Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 May
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १९ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेच्या
दौऱ्यावर असून, भारत – नॉर्डिक शिखर परिषदेत आज ते सहभागी होणार आहेत.
तंत्रज्ञान, नवीकरणीत ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची
धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं, हा या परिषदेचा उद्देश आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी काल भारत-नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित
केलं. उभय देशांतील ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी
यवेळी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांना नॉर्वेचा
सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन
ऑर्डर ऑफ मेरिट' काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड
पाचवे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला.
दरम्यान, पाच देशांच्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
****
देशातल्या अनेक भागात उष्णतेची
लाट असून, त्यापासून सावध राहण्यासाठी आयुष मंत्रालयाने मार्गदर्शक
सूचना जारी केल्या आहेत. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखणं, टळटळीत उन्हाच्या वेळेत थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क टाळणं, हलक्या सुती कपड्याचा वापर, ॠतुमानानुसार योग्य फळांचं
आणि क्षारयुक्त पेयांचं सेवन यावर मंत्रालयाने भर दिला आहे. सुस्ती, डोकेदुखी, मळमळ, मानसिक स्थितीत बदल, शरीराचं उच्च तापमान, शुष्कता, चक्कर अशी लक्षणं दिसली तर धोक्याचा इशारा मानून वेळीच त्याकडे लक्ष देणं, असंही त्यात म्हटलं आहे. उष्माघात ही वैद्यकियदृष्ट्या आपत्कालीन स्थिती असून, त्याकडे ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. तीव्र आघाताच्या बाबतीत १०८ आणि १०२
या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन, मंत्रालयाने
केलं आहे.
****
आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं
आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर
एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेने
सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री
म्हणाले:
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
पश्चिम आशियातल्या सध्याच्या
भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र
सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी संपूर्ण राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. तेल उद्योगाचे
महाराष्ट्र राज्याचे समन्वयक मिहिर जोशी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात सध्या
संपूर्ण देशभरातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ४४ लाख पीएनजी जोडण्या आहेत. नागरीकांनी
पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी करताना घाईगडबडीने किंवा घाबरुन जाऊन खरेदी करु नये, किंवा त्याची साठेबाजी करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने
यंदाच्या खरीप हंगामासाठी दोन लाख ४७ हजार क्विंटल दर्जेदार बियाण्यांचं नियोजन केलं
आहे. हे बियाणं अधिकृत विक्रेत्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली
आहे. शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणं उपलब्ध व्हावं आणि बोगस बियाण्यांच्या विक्रीला
पूर्णपणे आळा घालण्यासाठी यंदा केंद्र सरकारच्या 'साथी पोर्टल'च्या माध्यमातून विक्री केली जात आहे. शेतकर्यांनी अधिकृत आणि प्रमाणित बियाण्यांचीच
खरेदी करावी, असं आवाहन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी
यांनी केलं आहे.
****
पालघर जिल्ह्यात काल टेम्पोच्या
अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच
लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री
गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या
टेम्पोचा काल एका कंटेनरसोबत अपघात झाला, यात १३ जणांचा
मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. पालकमंत्री नाईक यांनी जखमींची
रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली
तालुक्यात नागपूर आणि अकोला इथल्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत मोठा
शस्त्रसाठा जप्त केला. अंत्रीकोळी गावखेडा परिसरात झालेल्या या कारवाईत दोन देशी बनावटीचे
पिस्तूल, चार मॅगझिन, तब्बल ९२ जिवंत
काडतुसं, चाकू आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment