Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट
युजी पुनर्परिक्षा येत्या २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परिक्षा संस्था
– एनटीएने आज ही घोषणा केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली
नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी हा
निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी परिक्षेसंबंधी केवळ एनटीएच्या अधिकृत सूत्रांवरच
विश्वास ठेवावा, असं आवाहन संस्थेनं केलं आहे.
**
दरम्यान, विद्यार्थी
हे शासनाचं प्राधान्य असून त्यांच्याप्रति शासन संवेदनशील असल्याचं केंद्रीय शिक्षण
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट परिक्षेसंदर्भात ते आज दिल्लीत माध्यमांशी
बोलत होते. २१ तारखेला होणार्या या परिक्षेचं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना १४ जून रोजी
मिळणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ही परीक्षा संगणकीय प्रणालीवर आधारित घेण्यात
येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नीट परीक्षांमध्ये अनियमितता आणि असा
गैरव्यवहार करणर्यांमुळे पात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन ते आपल्या अधिकारांपासून
वंचित राहू नयेत याबद्दल शासन आग्रही असल्याचंही प्रधान यांनी स्पष्ट केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
सहा दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि
इटली या पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते युएई
मध्ये पोहोचणार असून, राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट
घेणार आहेत.
****
जागतिक स्तरावर इंधनाच्या
किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर
तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर १०६ रुपये ६८
पैसे प्रति लिटर तर डिझेलचा दर ९३ रुपये १४ पैसे प्रति लिटर झाला आहे. दिल्लीमध्ये
पेट्रोलचा दर ९७ रुपये ७७ पैसे, आणि डिझेलचा दर ९० रुपये ६७ पैसे प्रति लिटर इतका झाला
आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण
अंतर्गत पूर्ण झालेल्या पाच लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा
इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा लाभार्थ्यांना
घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जात आहेत. यामध्ये तीन कोटीवं घर पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा
समावेश आहे.
दरम्यान, शिवराजसिंह
चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास
मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते झालं.
****
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ
डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. गेल्या
आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीसंदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉ नाडकर्णी
यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच
पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी
मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी भावना
व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण अर्पण केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल
दु:ख व्यक्त केलं आहे.
****
कांद्याला किमान दोन हजार
रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति
क्विंटल दीड हजार रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना
पत्र लिहिलं आहे. बियाणे, खतं, औषधी आणि मजुरीच्या
खर्चात झालेली मोठी वाढ पाहता, सध्या बाजारपेठेत मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत
अत्यंत कमी आहे. बाजार समित्यांमध्ये दर कोसळल्यानं शासनाने नाफेड आणि इतर संस्थांमार्फत
मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करण्यात यावी तसंच केंद्र सरकारशी समन्वय साधून
एक दीर्घकालीन आणि स्थिर कांदा निर्यात धोरण राबवण्यात यावं, आदी मागण्याही
पाटील यांनी केल्या आहेत.
****
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
भारताच्या पी. व्ही. सिंधुचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानच्या अकाने यामागुची सोबत
होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज दुपारी थायलंडच्या
खेळाडूसोबत होणार आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायन्ट्स आणि चेन्नई सुर किंग्ज यांच्या सामना होणार
आहे. लखनौ इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment