Thursday, 21 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीस अमेरिकेतले उद्योग अनुकूल-मुख्यमंत्र्यांची माहिती

·      जनगणनेतली जातगणना रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

·      छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या अतिरिक्त वर्गखोल्यांत अंगणवाड्या भरवण्याचे आदेश

आणि

·      राज्यात बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट, वर्ध्यात सर्वाधिक ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

****

भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. काल इटलीत रोम इथं, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत-इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट प्रदान करत असल्याचं ते म्हणाले. भारत-इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असून, दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण औद्योगिक कृती आराखड्यामुळे लष्करी सामग्रीच्या सह-विकासाला आणि सह-उत्पादनाला मार्ग मोकळा झाला आहे. जलवाहतूक, बंदरांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक्स आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

मेलोनी यांनी यावेळी बोलतांना, दोन्ही देशांमधील मैत्री, आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं सांगितलं. दोन्ही देशांमध्ये यावेळी विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले.

****

पंतप्रधानांच्या या परदेश दौऱ्यात विविध देशांसोबत केलेल्या धोरणात्मक करारांमुळे भारताचं पुढील सुमारे दोन दशकांचं भवितव्य सुरक्षित झाल्याचं मत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी अणुऊर्जा महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल “यूएस न्यूक्लिअर एक्झिक्यूटिव्ह मिशन इन इंडिया” अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका- भारत धोरणात्मक भागिदारी परिषदेत बोलत होते.

जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. केवळ सौर आणि पवन उर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास अनुकूल असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले....

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड-महाआयटी यांच्यामध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे राज्यातल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचवणं, आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

****

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, असं सांगत, इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

अल्पसंख्यांकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं. ते काल नागपुरात माध्यमांशी बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठीच्या विविध योजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी प्रामाणिकपणे करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे, असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला.

****

सरकारी विधीतज्ज्ञ मंडळं आणि विधी अधिकारी पदांवरील नियुक्तींमध्ये महिला वकिलांना ३० टक्के आरक्षणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिसाद मागवला आहे. एका विश्वस्त मंडळाने दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ही नोटीस बजावली आहे.

****

'दहशतवादविरोधी दिन' आज पाळला जात आहे. दहशतवादामुळे सामान्य जनतेला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा अधोरेखित करून आणि दहशतवाद राष्ट्रीय हितासाठी कशा प्रकारे हानिकारक आहे हे पटवून देऊन, युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. १९९१ मध्ये याच दिवशी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, तिथे आता अंगणवाड्या भरवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासूनच या निर्णयाची थेट अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकद्वारे ही माहिती दिली. पूर्व-प्राथमिक शिक्षणाला शालेय रचनेशी जोडणं यामुळे सोपं होणार आहे. या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीने करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

****

खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्री सारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे. 'अल निनो' च्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून, शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा, असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे.

****

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. या हंगामासाठी प्रशासनाने चोख नियोजन तसंच गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

****

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल विभागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार हजार औषधविक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला.

दरम्यान, या बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी औषधी भवन इथं कृतीदल कार्यरत करण्यात आलं, अतिआवश्यक औषधी या कृतीदलाने तत्काळ उपलब्ध करून दिली. शहरातली औषध दुकानं बंद असल्याने, घाटी रुग्णालयातल्या औषध केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली होती.

हिंगोली जिल्ह्यातले एक हजार २६० औषध विक्रेते बंद मध्ये सहभागी झाले होते.

बीड जिल्ह्यात गेवराई केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने औषधी विक्रेता संघटनेच्या या बंदला पाठिंबा देत, शहरात मूकमोर्चा काढण्यात आला.

परभणी जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धुळे, सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला प्रतिसाद मिळाला.

****

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या १८ मे पासून लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते काल बोलत होते.

****

धाराशिव जिल्ह्यात ३०० कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी उत्तम रोपवाटिका निर्माण करणं आवश्यक असल्याचं, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी, कृषी विभागाला जिल्ह्यात रोपवाटिका तयार करण्याची सूचना केली. भविष्यात रोपवाटिकेचा जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख निर्माण करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

****

राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४३, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक सात तर धाराशिव इथं ४१ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

विदर्भात वर्धा, अमरावती आणि अकोल्यात आज उष्णतेचा रेड अलर्ट तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...