकांच्या सूचनांसाठी प्रसिध्द केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था किंवा संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना, पुढील महिन्याच्या २१ जून या तारखेपर्यंत सादर करू शकतात, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत G RAM G कायदा, २०२५ची अधिसूचना या मे महिन्याच्या ११ तारखेला जारी करण्यात आली असून, १ जुलै २०२६ पासून तो सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल.

****

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह तीन दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि C-E-P-A अर्थात भारत-कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल हे ओटावा आणि टोरोंटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे.

****

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठकीला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा प्रस्तावित आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, आज पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता मुंबई इंडीयन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबई इथं होणार आहे. तर, दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात कोलकाता इथं होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...